Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९
  नव्या युगाचा नवा गुरू : टॉपर
  ओपन फोरम : नोंदणी विवाह की वैदिक?
  थर्ड आय : देवालयाइतकच पवित्र : राजा शिवाजी डॉट कॉम
  कट्टा : कुटुंबव्यवस्थेतील बदल
  दवंडी : राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ एकता..
  लँग्वेज कॉर्नर
  यंगअचिव्हर : आवाज एक अंदाज अनेक
  क्रेझीकॉर्नर : आमच्याकडंही तेच असतं..
  इव्हेंट कॉर्नर
  अवती भवती

जर्मन भाषा, संस्कृती, परंपरा यांचा परिचय करून देणारं पाक्षिक सदर
आपल्या भारतीय विचारसरणीत ‘फणस’, ‘नारळ’ अशा फळांच्या प्रतिकांचा उपयोग करून अंतस्थ गाभ्याला असलेले महत्त्व नकळत मनावर ठसवले जाते. महात्मा गांधींच्या युगाने तर त्यावर एकदम पक्की मोहोर उठवली. तुमचे विचार शुद्ध आणि निर्मळ असले की तुमचा वेष कसाही गबाळा असला तरी त्याला महत्त्व नाही. दक्षिण भारतात वावरताना तर आपण खानदानी गर्भश्रीमंतांशी बोलत आहोत की साध्या मध्यमवर्गीयाशी हे वेषावरून ओळखणे अतिशय चकवा देणारे असू शकते.
गेल्या लेखात आपण भाषा, देहबोली याविषयी जर्मनीतील प्रथम परिचयातील पाळण्याची काही पथ्ये समजावून घेतली. त्याची पुढची पायरी म्हणजे ‘वेषबोली’. या वेळेस त्यासंबंधी थोडेसे पाहू.

 

जर्मनीत वावरताना वेष काय व कसा असावा हे ठरविणारे निर्देशांक दोन, प्रथम ‘हवामान’ आणि दुसरा ‘प्रसंगोपात्तता’. आपल्याकडील सहा ऋतूंपैकी वर्षां आणि शरद वगळून शिशिर, हेमंत, वसंत, ग्रीष्म असे जर्मनीचे ऋतुचक्र आहे, असे म्हणायला हरकत नाही. ‘वर्षां’ जवळजवळ वर्षभर हजर असते त्यामुळे वेषभूषेसंबंधी बोलताना छत्री, रेनकोट, पावसाळी बूट असे स्टॅण्डवर नेहमी असायला हवेत. आदल्या दिवशीचे हवामान वृत्त, सकाळच्या बातम्या ऐकून त्यावरून ठरवायचे की कुठचे बूट आणि कुठचा कोट न्यायला हवा ते. ग्लोबल वॉर्मिगमुळे मात्र या ऋतूंची जर्मनीत पार उलथापालथ झाली आहे. त्यामुळे तेथील भाषेत ‘कांद्यासारखे’ कपडे घालणे, असा गमतीदार वाक्यप्रचार तयार झाला आहे. कांद्याची जशी सालीवर सालींची आवरणे असतात तशी आवरणाची प्रावरणे आणि त्याचे रंगसंगतीनुसार कसोशीने जुळवलेले संच असे परिधानाचे स्वरूप बनत चालले आहे. बाहेर एकदम थंडी, ऑफिसमध्ये एकदम गरम, काही वेळेला ऊर्जाबचतीसाठी अमुक एक वेळेला आपोआप बंद होणारी घरामधली हीटिंग सिस्टीम याच्याशी जुळवून घेत मग ही आवरणे सोयीनुसार काढा-घालायची..
जर्मन माणूस हिशेबाला एकदम पक्का आणि खर्च एकदम मोजूनमापून करणारा. त्यामुळे एरवी मर्सिडीजमधून फिरत असले तरी लहान मुलांचे कपडे ‘हँड मी डाऊन’ पद्धतीने मित्र-मैत्रिणीत/ नातेवाईकांमध्ये सर्रास वापरले जातात तसेच उन्हाळी व हिवाळी कपडे खरेदी करण्यासाठी जर्मन माणूस शक्यतो ‘विंटरश्लूस्स फेरकाऊफ’ व ‘सोमर श्लूस्स फेरकाऊफ’ची वाट पाहतो (विंटर सेल, समर सेल) आणि शक्यतो इम्पल्सिव्ह खरेदी टाळतो. हे सेल खरंच जेन्युइन असतात आणि ऑगस्ट मध्य आणि फेब्रुवारी मध्य अशा त्यांच्या वेळाही जर्मनीभर ठरलेल्या असतात. बेल्ट, पादत्राणे व हँडबॅग हा वेशभूषेचा अविभाज्य भाग समजला जातो. पांढरे सॉक्स व रिबॉक/ नाईकी इत्यादी शूज फक्त स्पोर्टस फील्डवरच घालणे हा अलिखित नियम आहे. आपल्याकडील आयटीमधील तरुण पिढी अमेरिकन नॉनफॉर्मल वातावरणाच्या प्रभावाखाली जर्मनीतील वास्तव्यात वेशभूषेची ही सर्वात मोठी चूक करताना वारंवार दिसून येते. आयटीमधील ज्ञान तोडीस तोड असूनही बऱ्याचदा त्यांना जर्मनीत कलीग म्हणून मान्यता मिळवताना त्रास पडताना दिसतो. जीन्स, टी-शर्ट- स्पोर्ट शूज हे कामाच्या जागी घालणे जर्मन मानसिकतेला पटत नाही. सँडल्स हा प्रकार (पायाची बोटे दाखवणारा) कामाच्या जागी घातला की, जर्मन भुवईवर आठय़ा पडल्याच म्हणून समजा. आपल्याकडील सलवार कमीज हा तेथील ऑफिसच्या वातावरणाला साजून दिसत नाही. कारण तो लीजर टाईमचा वेश वाटतो. तसेच बॉलीवूड स्टाइलचे ‘चमको’ टॉप्स, इअररिंग्ज हे पार्टीवेअर म्हणून ठीक आहे. एरवी साधे स्टड्स, इवल्याशा पेंडंटसह साधी चेन इतपत जर्मन नजर सहन करते. डार्क सूट, एकही डाग/ सुरकुती नसलेला स्वच्छ पांढरा शर्ट/ टॉप पँटच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट नसलेले मोजे, गुळगुळीत दाढी, नीटनेटके चांगले कापलेले केस, स्वच्छ कापलेली नखे अशा बेसिक छोटय़ा गोष्टींनी जर्मनीमध्ये कामाच्या ठिकाणी मान्यता मिळवणे खरंच अजिबात कठीण नाही.
यात सांस्कृतिक अभिनिवेशाला कुठेही जागा नाही. असं पाहा! समजा, आपल्याकडे आलेल्या जर्मन माणसाने देवघरातल्या समईवर सिगरेट पेटवू पाहिली तर आपल्याला ते आवडणार नाही. याचे नेमके कारण समजावून देणे फार कठीण आहे. ‘धार्मिक भावना दुखावणे’ असे कारण म्हणूया हवं तर! तद्वत् ‘काम करणे’ हा जर्मन माणसाचा धर्म आहे असे म्हणू! त्यामुळे त्यातील अधिनियम समजावून घेणे आणि पाळणे म्हणजे त्यांच्या धर्माला मान देण्यासारखे आहे. मुंबईत कामानिमित्त राहणारे जर्मनही आपल्याकडील आचारविचारांना मान देण्याचा कसा कसोशीने प्रयत्न करतात त्याचा नुकताच आलेला हृद्य अनुभव सांगते.
२६ नोव्हेंबरच्या भीषण शोकांतिकेनंतर एका जर्मन कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरांची मला एक मेल आली. त्यांच्या भारतीय बिझनेस पार्टनरच्या पत्नीचा दुर्दैवी अंत झाला होता. गेली दोन वर्षे हे जर्मन दांपत्य मुंबईत राहत आहे.
त्यांच्यासाठी जर्मनीमध्ये मी कल्चरल सेन्सिटाइझिंग सेमिनार केला होता तेव्हाची ओळख होती. त्यांना शोकसमाचाराला या भारतीय कुटुंबाकडे जायचे होते. तेव्हा एकटय़ाने जावे की उभयतांनी? वेश कसा असावा? रंग कोणते टाळावेत? बसण्याच्या पद्धतीची काय पथ्ये पाळावीत? किती वेळ थांबणे, काय बोलणे योग्य? इत्यादी प्रत्येक बारकाव्याचे नेमके प्रश्न विचारले होते. सोबत एक अटॅचमेंट. जर्मनीतल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी ड्राफ्ट केलेला शोकसंदेश होता. तोही मी डोळ्यांखालून घालावा अशी विनंती होती. मुंबईतील वास्तव्यात सांस्कृतिक भावना दुखवण्यासारखी कुठलीही कृती होऊ नये म्हणून सदैव प्रयत्नशील असलेलं हे उच्चपदस्थ जोडपं आता या दु:खाच्या प्रसंगी आपल्या भारतीय बिझनेस पार्टनरचं मन हे असं हळूवारपणे सांभाळायचा प्रयत्न करीत होतं. एकमेकांच्या कल्चरला समजावून घेणं, आपल्यापेक्षा संपूर्ण वेगळ्या मतांचा, धाटणीचा आदर करायला शिकणं आणि आपल्या सांस्कृतिक चष्म्याच्या भिंगातून एखाद्या परभाषेतल्या शब्दाचे किंवा हावभावाचे नकारात्मक अर्थ न काढणं ही एक खूप छानशी शास्त्रशाखा आहे. त्याचे नाव आहे- इन्टरकल्चरल कम्युनिकेशन स्टडीज. जर्मन माणसांनी विचारलेल्या प्रश्नांतून आपल्याला आपला स्वत:चा देश, आपल्या स्वत:चे कल्चरल प्री-प्रोग्रॅमिंग सतत उलगडत राहते आणि जर्मन माणसांना भारतात राहिल्यावर स्वत:चा मायदेश कळू लागतो ही किती गमतीशीर गोष्ट आहे!
भाषावर्ग
आज आपण ऋतुचक्र, हवामान आणि वेशभूषा यासंबंधीची काही छोटी छोटी वाक्ये शिकणार आहोत. आधीच्या सदरात आपण पाहिले की, स्मॉल टॉकसाठी व संवादातील सेतुबांधणी म्हणून हवामान हा विषय सर्व संभाषणांमधून सारखा बोलला जातो. साधारणत: ही वाक्ये संभाषणात येऊ शकतात.
Heute ist das Wetter sehr schön
हॉइटऽ इस्ट दास वेट्टर झेअर श्यॉन.
आज हवा कशी मस्त आहे.

Die Sonne scheint. Der Himmel ist blau.
दी झोन्नऽ शाईन्ट. देअर हीमेल इस्ट ब्लाउ.
सूर्य प्रकाशत आहे. आभाळ निळे (दिसत) आहे.

Aber der Winter in Deutschland ist sehr kalt.
आबर देअर विंटर इन् डॉइट्शलांड इस्ट झेअर काल्ट.
परंतु हिवाळ्यात मात्र जर्मनीत फार थंडी असते.

Wie ist normalerweise das Wetter in Mumbai?
वीऽ इस्ट नोरमालरवाईजऽ दास वेट्टर इन मुम्बाय?
मुंबईत सर्वसाधारणत: कशी हवा असते?

In Mumbai ist es immer sehr warm. Die Durchschnittstemparatur liegt bei 30c.
इन मुम्बाय इस्ट एस इम्मर झेअर वार्म. दी डुर्शश्निट्स्टेम्पाराटुअर लीग्ट बाय् सिर्का द्रायझीग् ग्राड सेल्सीउस.
मुंबईमध्ये नेहमीच फार उकाडा असतो. सरासरी तपमान साधारणत: तीस डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास असते.

Wie viele Jahreszeiten gibt es in Deutschland?
वी फीऽलऽ यारस्त्साईटन् गीब्ट एस इन डॉइट्शलांड?
जर्मनीमध्ये किती ऋतू असतात?

Deustschland hat vier Jahreszeiten : der Winter, der FrÜhling, der Sommer und der Herbst.
डॉइट्शलांड हाट फीयर यारस्त्साईटन : देअर विंटर, देअर फ्रुॅहलींग, देअर सोम्मर उंड देअर हेर्ब्स्ट.
जर्मनीमध्ये चार ऋतुकाळ असतात: शिशिर, वसंत, ग्रीष्म आणि हेमंत.

Für den Winter brauchen Sie einen dicken Mantel, Handschuhe, Pullover aus Wolle und feste Schuhe.
फ्यूर देन विंटर ब्राऊरवन झी आईनन् डिकन् मान्टेल, हांडशूहऽ, पुलोव्हर आऊस वोल्लऽ उंड फेस्टऽ शूहऽ
हिवाळ्यामध्ये तुम्हाला जाडसर हिवाळी कोट, हातमोजे, लोकरीचा पुलोव्हर आणि चांगले मजबूत बूट याची जरुरत भासते.

Zum Schluss, viel Spass beim Weiterlernen.
त्सुम् श्लूस्स, फीऽल श्पास बाईम वायटरलेर्नन्.
(या भाषावर्गाच्या) शेवटी तुम्हाला पुढे शिकायला खूप खूप मज्जा येवो ही इच्छा!
vaishalikar@web.de