Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९
  नव्या युगाचा नवा गुरू : टॉपर
  ओपन फोरम : नोंदणी विवाह की वैदिक?
  थर्ड आय : देवालयाइतकच पवित्र : राजा शिवाजी डॉट कॉम
  कट्टा : कुटुंबव्यवस्थेतील बदल
  दवंडी : राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ एकता..
  लँग्वेज कॉर्नर
  यंगअचिव्हर : आवाज एक अंदाज अनेक
  क्रेझीकॉर्नर : आमच्याकडंही तेच असतं..
  इव्हेंट कॉर्नर
  अवती भवती

२८ वेगवेगळ्या गायिकांच्या आवाजात गाता येणं अशी आगळीवेगळी खुबी तर तिच्यात आहेच, पण तिचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, आपल्या कलेचा उपयोग फक्त व्यावसायिक रीत्या किंवा आपल्या आनंदासाठी न करता, या कलेचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे अशी तिची धारणा आहे.
प्रत्येक व्यक्तीत काहीतरी नैसर्गिक वेगळेपण असतं; आपल्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे ही जाणीव प्रत्येकालाच सुखकारक असते. पण महत्त्वाचं असतं ते आपल्यातील वेगळेपणाची योग्य वेळी जाणीव होणं आणि त्यानंतर त्यावर मेहेनत घेणं. लहानपणापासूनच गाण्याची आवड असणाऱ्या हेमांगिनी झवेरी हिला असंच एक ‘गॉड गिफ्ट’ लाभलं आहे. एक ना दोन तब्बल २८ गायिकांच्या आवाजात ती गाणी गाऊ शकते! सुरैय्या, गीता दत्त, शमशाद बेगम, राजकुमारी, उमादेवी, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, अलीशा चिनॉय, सुनिधी चौहान अशा विविध गायिकांच्या आवाजातील गाण्यांचा ‘आवाज एक अंदाज अनेक’ हा तीन तासांचा कार्यक्रम ती सादर करते.

 

पं. प्रदीप चॅटर्जी, पं. अक्षरांजी शर्मा आणि सुनिलजी या गुरुंकडे ती गाणे शिकत आहे. संगीतावरील तिचं प्रेम तिच्याशी बोलताना प्रकर्षांने जाणवतं. शाळेत असल्यापासूनच ती गाते आहे व गेल्या काही वर्षांत तिने स्टेज शो करायला सुरुवात केली. संगीतात करिअर करायचं तर काहीतरी वेगळं करायला हवं ही इच्छा इतर कोणाही तरुणांप्रमाणे तिच्याही मनात होतीच. सातत्याने गायनाचा सराव करत असतानाच आपण वेगवेगळ्या आवाजात गाऊ शकतो, याची तिला जाणीव झाली व त्याची परिणीती झाली ‘आवाज एक अंदाज अनेक’ या कार्यक्रमात.
इतक्या वेगवेगळ्या गायिकांच्या आवाजात गाता येणं अशी आगळीवेगळी खुबी तर तिच्यात आहेच, पण तिचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, आपल्या कलेचा उपयोग फक्त व्यावसायिक रीत्या किंवा आपल्या आनंदासाठी न करता, या कलेचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे अशी तिची धारणा आहे. त्यासाठी ती प्रयत्न देखील करते आहे. अनेक सामाजिक संस्थांबरोबर स्वेच्छेने काम करत ती वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही पातळीवर समाधानी आहे, हे तिच्या बोलण्यातून जाणवतं.
हेमांगीनीने आपला पहिला शो केला तोच एका संस्थेला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी. घाटकोपर मधील एका मतीमंद मुलांच्या शाळेलाही ती वरचेवर भेट देत असते. तिथली मुलं आता माझ्या चांगलीच ओळखीची झाली आहेत, हे ती अर्थातच अभिमानाने सांगते.
हेमांगीनीच्या शोचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, यात फक्त गाणी असतात असे नाही तर आपल्या माध्यमातून काहीतरी सामाजिक संदेश पोहोचावा यासाठी या कार्यक्रमादरम्यान शांतीचा संदेश देणारा एक लाईव्ह व व्हीडीओ यांचं सिंक्रोनायझेशन करुन एक छोटा कार्यक्रमही केला जातो. मानव निर्मित व निसर्गनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या संकटांपासून मानवाला मुक्ती मिळू दे, हा संदेश यातून दिला जातो.
आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातील गायिकांबद्दलची कृतज्ञता हेमांगीनीच्या मनात आहे. त्यातूनच जन्म झाला १९४० पासून हिंदी चित्रपटसृष्टीत ज्या गायिका झाल्या त्यांना एक आदरांजली वाहणाऱ्या लघुपटाचा. हा लघुपटही हेमांगीनीच्या कार्यक्रमाचाच एक भाग आहे. या बद्दल बोलताना ती म्हणते की, त्या काळात जेव्हा स्त्रियांना सिनेमा बघण्याची बंदी होती, त्या काळात या गायिकांनी आपली कला सगळ्यांसमोर सादर केली. त्यांची आठवण आपण ठेवलीच पाहिजे. म्हणूनच ही डॉक्युमेंटरी दाखवली जाते.
अनेक प्रसार माध्यमांनी तिच्या या कलेची दखल घेतली आहे. तिला परदेशातूनही ऑफर्स येत आहेत. सिरियलमध्येही काम करण्यासाठी ऑफर येत आहेत.
ही सगळी प्रगती होत असताना जे रसिक तिला व तिच्या कार्यक्रमाला भरभरून दाद देतात ेत्यांच्यासाठी, केवळ त्यांच्या प्रेमापोटी येत्या शनिवारी पाल्र्याला तिचा शो आहे.
नमिता देशपांडे