Leading International Marathi News Daily                               शुक्रवार, २० फेब्रुवारी २००९

राणे यांचे पुनर्वसन!
राधाकृष्ण विखे-पाटील आणि नसीम खान यांचीही मंत्रिमंडळात वर्णी
काँग्रेसमधील घोळाचा आदिक, कोळंबकरांना फटका
मुंबई, १९ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी
थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर टीकेचे जबरदस्त प्रहार करणाऱ्या नारायण राणे यांच्या विरोधातील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये त्यांचा राज्य मंत्रिमंडळात आज पुन्हा समावेश करण्यात आला. याशिवाय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राधाकृष्ण विखे-पाटील आणि नसीम खान यांचीही वर्णी लावण्यात आली आहे. तत्पूर्वी दिवसभर सुरू राहिलेल्या काँग्रेस पक्षातील शह-काटशहाच्या खेळात गोविंदराव आदिक यांचा पत्ता ऐनवेळी कापण्यात आला तर राणे आणि विलासराव देशमुख यांच्या शीतयुद्धात शपथ घेण्याच्या तयारीत आलेले राणे समर्थक कालिदास कोळंबकर यांच्या पदरी निराशाच आली.

मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर धुडगूस
जुन्नर, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
मराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेड संघटनांच्या शिवनेरीवर आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सोहळ्याला हिंसक वळण लागले. त्यामुळे उत्सव सोहळ्याच्या पावित्र्याला गालबोट लागले. शिवजन्मोत्सव सोहळ्यापूर्वी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस तर जवळपास दहा कार्यकर्ते जखमी झाले. वळसे पाटील आलेल्या हेलिकॉप्टरवरही दगड लागून काच फुटल्याने हे हेलिकॉफ्टर नादुरुस्त झाले.

‘होकायंत्र? हे तर धोकायंत्र’
नाशिक, १९ फेब्रुवारी / प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख कधी या दिशेने तर कधी त्या दिशेने झुकत असल्याचे सांगताना होकायंत्र तरी निश्चित दिशा दाखविते मात्र हे ‘धोकायंत्र’ दिशाहीन असल्याचा टोला मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शरद पवारांचा थेट नामोल्लेख न करता लगावला. मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे आज येथे आयोजित बेरोजगार मेळाव्यात एकिकडे मराठी युवकांना कामाची टाळाटाळ करण्याच्या सवयीवरून फैलावर घेणाऱ्या राज यांनी दुसरीकडे शरद पवारांवर टीका करण्याची संधी साधून घेतली.

विक्रमावर ‘मराठमोळी’ मोहोर!
आदिनाथ आव्हाड धावला ७८ किलोमीटर
परभणी, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
बुधिया व अनास्ता बरेलिया (ओरिसा) या धावपटूंचा विक्रम आज एका मराठमोळ्या मुलाने मोडला! आदिनाथ राधाजी आव्हाड (वय ११) असे या नव्या विक्रमवीराचे नाव आहे. शहराजवळच असलेल्या त्रिधारा येथील ओंकारेश्वर विद्यामंदिरचा आदिनाथ हा विद्यार्थी आहे. जेव्हा त्याने हा विक्रम पूर्ण केला आणि सलग ७८ किलोमीटर धावण्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचा झेंडा रोवला तेव्हा त्याचे शिक्षक रणजित काकडे यांचे डोळे आनंदाश्रुंनी तुडुंब भरले होते. हा आनंद व्यक्त करताना त्यांना शब्दही फुटत नव्हते. ओंकारेश्वर विद्यामंदिरात सहावीत शिकणाऱ्या आदिनाथने ७८ किलोमीटरचे हे अंतर ७ तास ३६ सेकंदात पूर्ण केले.

जि. प. शाळांतील शेकडो हृदरोगी विद्यार्थ्यांना मिळणार जगण्याची आशा
संदीप आचार्य
मुंबई, १९ फेब्रुवारी

जिल्हापरिषदेच्या शाळांमधील अनेक मुलांना हृदरोगासारखा गंभीर आजार झाल्याचे आढळून आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने ‘जीवनदायी योजने’च्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील विशेष बाब म्हणजे उपचारासाठी दाखल होणाऱ्या या रुग्ण विद्यार्थ्यांना पिवळी शिधापत्रिका अथवा तहसिलदाराच्या अल्प उत्पन्नाच्या दाखल्याचीही गरज राहणार नसल्यामुळे तात्काळ उपचार मिळणे शक्य होणार आहे. याबाबतचा शासकीय आदेश काल जारी करण्यात आला असून प्रतिवर्षी अडीच हजार मुलांना गंभीर आजारासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांपर्यंतची मदत उपलब्ध होणार आहे.

संपूर्ण हिवाळ्यात राज्यात केवळ सात दिवसच थंडी!
हरवलेली थंडी (पूर्वार्ध)
अभिजित घोरपडे
मुंबई, १९ फेब्रुवारी

हिवाळ्याचा काळ साडेतीन-चार महिन्यांचा मानला जात असला तरी या वेळच्या हिवाळ्यात महाराष्ट्रात केवळ सहा-सात दिवसच खरीखुरी थंडी अनुभवायला मिळाली! या काळातील सौम्य स्वरूपाच्या गारव्याचा कालावधी विचारात घेतला तरी राज्यात फक्त २९ दिवसच दिलासा मिळाला, तर उरलेले अडीच-तीन महिने उकाडाच सहन करावा लागला. पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेकडून उपलब्ध झालेल्या तापमानाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यावरून हा हिवाळा गेल्या काही दशकांमधील अपवादात्मक ठरला आहे.

विलासराव निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष
नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

काँग्रेसने पक्ष संघटनेत व्यापक व महत्त्वपूर्ण फेरबदलांची घोषणा केली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलामनबी आझाद अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून पक्ष संघटनेत परतले आहेत. माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनाही पक्षसंघटनेत स्थान देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची महाराष्ट्राच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून खासदार प्रिया दत्त यांना अ. भा. काँग्रेस सचिवपदावरून हटविण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नारायण राणे यांचे कॅबिनेट मंत्रीपद देऊन पुनर्वसन केल्यानंतर आज रात्री काँग्रेसश्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विलासराव देशमुख यांची नियुक्ती करीत संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पदांना फारसे महत्त्व नसल्यामुळे या नियुक्तीमुळे देशमुख यांचे कितपत समाधान होईल, याविषयी शंकाच आहे.
पवार शिरुरमधून निवडणूक लढणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते त्रिपाठी यांनी सांगितले. याविषयीची अधिकृत घोषणा नंतर करण्यात येईल.

उद्धव ठाकरे यांचा २५ फेब्रुवारीपर्यंत ‘अज्ञातवास’
नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पाच-सहा दिवसांसाठी ‘अज्ञातवासा’त जाणार आहेत. या काळात आपल्याशी कुणी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, असे निर्देश त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती शक्यच नाही, असे पवार यांनी ठाम प्रतिपादन केले असले तरी ही युती होईलच, अशी खात्री शिवसेनेचे बरेच खासदार व्यक्त करीत आहेत. या युतीची चर्चा स्थानिक पातळीपर्यंत पोहोचली असून येत्या दोन-तीन दिवसात काही तरी घडेल, असे त्यांचे म्हणणे आहे. या तर्काला राष्ट्रवादीचे काही खासदारही दुजोरा देत आहेत. लोकसभा निवडणुकांची घोषणा होईपर्यंत युती झाली नाही तर निवडणुकांच्या काळात होईल आणि तेही शक्य झाले नाही तर लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतरही राष्ट्रवादी-शिवसेना युती शक्य आहे, असा आशावाद आज संसद भवनात शिवसेनेचे खासदार व्यक्त करीत होते. दरम्यान, आपल्याशी २५ फेब्रुवारीपर्यंत कुणीही संपर्क करू नये, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना दिल्याचे समजते. संसदेच्या अधिवेशनाला २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान सुटय़ा असल्यामुळे मुंबईत या कालावधीत काही राजकीय उलाढाली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत २६ फेब्रुवारी रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. तोपर्यंत महत्त्वाचे निरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्याकडे द्यावे, अशा सूचना उद्धव यांच्या वतीने ज्येष्ठ नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

बँकांचा ‘लाँग ब्रेक’
मुंबई, १९ फेब्रुवारी/ व्यापार प्रतिनिधी

सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (२० फेब्रुवारी) रिझव्‍‌र्ह बँकेतील कर्मचारी संघटनेने पुकारलेला लाक्षणिक संप आणि सोमवारच्या सार्वजनिक सुष्ीमुळे बँकांमधील धनादेशांचे क्लियरिंग आणि सेटलमेंट व्यवहारांना मात्र सहा दिवसाच्या ‘ब्रेक’ला सामोरे जावे लागणार आहे.
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेत कार्यरत असलेल्या चार संघटनांपैकी कारकून, टायपिस्ट आणि अटेंडंट्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ऑल इंडिया रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लॉइज असोसिएशन’ने पेन्शनसंदर्भातील मागणीबाबत सरकारकडून सुरू असलेल्या हयगयीचा निषेध म्हणून शुक्रवारी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. संघटनेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळेल आणि देशभरातील रिझव्‍‌र्ह बँकेच्या ७,००० कार्यालयांमधील कामकाज त्यामुळे पूर्णपणे ठप्प होईल. परिणामी धनादेश वठणावळ व सेटलमेंट व्यवहारही स्थगित होतील. शुक्रवारच्या संपाचा सर्वाधिक फटका हा शेअर बाजार व कमॉडिटी बाजारातील व्यवहारांच्या सेटलमेंट्सना (सौदापूर्ती) बसेल. गुरुवारी (१९ फेब्रुवारी) होणाऱ्या शेअर्सच्या खरेदी वा विक्री व्यवहारांवर प्रत्यक्षात पैशांच्या भरणा हा सहा दिवसांनी म्हणजे बुधवारी २५ फेब्रुवारीलाच पूर्ण होऊ शकेल. कारण शनिवारी जरी बँकांनी नियमित कामकाज सुरू केले तरी त्या दिवशी बहुतांश सहकारी बँका आणि वाणिज्य बँकांमध्येही क्लियरिंग व्यवहार केले जात नाही. शिवाय शनिवारी शेअर बाजार आणि कमॉडिटी बाजारातील व्यवहारही बंद असतात. रविवारची साप्ताहिक सुष्ी तर सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त पुन्हा सार्वजनिक सुष्ी त्यामुळे धनादेश वठणावळीसाठी मंगळवारी बँकांकडे येईल आणि प्रत्यक्षात बुधवारी पैशांचा व्यवहार पूर्ण होईल.

देशातील २२ विद्यापीठे बोगस
पुणे, १९ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील २२ विद्यापीठे बोगस असल्याचे जाहीर केले असून, नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एकाच विद्यापीठाचा या यादीमध्ये समावेश असून, उत्तर प्रदेशमधील नऊ आणि दिल्लीतील सात संस्थांना हा ‘मान’ देण्यात आला आहे. देशभरातील संलग्न विद्यापीठे व विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेल्या संस्थांची ‘यूजीसी’तर्फे पाहणी करण्यात येते. आयोगासह अन्य कायद्यांच्या अखत्यारित राहून संबंधित विद्यापीठ-संस्था कार्यरत आहे की नाही, याचा शोध घेतला जातो. या पाहणीच्या माध्यमातून देशभरातील बोगस विद्यापीठांची यादी प्रत्येक शैक्षणिक वर्षांमध्ये किमान एकदा तरी जाहीर केली जाते. या वेळची यादी आयोगाने १९ जानेवारीला अद्ययावत केली आहे. त्यामध्ये या २२ विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या कित्येक वेळच्या यादीप्रमाणे यंदाही नागपूरच्या राजा अरेबिक विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी