Leading International Marathi News Daily
शनिवार, २१ फेब्रुवारी २००९
  मराठी पाऊल पडते पुढे!
  मुतालिक आणि तरुणाई
  हे की ते?
  स्वत:च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास !
  विज्ञानमयी
  पल्लवीचा बोलविता धनी
  इंग्रजीचे शिक्षण आणि मराठी
  गाजतो मराठी भाषा दिन, मराठी शाळा मात्र दीन!
  कृतार्थ मी!
  रंगात रंगुनि...
  आयुष्यभराचा लाभ
  मुखवट्यामागचे चेहेरे
  प्रतिसाद
  लहान आणि महान
  एका वाढदिवसाच्या निमित्ताने
  आर्थर राजा आणि चेटकीण
  सुनो छोटीसी गुडिया की अजब कहानी
  एक अनोखी सफर लाहौल स्पितची -

 

भव्य, झगमगीत व्यासपीठ, वीसेक हजारांची सोय असलेली प्रशस्त प्रेक्षकव्यवस्था, देखणं आयोजन अशा श्रीमंती थाटात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा महाअंतिम सोहळा संपन्न होत होता. सारंच कसं ‘महा’रुपी होतं आणि त्या व्यासपीठावर ४५ लिटिल चॅम्प्स एका सुरात गात होते ‘मराठी पाऊल पडते पुढे..’
नमनालाच हे गाणं सादर करून ‘झी मराठी’ने जणू त्यांचं ‘स्टेटमेंट’ नमूद केलं होतं आणि त्या गाण्यावर ताना घेणारे लाखो प्रेक्षक माना डोलवत संमतीची मोहोर उमटवत होते.
मराठीला मार्केट आहे, आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका आणि ते मार्केट काबीज करा- हे ‘झी मराठी’ने तर जाहीररित्या सिद्ध केलंच आहे. शिवाय इतरही अनेक घटना आज पुन्हा पुन्हा हेच सिद्ध करतायंत की ‘मराठीला मार्केट आहे. जस्ट ग्रॅब इट!’
मराठीची प्रतिकं मानली जाणारी अनेक पारंपरिक उत्पादनं आज तुफान मागणी खेचत आहेत. मध्यंतरी एका हस्तकला प्रदर्शनात घोंगडय़ा किंवा कांबळी हातोहात खपताना पाहिली. आतापर्यंत टोचरं पांघरुण म्हणून शहरवासियांनी झिडकारलेलं ग्राम्य उत्पादन
 

चक्क घरातल्या भारतीय बैठकीला ‘एलिगंट लूक’ देतं असं म्हणत ते घेणारे मुंबईकर भेटले. त्या कांबळ्याला सुती खोळ शिवून थंडीत वापरायला मस्त, असं म्हणत काही पुणेकर त्या घोंगडीला आपलंसं करताना दिसले. लहानपणी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत धनगर झालेल्या मुलाच्या खांद्यावर पाहिलेली ती घोंगडी आज शहरी उच्चभ्रू माणसांच्या घरात विराजमान होताना दिसतेय..
गेल्या वर्षीपर्यंत ‘हँडिक्राफ्ट एक्स्पो’मध्ये सर्वाधिक दालनं व्यापायचे ते उत्तर वा दक्षिण प्रांतीय हस्तकारागीर. यंदा मुंबईत भरलेल्या ‘महालक्ष्मी-सरस’ प्रदर्शनात वारली डिझाईनने साकारलेल्या असंख्य कलावस्तूंनी सजलेले अनेक स्टॉल होते. ते सारे स्टॉल्स तुफानी गर्दी खेचत होते. जव्हार-मोखाडय़ातली ती चटपटीत आदिवासी मुलं श्रीमंतांघरच्या भिंती व दारं रंगवण्याची कंत्राटं मिळवताना पाहिली आणि पटलं- ‘मराठी पाऊल पडते पुढे!’
पूर्वी बाहेर जेवायला जायचं म्हणजे घरात न शिजणारे पालक-पनीर, मेथी-मटर आणि नान खायचं, असं मानत हॉटेलमध्ये जाणारे मराठी जन आता ‘अमक्याकडे फक्कड ताकातलं पालक किंवा अळूचं फदफदं मिळतं’ म्हणत तिथे सहकुटुंब रांग लावून जेवायला जातात. गुजराती, मारवाडी वाणीही आता पुरणपोळी, सांजोऱ्या, लाडू, कडबोळी, लोणची, चटण्या यांच्या पाकिटांना अग्रस्थान देतात. ‘आमची कोठेही शाखा नाही’, अशी शेखी मिरवणारे मराठी ब्रँडस्ही आता ठिकठिकाणी फ्रँचाइझी उघडताहेत. मालवणी पदार्थ तर आज जत्रेपासून ते पंचतारांकित हॉटेलांपर्यंत सर्वत्र भाव खात आहेत. मराठी खाद्यपदार्थाना ‘यम्मी’ म्हणत अमराठी खवय्येही ते स्वाहा करताहेत. मध्यंतरी एका मराठमोठय़ा हॉटेलमध्ये थालिपीठ व विथ लोण्याचा गोळयावर आडवा हात मारणारं गुजराती कुटुंब पाहिलं आणि मनात आलं, ‘जस्ट पराठा’सारखी कोणी ‘ओन्ली थालिपीठ’ नामक चेन सुरू केली, त्यात मेथी थालिपीठ, पालक थालिपीठ असे विविध प्रकार ठेवले तर ती चेन नक्की यशस्वी धंदा करेल.
मी अजून वाट बघतेय उंधियोसारखी फणसाची भाजी पारदर्शक डब्यांमधून कधी विकत मिळेल याची.. रोजच्या दुधाच्या रतीबासारखा मऊसूत पोळ्यांचा आणि निवडून चिरलेल्या स्वच्छ भाज्यांचा रतीब घालणाऱ्या उद्योजकाची प्रतीक्षा आहे. अगदी गवार-भोपळा, मेथी-मटार असे कॉम्बो पॅक ‘रेडी टू कूक’ अवस्थेत सकाळी घरपोच कोणी देईल का, याकडे तमाम नोकरदार भगिनी डोळे लावून बसल्या आहेत. म्हणजे मराठी पदार्थाचं मार्केट वाढलंय म्हणून समाधान मानू नका. ते अजून बरंच वाढायला वाव आहे.
रसनातृप्तीची स्पर्धा जिंकलेली मराठी आज कानसेनांनाही तृप्त करत आहे. महाराष्ट्रातला कोणताही ऑर्केस्ट्रावजा इव्हेंट मराठी गाण्यांशिवाय पूर्ण होत नाही. अगदी हाय-फाय कॉलेजच्या गॅदरिंगमध्येही मराठी गाण्यांची उणीव राहात नाही. हिंदी गाण्यांच्या रिंगटोनच्या कल्लोळातही ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘ढिपारी ढिपांग’ वट मारून जात आहेत. व्हॅलेंटाईन्सच्या प्रेमपत्रांतही अनेक कान्हे त्यांच्या बावऱ्या राधेला सप्तसुरांची साद घालतात, तेही मराठी एस.एम.एस. पाठवून. इ-मेल, एस.एम.एस.च्या मार्केटनेही मराठीची ताकद ओळखलीय. मराठी संकेत स्थळं आणि ब्लॉगमध्ये तर रोजच्या रोज भर पडतेय.
रोमन इंग्रजी ते युनिकोड हा प्रवासही भन्नाट आहे.. मार्केट ओळखून झालेला आहे. दहा वर्षांपूर्वी मराठीत व्यक्त होण्याची आस भागवण्यासाठी रोमन मराठीतून इ-मेल लिहावा लागायचा आणि शब्द लावून तो वाचावा लागायचा. आता युनिकोडने साऱ्या सीमा भेदल्या आहेत. मॉडर्न युगातही मराठीची पावलं पुढे आहेत, हे सिद्ध झालंय. उगाच नाही, आज मोठमोठाले ब्रँडस्ही मराठीतून जाहिरात करू लागले आहेत. पूर्वी जाहिरात क्षेत्राची भाषा प्रामुख्याने इंग्रजी असायची. भरत दाभोळकरांनी तिला वाकवून ‘मिंग्लिश’ केलं आणि आता अस्सल मराठी जाहिरातीसुध्दा झळकू लागल्या आहेत. अनेक ब्रँडनेम व स्लोगन्स मराठी झाली आहेत. पुलंचं ‘भ्रमणमंडळ’ही एका पर्यटन कंपनीचा ब्रँड बनून जाहिरातीत झळकतंय. अच्युत पालवांचे मराठी कवितांच्या ओळी सुलिखित केलेले टी-शर्ट हातोहात खपताहेत.

हा सारा चमत्कार आपोआप नाही घडला. ‘नकळत सारे घडले’, असा हा प्रकार नाही. तर या मराठी मार्केटच्या यशाचा थेट संबंध मराठी माणसाच्या उन्नतीशी आणि त्याच्या आत्मविश्वासाशी निगडीत आहे. गेल्या काही वर्षांत मराठी माणूस स्वत:च्या बुद्धीच्या आणि कष्टांच्या जीवावर लक्षणीय प्रगती करू लागलाय. ग्लोबलायझेशननंतर मोकळ्या झालेल्या आकाशाने मराठी माणसाला पंख पसरायचं बळ दिलं. चाकोरी आणि नेमस्त वृत्ती ही मराठी माणसाची व्यवच्छेदक लक्षणं समजली जात. या गुणवैशिष्टय़ांमुळे तो स्वत:च्या कक्षा ओलांडू पाहायचा नाही. त्यामुळे फारशी मराठी माणसं उद्योगपती निपजू शकली नाहीत. आणि चाकरी करून कोटय़धीश बनण्याची संधी क्वचित कोणाला मिळत असे. पण जागतिकीकरणाने अनेक चाकोरीबाहेरच्या संधी अनायासे खुल्या केल्या. कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक मराठी माणसं वरची पदं मिळवू लागली. आपल्या खणखणीत नाण्याची मुद्रा ठिकठिकाणी उमटवू लागली. यातून मराठी माणसांची पत वाढत गेली. क्रयशक्ती उंचावली. दृष्टी विस्तारली. विचारांच्या दिशा रुंदावल्या आणि या साऱ्याचा परिपाक म्हणून मराठी माणसांचा आत्मविश्वास दुणावला. तो अधिक दमदारपणे व्यक्त होऊ लागला. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून मराठीतून बोलणाऱ्यांचा टोन अनेकदा न्यूनगंडाचा असतो, पण इंग्रजी सफाईदार बोलता येऊनही मुद्दाम मातृभाषेत फर्डे भाष्य करणारे अनेकजण आत्मविश्वासाने व्यक्त होताना दिसतात.
कॉस्मो व ग्लोबल वातावरणात सहज सामावू शकणाऱ्यांना आपलं वेगळेपण जोपासण्यासाठी लागणारं बळही आपसूक प्राप्त होतं. किंबहुना पॅराशूटमध्ये बसून स्वच्छंद विहार करणाऱ्याला आपल्या वाहनाचा दोरा खालच्या जहाजावर घट्ट बांधलेला आहे, याची जाणीव असते. मुळांच्या आधाराचे महत्त्व वृक्षाला सांगावं लागत नाही. प्रगतीचे पंख लावून उड्डाण करणाऱ्या मराठी माणसाला स्वत:ची मूळं शाबूत ठेवणं गरजेचं वाटू लागलं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या अस्मितेची प्रतीकं जाहीरपणे जोपासण्यात त्याला कमीपणा वाटेनासा झाला. स्वत:चं मराठीपण तो आत्मविश्वासाने मिरवू लागला. मराठी म्हणजे ‘डाऊनमार्केट’ नाही, तेही ‘अपमार्केट’ आहे, याची खात्री त्याला स्वत:ला मनोमन पटली. त्या मनोधारणेला खतपाणी घालणारे बदल दृश्यस्वरूपात दिसू लागले. किंबहुना मराठीला पोषक अशा वातावरणामुळे तशी मनोभूमिका बनत गेली, असंही म्हणता येईल. काही वर्षांपूर्वी अनुदानासाठी हात जोडणारं आणि अनुदान मिळतंय म्हणून चित्रपट काढणारं मराठी चित्रजगत आता नवे प्रयोग करतंय, ते काही उगाच नाही. विविध विषयांना भिडणारे दर्जेदार मराठी सिनेमा आता पाहायला मिळताहेत. ‘प्लाझा’ ते मल्टिप्लेक्स हा प्रवास त्याने यशस्वीपणे केलाय.
२४ तासांचं एक तरी मराठी चॅनेल चालेल की नाही, अशी पूर्वी शंका होती. तिथे आज पाचेक मराठी चॅनेल्स चालत आहेत. मराठी पुस्तकांचा व्यवहार सध्या ‘बरा’ आहे, ‘आमचं बरं चाललंय’ अशी प्रांजळ कबुली खुद्द मराठी प्रकाशकही देताहेत. त्यांची ‘बरं’ची व्याख्या मराठी वाचकांना चांगलीच माहित आहे!
राजकीय पक्षही एकामागोमाग एक सारेच जण मराठीचा मुद्दा उचलून धरत आहेत, कारण तेच! -मराठीला मार्केट आहे! म.न.से. आणि शिवसेनेपाठोपाठ नितेश राणेंनेही ‘क्रॉसवर्ड’मध्ये मराठी पुस्तकांचा शेल्फ ठेवण्यासाठी यशस्वी आंदोलन केल्याचं स्वाभिमानाने जाहीर केलंय.
एकंदर मराठी अस्मिता अशी बाळसं धरत असताना मराठी शाळा मात्र ‘डाऊन मार्केट’चा कलंक पुसू शकलेल्या नाहीत. त्या बापुडय़ा अजूनही संशयाच्या पिंजऱ्यातच उभ्या आहेत. पण काळ्या ढगाला चंदेरी किनार म्हणजे पाल्याला मातृभाषेतून शिकवण्याचा विचार सद्सद्विवेकबुद्धीने करून तो अमलात आणणाऱ्या बुद्धिवादी पालकांची संख्या हळूहळू वाढतेय. आणि या परिस्थितीतही गावोगावच्या अनेक मराठी शाळा आपापल्या विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी जोरकस प्रयत्न करताना दिसताहेत. आज महाराष्ट्रातील अनेक शाळा पहिलीपासून इंग्रजीचं प्रभावी अध्यापन करतात. अनेक मराठी शाळांची मुलं विविध स्पर्धा, परीक्षा, विज्ञान-प्रदर्शनं, यात स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करताहेत. पुण्याजवळच्या अनेक मराठी शाळा पाबळच्या विज्ञानाश्रमाचा आय.बी.टी. कोर्स राबवून मुलांना उद्योगप्रवण शिक्षण देताहेत. आज शहरातल्या कित्येक मराठी शाळांतली सहावी-सातवीतली मुलं प्रभावी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करू शकतात. मेख ही आहे, की ही यशोगाथा अनेकांना माहीत नाही, किंबहुना त्याकडे समाजाने पुरेसे लक्ष दिलेले नाही. या शैक्षणिक बदलांचंही आता भरपूर मार्केटिंग व्हायला हवं. मराठी माणसाचं मनोधैर्य वाढवण्यात माहिती तंत्रज्ञानाचा वाटाही मोठा आहे. आज गावोगावचे वाचक आम्हाला लेख किंवा प्रतिक्रिया इमेल करतात. गावोगावची मुलं एम.एच.सी.आय.टी.ने शहाणी आणि धीट करून सोडली आहेत. आणि त्या तंत्रज्ञानाच्या खिडकीने त्यांना मोकळ्या आकाशाचा वेध घेण्याची दृष्टी दिलीय. आज ‘लोकल टू ग्लोबल’ असं वर्तुळ पूर्ण झालंय. त्यांच्यातली दरी मिटलीय. विदेशी ब्रँडस् गावात पोहोचले आहेत आणि गावच्या बचतगटांची उत्पादनं शहरातल्या टोलेजंग मॉलमध्ये वा उंची प्रदर्शनात उत्तम किमतीला विकली जात आहेत. गावच्या ललना वटपूजेला जाताना पुजेच्या ताटावर जो रुमाल घालतात, त्या क्रोशाचं विणकाम परवा एका मॉलमध्ये स्टोल आणि स्कार्फच्या रुपात भेटलं. ‘हाऊ एथनिक’ म्हणत नवयुवतींच्या त्याच्यावर पडणाऱ्या उडय़ा पाहिल्या आणि परत पटलं, ‘मराठीला मार्केट आहे!’
थोडक्यात काय, तर मराठीपण जोरकसपणे प्रकट होतंय. त्यात आणखी विस्ताराची क्षमता आहे. फक्त त्याला हवंय आकर्षक वेष्टण. हवीय मार्केटिंगची झालर!
२७ फेब्रुवारी हा मराठी दिन. ज्ञानपीठ विजेते साहित्यिक कुसुमाग्रजांचा हा जन्मदिन. सध्या आठवडाभर ठिकठिकाणी या मराठी दिनाचं ‘सेलिब्रेशन’ होणार आहे. ज्ञानेश्वरांच्या ओवीपासून ते सुरेश भटांच्या ‘बोलतो मराठी’ आणि मराठी रॉक गाण्यांपर्यंत मराठी भाषेची अनेक कवनं या मराठी कार्यक्रमांतून गायली जातील. त्यात विशुद्ध मराठीपासून ते इंग्रजाळलेल्या मराठीपर्यंत अनेक रुपांत ही भाषा आविष्कृत होईल. होऊ दे! मार्केट विस्तारतं, तेव्हा हे अपरिहार्यपणे होणारच. मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टींवर तर मार्केट बेतलेलं असतं.
शुभदा चौकर