Leading International Marathi News Daily                               शनिवार, २१ फेब्रुवारी २००९

भाजपशी ‘घटस्फोट’ घ्याच!
शिवसेनेच्या बहुतांश जिल्हाप्रमुखांचे मत

मुंबई, २० फेब्रुवारी / प्रतिनिधी

शिवसेना-भाजप युती अभेद्य असल्याचा निर्वाळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिला असला तरी शिवसेनेचे बहुतांश जिल्हाप्रमुख भाजपशी फारकत घेण्याच्या मन:स्थितीत आहेत. ‘मातोश्री’ या क्लबवर आज राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपशी असलेली युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेससमवेत हातमिळवणी करावयाची का, असा सवाल या वेळी विचारण्यात आला.

‘कमळा’बाई आजही लाडकी
मुंबई, २० फेब्रुवारी / प्रतिनिधी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य युती म्हणजे नुसता संशयकल्लोळ आहे. ‘कमळा’बाईवर आमचे पूर्वीइतकेच प्रेम आहे असा निर्वाळा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती तुटणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्याचप्रमाणे राज्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अबाधित असलेली युती यापुढेही अभंगच राहील, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युती तुटणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती त्यावर बाळासाहेब ठाकरे आणि गडकरी यांनी आज पडदा टाकला.

पाकिस्तानातील आत्मघाती स्फोटात २८ ठार
इस्लामाबाद २० फेब्रुवारी/पीटीआय

वायव्य पाकिस्तानातील डेरा इस्माईल खान या शहरात एका शिया धर्मगुरूच्या अंत्ययात्रेत आत्मघातकी व्यक्तीने घडवलेल्या स्फोटात २८ ठार तर १६० जण जखमी झाले. या घटनेमुळे संतप्त जमावाने केलेल्या हिंसक निषेधामुळे संचारबंदी लागू करावी लागली. आत्मघातकी व्यक्तीने धर्मगुरू शेर झमान यांच्या अंत्ययात्रेत हा स्फोट केला त्या अंत्ययात्रेत १५०० लोक सहभागी होते. धर्मगुरू शेर झमान यांची अज्ञात बंदुकधाऱ्यांनी हत्या केली होती. हे शहर तालिबानचे प्राबल्य असलेल्या वझिरीस्तान जिल्ह्य़ाच्या नजीक आहे. या शहरात गेल्या काही महिन्यांत किमान सहा मोठे हल्ले झाले आहेत.

एकवेळ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करा, पण त्यांच्या नोकऱ्या टिकवा - प्रणव मुखर्जी
नवी दिल्ली, २० फेब्रुवारी/वृत्तसंस्था

एकवेळ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करा पण त्यांच्या नोकऱ्या टिकवा असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज केले. आर्थिक मंदीचा तडाखा सर्वच क्षेत्रांना बसत आहे. अनेकांना बेकार व्हावे लागले. अमेरिकेप्रमाणे भारतातही मंदीचे विपरीत परिणाम अनुभवायला मिळत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर प्रणव मुखर्जी यांनी हे आवाहन केले आहे. नवी दिल्ली येथे आयोजिण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेमध्ये बोलताना प्रणव मुखर्जी म्हणाले की, विविध स्तरांवर कर्मचाऱ्यांच्या वेतनात एकवेळ कपात करा, परंतु कोणालाही बेकार होऊ देऊ नका.

विप्रो देणार आठ हजार नव्या नोकऱ्या
हैदराबाद, २० फेब्रुवारी/पीटीआय

आर्थिक मंदीच्या तडाख्यामुळे विविध कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नोकरकपात सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर, भारतातील अग्रगण्य आयटी कंपनी विप्रो ८ हजार नव्या नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. या जागांवर येत्या जून किंवा जुलै महिन्यात भरती करण्यात येईल. या नोकऱ्यांमध्ये नव्या लोकांना अग्रक्रम देण्यात येणार असल्याचे विप्रोचे मनुष्यबळ विकास विभागाचे उपाध्यक्ष प्रतिककुमार यांनी आज पत्रकारांना सांगितले.

अशोक चव्हाणांची घोळाची परंपरा सुरूच; चांगल्या खात्यासाठी राणे आग्रही
मुंबई, २० फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

काँग्रेसच्या मंत्र्यांची निवड, नंतर खातेवाटपाचा घोळ ही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात सुरू झालेली घोळाची पंरपरा नारायण राणे यांच्यासह तीन मंत्र्यांच्या खातेवाटपातही आज सुरू राहिली. राणे यांना चांगले व महत्त्वाचे खाते पाहिजे आहे. राणे यांचा महसूल खात्यावर डोळा असला तरी डॉ. पतंगराव कदम हे खाते सोडण्यास तयार नाहीत तर नगरविकास खाते सोडण्यास मुख्यमंत्री स्वत:च तयार नसल्याचे कळते. चव्हाण सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी निश्चित करताना शेवटपर्यंत घोळ झाला होता. मंत्र्यांचे खातेवाटप करण्यासाठी मुख्यमंत्री दिवसभर सह्य़ाद्री अतिथिगृहात बसून होते.

बेरोजगारी रोखण्यासाठी रोजगार हमीचा रोख शहरांकडेही वळणार
नवी दिल्ली, २० फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आता शहरांमध्येही पदार्पण करण्याची शक्यता आहे. जागतिक मंदीमुळे शहरांमध्ये नोकऱ्या गमावणाऱ्या लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर युपीए सरकार विचार करीत असल्याची माहिती आज लोकसभेत कामगार मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांनी दिली. जागतिक मंदीपोटी जगभरातील ५ कोटी नोकऱ्या जाणार असून त्याचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसणार आहे. एकटय़ा भारतात दीड कोटी लोकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ येणार आहे.

सरकारच्या विरोधात मंगळवारी दीड लाख डॉक्टरांचा बंद
मुंबई, २० फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

डॉक्टरांवरील हल्ल्यासंदर्भात कठोर कारवाई करणारे विधेयक तयार असूनही राज्य शासनातर्फे ते मंजूर करण्यात टाळाटाळ येत असल्याच्या निषेधार्थ येत्या २४ फेब्रुवारी रोजी राज्यातील दीड लाख डॉक्टरांनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे. या संदर्भात डॉक्टरांनी राज्याचे नवे गृहमंत्री जयंत पाटील यांना त्यांच्या निष्क्रियतेबाबत टीकेचे लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणुकानिमित्ताने कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते हे लक्षात घेऊन सरकारने डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात तात्काळ अध्यादेश जारी करावा, अशी मागणी डॉक्टरांच्या विविध बत्तीस संघटनांनी आज पत्रकार परिषदेत केली.

इस्रोच्या वॉटर रॉकेट स्पध्रेत चेंबूर येथील विद्याíथनीची झेप
मुंबई, २० फेब्रुवारी/प्रतिनिधी

इस्रो आणि नेहरु केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वॉटर रॉकेट स्पध्रेत चेंबूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील अश्विनी पाटणकर या विद्याíथनीने पहिला क्रमांक पटकाविला आहे. नववीत शिकणाऱ्या अश्विनीने तयार केलेल्या वॉटर रॉकेटने १८० फूट उंच झेप घेतली आणि विजयावर शिक्कमोतर्ब केला. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या स्पध्रेत २७ विद्यार्थी सहभागी झाले होते. १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या ९८ विद्यार्थ्यांच्या प्राथमिक फेरीतून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. स्पध्रेची अंतिम फेरी आज येथील पोलीस जिमखाना मैदानात पार पडली. स्पध्रेत आयइएसच्या मॉर्डन इंग्लिश स्कूल मधील संचित जोगळेकर या विद्यार्थ्यांने दुसरा तर बोरिवली येथील सेंट झेविअर्स विद्यालयातील तुषार सावंत याने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तर संपदा कोल्हटकर, अभिजीत मिश्रा, युसूफ बूटवाला, अनिधी उपाध्यय या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. स्पेस आणि रॉकेट सायन्सबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे कार्यक्रमाचे प्रमुख बी. आर. गुरुप्रसाद यांनी सांगितले. तर वॉटर रॉकेट बनविण्याचा अनुभव शालेय विद्यार्थ्यांसाठी फार मोलाचा असल्याचे मत नेहरू तारांगणचे संचालक पीयूष पांडे यांनी व्यक्त केले.

कोलंबोवर एलटीटीईचा हवाई हल्ला
कोलंबो, २० फेब्रुवारी/पीटीआय

श्रीलंकेच्या ईशान्य भागात एलटीटीईविरुद्ध सुरू ठेवलेल्या कारवाईत एकीकडे तेथील लष्कराला यश मिळत असतानाच आज रात्री एलटीटीईच्या दोन विमानांनी चक्क राजधानी कोलंबोवरच हल्ला केला. अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या भागात लष्करी मुख्यालयानजिक एलटीटीईच्या विमानांनी बॉम्बहल्ला केला. ३८ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. एलटीटीईचे एक विमान श्रीलंका लष्कराने पाडले असून त्यातील वैमानिक ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. श्रीलंका लष्करी मुख्यालयानजिक एलटीटीईच्या दोन विमानांनी दोन बॉम्ब फेकले. बॉम्बहल्ला होताच श्रीलंका लष्कराच्या विमानवेधी तोफांनी एलटीटीई विमानांवर प्रतिहल्ला चढविला. त्यामध्ये एलटीटीईचे एक विमान पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोलंबो शहराच्या अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या भागातील महसूल विभागाच्या इमारतीवर एलटीटीईच्या विमानांनी एक बॉम्ब टाकला. हा हल्ला होताक्षणीच कोलंबो शहर व विमानतळ परिसरातील दिवे बंद करण्यात आले. पुष्लमहवे येथून आल्याची शक्यता असलेल्या एलटीटीईच्या दोन विमानांनी कोलंबोवर स्थानिक वेळेनुसार आज रात्री साडेनऊ वाजता हल्ला चढविला असे एलटीटीईचे समर्थन करणाऱ्या पुथिनम डॉट कॉम या वेबसाईटने म्हटले आहे. दरम्यान श्रीलंका हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, उत्तर-पश्चिम मन्नारच्या नजिक दोन संशयित विमाने घिरटय़ा असल्याचे निरीक्षण रडारने नोंदविल्यानंतर हवाई यंत्रणा सतर्क झाली. कोलंबो येथे एलटीटीईच्या विमानांनी हल्ला करण्याच्या काही मिनिटे आधीच मन्नार येथील रडारने या विमानांचा ठावठिकाणा शोधला होता. ही विमाने कोलंबोच्या दिशेने रवाना होत असल्याचे निरीक्षणही रडारने नोंदविले होते.

 


प्रत्येक शुक्रवारी