Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

राजेंद्रसिंग एक यशस्वी पटकथालेखक. हिंदी चित्रपटविश्वात मोठा दबदबा असलेले. निवांत काम करण्याबद्दल त्यांची ख्याती. त्या दिवशी एका चित्रपटासंबंधीची बैठक उरकून ते घराकडे परत निघाले होते.
अलीकडे चित्रपट निर्माते, चित्रपट कंपन्या, सगळे स्टुडिओ बांद्रय़ाच्या खाडीपलीकडे गेलेत. शहर पसरत गेले की त्याचा केंद्रबिंदूही सरकत जातो. राजेंद्रने करिअर सुरू केले तेव्हा चित्रपटाचे सारे काम हाजीअली, महालक्ष्मीच्या परिसरात होत होते. परवा-परवापर्यंत त्याचा माजोरडा संगीतकार दोस्त निर्मात्याला अट घालत असे- ‘हाजीअली के फिल्म सेंटर में गाने बनाऊंगा. उसके आगे बांद्रा-वांद्रा नहीं आऊंगा.’
पण राजेंद्र मुळातच समजूतदार. समोरच्या अडल्यानडल्या निर्मात्याला सांभाळून घेणारा. पैशासाठीही घासाघीस न करणारा. खरं तर साहित्याची, माणसांत मिसळण्याची, चार नव्या अनुभवांना सामोरे जाण्याची इच्छा म्हणून तो हे लिखाणाचे काम करीत असे. वरना, काही जरूरत नव्हती. पूर्वजांनी बांधलेला नेपियन-सी रोडवरील मस्त बंगला होता. चार पैसे गाठीला होते. म्हटले तर निवांत जगता येण्यासारखे होते. आणि चित्रपटसृष्टीच्या ग्लॅमर वगैरेचे त्याला अप्रुपही नव्हते. म्हणूनच स्वत:ची जुनी फियाट स्वत:च चालवीत सर्वत्र फिरण्याची मजा तो घेत असे.
..सिद्धिविनायकाच्या कॉर्नरवरून टर्न मारून गाडी वरळीकडे धावू लागली. निर्मात्याबरोबरच्या बैठकीत घेतलेल्या जिम जिमलेट
 

आणि वर्सोव्याच्या प्रॉन्सचा स्वाद अजूनही जीभेवर होता. रात्रीचे साडेअकरा वाजले असावेत. घरी झोप काही लवकर येणार नव्हती आणि काही वाचण्याचाही मूड नव्हता. तेव्हा त्यांनी गाडी वरळी सी-फेसकडे वळवली. सी-फेसवर येताच वाऱ्याची झुळुक आणि भरतीची गाज ऐकू आली आणि गाडी बंद करून राजेंद्र तसाच काही वेळ बसून राहिला.
गाडीतल्या कॅसेटवरील गझल संपली आणि पाय मोकळे करण्यासाठी तो खाली उतरला. चहा पुन्हा पुन्हा उकळून प्यावा तशी निर्मात्याच्या हॉटेल-रूममधील ए.सी.ची दमट हवा आणि ट्रॅफिकमधील पोल्युशन यापेक्षाही वरळीच्या किनाऱ्यावरील मोकळी हवा निश्चितच हवीहवीशी होती. आणि नेहमीचीसुद्धा!
वर्षांनुवर्षे त्याचा हा परिपाठ होता. एखादी गोष्ट, पटकथा, संवाद यांची जुळणी करायची असेल तर गाडी वरळी सी-फेसला पार्क करून कॉजवेवरून दोन फेऱ्या मारल्या की आराखडा तयार होत असे. नंतर फक्त टाईपरायटरवर बसून टायपिंग करणे बाकी उरत असे. कधी कधी खिशातील छोटय़ा डायरीवर घेतलेल्या काही नोंदीसुद्धा बघाव्या लागत नसत.
आजही नेहमीप्रमाणे राजेंद्र उजवीकडे वळून चालू लागला. वर्दळ कमीच होती. समुद्राकडे तोंडे करून बसलेली दोन-चार जोडपी. बाकांवरती तंबाखू मळत बसलेले पोलीस. शतपावली घालण्यासाठी आलेले मारवाडी आणि त्यांच्या गाडय़ांना टेकून उभे असलेले त्यांचे ड्रायव्हर.. मालकाचा डोळा चुकवून सिगारेट पिणारे. दूरवर गॅसबत्तीच्या प्रकाशात बसणारा त्याचा नेहमीचा पानवाला भय्या. त्या भय्यापर्यंत चालत जायचे नेहमीचे. बनारसी एकसोबिस, पक्का तुकडा, इलायची पान तोंडात टाकायचे आणि मस्त चघळत चघळत हवा खायची.
राजेंद्रची पावले आज जास्तच रमतगमत पडत होती. कदाचित जेवण जास्त झाले असावे, किंवा या हवेने जीनचा इफेक्ट वाढवला असावा. नेहमीच्या स्पीडने आतापावेतो भय्यापर्यंत पोहोचावयास हवे होते. मग आजच का एवढा वेळ लागतो आहे, असे मनात येत असतानाच भय्याकडील गॅसबत्ती अचानक बंद झाली आणि काही कोलाहल ऐकू आला. नकळत चालण्याची गती वाढली आणि राजेंद्र झपाझप पावले टाकत भय्यापर्यंत पोहोचला.
‘सलाम साब, अभी बनाता हूं। अच्छा हुआ आप आ गये, वरना मैं बंद करनेवाला था ठेला..’ म्हणून सराईतपणे त्याची बोटे काम करू लागली. त्याने दिलेले पान तोंडात टाकत राजेंद्रने विचारले, ‘क्या हुवा भय्या, ये भिड कैसी है?’
‘कौन पडेगा इनके लफडे में साब! आजकल धंदा करना भी हराम हो गया है.’
भय्या लगबगीने आपला पसारा पितळेच्या मोठय़ा तबकामध्ये आवरून गॅसबत्ती हातात घेऊन तो निघाला तेव्हा- ‘अरे, पैसे तो ले जावो!,’ म्हणून राजेंद्रने त्याच्या तबकात पैसे टाकले आणि तो त्या गर्दीकडे निघाला.
दोन स्ट्रीटलाइटस्च्या मधल्या काहीशा अंधारलेल्या भागातील बाकावर एक तरुण जखमी अवस्थेत पडला होता. पोटावरती चाकूने भोसकल्याची जखम होती. रक्ताने भिजलेला गुलाबी शर्ट अंगाला चिकटून बसला होता. आत्ता या क्षणी त्याला वैद्यकीय मदत मिळाली तरच त्याचा जीव वाचवता येणार होता. राजेंद्रने दोघा-चौघांना सांगितले की, ‘मी गाडी घेऊन येतो. त्याला बीच कॅण्डीमध्ये घेऊन जाऊ या. कोणीतरी मला मदत करा.. त्याला गाडीत उचलून ठेवण्यासाठी.’
त्याच्या या बोलण्याबरोबर पाण्याचा थेंब पडावा आणि गुळाला चिकटून कडं केलेल्या मुंग्या चारी दिशांनी पळाव्यात तशी माणसं पांगली. राजेंद्रला समजेना- ही माणसं अशी पशूसारखी काय वागताहेत? एका जखमी माणसाला मदत करण्याऐवजी ती हात झटकून निघून का जाताहेत?
कोणीच जवळ नसावं असं वाटत असतानाच मागून एक आवाज आला- ‘मैं चलता हूं साब, आपके साथ!’
‘मैं अभी गाडी लेके आता हूँ, जाते जाते पुलीसवाले बैठे है, उनको भी खबर करते है.’
‘पुलीसवाले राऊन्डअप के गाडी में चले गये साब.’
राजेंद्रने मानेनेच ‘अच्छा है’, म्हणून गाडीकडे धाव घेतली.
दोघांनी मिळून त्या जखमी तरुणाला गाडीत घातले तेव्हा तो ‘पाणी.. पाणी’ करून डोळे फिरवीत होता. गाडीतील पाण्याच्या बाटलीने त्याच्या तोंडात पाणी सोडत तो दुसरा माणूस म्हणाला, ‘मैं भी आता हूँ साब, आपके साथ.’
राजेंद्र त्याला म्हणाला, ‘आप पिछे बैठो. मैं गाडी तेज ले चलता हूँ.’
गाडीने वेग घेतला आणि राजेंद्रच्या डोक्यात या वाढत चाललेल्या आणि माणुसकीहीन होत जाणाऱ्या शहराचे बकालपण पिंगा घालू लागले.
ब्रीच कँडीच्या पोर्चमध्ये गाडी आली आणि ओ.पी.डी.मधील नर्सने समोर फॉर्म ठेवला.. ‘जखमीचं नाव काय? तो आपला कोण? वय काय? काय झालं? कुठे झालं? केव्हा झालं?’
डय़ुटीवरील हवालदार ‘काय कटकट आहे! झालं झोपेचं खोबरं!’ असा भाव चेहऱ्यावर घेऊन रजिस्टर घेऊन आला. ‘हे सर्व होत राहील. तुम्ही प्रथम त्याला मदत करा,’ असं राजेंद्र म्हणाला. तेव्हा पोलीस निर्विकारपणे म्हणाला, ‘त्यो मदतीच्या पलीकडे गेला आहे. आता तुम्हाला मदतीची गरज पडणार. डेड बॉडी घेऊन आलात राव!’
राजेंद्रला एक मिनिट काय बोलतोय हा, हे समजेच ना! त्याने वळून बरोबर आलेल्या माणसाकडे पाहिले आणि त्याने मानेनेच होकार भरला. हॉस्पिटलमध्ये डेड बॉडी घेऊन जाणे म्हणजे काय असतं, आणि त्यात भर म्हणून ती व्यक्ती ना नात्यातली, ना पात्यातली- म्हणजे काय दिव्य असतं, ते राजेंद्रला जवळून अनुभवता आलं. सोबत तो अनोळखी माणूस होता म्हणून बरं! त्यात पुन्हा सिनेमा क्षेत्रातलं कर्तृत्व! कधीकाळी तो राज कपूरला आजारी असताना भेटावयास आल्याचे नर्सला आवर्जून आठवले. पोलीसदादा रसिक निघाला. चार-दोन पिक्चरची नावं त्यालाही माहीत होती. हे सगळं असलं तरी अर्धी रात्र कागदपत्रांमध्ये गेली. रायटर असोसिएशनचे कार्ड इतके उपयोगी पडेल, हेही त्याला कधी वाटलं नव्हतं. घरी येऊन अंथरुणावर पडायला पहाट झाली.
पुढे हा समाजकार्याचा उपद्व्याप चारएक महिने रेंगाळत राहिला.
कामं नेहमीप्रमाणे चालली होती. ‘एक रात- तुम्हारे नाम’ म्हणून राजेंद्रने ही घटना त्या बेवारस व्यक्तीच्या नावे धर्मादाय खात्यात टाकली होती. पुन्हा चार-पाच महिन्यांनी बांद्रय़ाकडून बैठक उरकून तो वरळी सी-फेसवर शतपावलीसाठी आला होता. दूरवर दिसणाऱ्या भय्याच्या ठेल्याच्या दिशेने त्याची पावले पडू लागली. भय्याच्या ठेल्याजवळ येताच हसतमुख भय्याने तोंडातील पानाचा तोबरा सांभाळत राम-राम केले आणि त्याचे नेहमीचे पान लावू लागला. पानाला चुना, कथ्था आणि तंबाखूचे मिश्रण लावून भरण्यासाठी ठेवत भय्या म्हणाला, ‘साहब, सुना है- आपको बहुत तकलीफ हुई, उस रातके मामले में?’
‘अरे हां, वो तो होनीही थी. मगर इतना तो आदमीको आदमीके लिए करना चाहिए ना? वरना हम सिर्फ फिल्मों में आदर्शवाद की बाते करते रहेगें!’
‘सही है साब.’
‘भय्या, मेरी समझ में नही आ रहा है की, इस शहर का क्या हाल होगा दस सालों के बाद! एक जमाना था- जब मुंबई के जिंदादिली की मिसाल दी जाती थी. और उस दिन मैंने लोगों को मदत करने के लिए कहा तो वो चूहों की तरहा भाग पडे सब साले. अच्छा हुवा- एक बंदा मदद के लिए तय्यार हुआ!’
भय्याने तोंडातली गुळणी मागच्या बाजूला टाकली. राजेंद्रला वाटले, हा आता आपण का गाशा गुंडाळून पळून गेलो म्हणून सफाई देणार. तोच भय्या म्हणाला, ‘सच तो ये है की, आपके साथ मदत करने जो आया था- उसीने छुरा घोंपा था उस आदमी के पेट में! उसे डर था के अस्पताल में वो कही बच ना जाये! आप तो गाडी चला रहे थे. पिच्छे बैठकर शायद उसीने जख्मी का गला घोट दिया हो! आप जैसे शरीफ आदमी के साथ वो भी गुन्हेगारसे गवाह बन गया आसानीसे!’
राजेंद्रला आपण काय ऐकत आहोत, हेच कळेना. हा काही त्याच्या एखाद्या पटकथेचा शेवट नव्हता.. हे वास्तव होते!
रघुवीर कुल