Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

केवढं कौतुक म्हणायचं हे! आणि तेही थेट मूकपटापासून ते रंगीत बोलपटापर्यंतचा प्रदीर्घ जमाना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहिलेल्या ‘रणजीत मूव्हिटोन’च्या साक्षात् मालकाकडून! असं कोडकौतुक होण्यासाठी भाग्यही तेवढंच जबरदस्त असावं लागतं म्हणा! कारण त्या कौतुकासोबत अशा थोरामोठय़ांचे आशीर्वादही आपल्याला लाभदायक ठरतात. शिवाय त्या दिवशी वाढदिवस असेल तर कापलेल्या केकचा घास अशा बुजुर्ग व्यक्तीने भरवला तर त्याची गोडी काय वर्णावी?
इथे दिसताहेत ते आजोबा कदाचित ओळखीचे वाटणार नाहीत, पण निदान त्या उत्सवमूर्तीची ओळख पटणं फारसं अवघड वाटू नये. राज कपूरच्या ‘बूट पॉलिश’मध्ये याच चिमुरडीला जॉनचाचाने सवाल केला होता.. ‘नन्हे मुन्न्ो बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है?’ पण आता त्या चिमुरडीच्या नावापूर्वीची ‘बेबी’ ही उपाधी जाऊन फक्त ‘नाझ’ एवढंच नाव घेण्याची वेळ या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांवर आली होती. ‘रम्य ते बालपण’ संपून तारुण्याच्या उंबरठय़ावर पाऊल ठेवण्याचा तो दिवस होता- २० ऑगस्ट १९५८.
 

त्या दिवशी नाझने चौदाव्या वर्षांत पदार्पण केलं. त्यानिमित्ताने आपल्या निवासस्थानी मोजक्याच पाचपन्नास व्यक्तींच्या उपस्थितीत तिने विमानाच्या आकाराचा भलामोठ्ठा केक कापला. आता ती आपल्या करिअरची उत्तुंग भरारी घेणार, याचंच ते द्योतक असावं. तिचे लाडके राज अंकल पुढच्या वर्षी तिला स्वित्र्झलडला पाठवणार असून, तिथून परतल्यावर त्यांच्याच चित्रपटात तिला सर्वप्रथम नायिकेची भूमिका देणार आहेत, ही गोड बातमी प्रत्येकाला सांगताना तिचा उत्साह नुसता ओसंडून चालला होता.
अशा शुभप्रसंगी फिल्म इंडस्ट्री कोळून प्यालेल्या सरदार चंदूलाल शहांकडून असा आशीर्वाद लाभणं, ही साधी गोष्ट नव्हतीच. ज्यांनी सैगलपासून राजेंद्रकुमापर्यंत व्हाया राज कपूर- दिलीपकुमार- देव आनंद असे समस्त नायक आपल्या ‘रणजीत’मध्ये चमकवले.. असंख्य नायिका, संगीतकार, दिग्दर्शक फिल्म इंडस्ट्रीला बहाल केले, त्यांना ‘सरदार’च म्हणायला हवं. पण ते ‘शेठजी’ म्हणूनच ओळखले जायचे. आभाळाएवढा मोठा माणूस! एका जमान्यात काय त्यांची शान होती! ‘रणजीत’मध्ये राबणाऱ्या शेकडो कामगारांचा हा पोशिंदा त्यांच्या अडचणींच्या वेळी नेहमी धावून जायचा. शेठजी रेसचे शौकिन. हातात पाण्यासारखा पैसा खेळवला.. तोही स्वस्ताईच्या जमान्यात. मोतीलाल त्यांचा अत्यंत लाडका नायक. तोही रेसचा वेडा. एकदा म्हणे तो कफल्लक होऊन परतला. खिशात दमडा नाही. पठ्ठय़ाची झोप उडाली. मध्यरात्री न राहवून त्याने शेठजींना फोन लावला आणि चक्क लाख रुपयांची मागणी केली. सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी शेठजींचा माणूस हातात लाख रुपयांची बॅग घेऊन मोतीलालचा दरवाजा वाजवत होता. आता बोला!
पण शेठजींनी कहर केला तो सैगलबाबत. कलकत्त्याच्या ‘न्यू थिएटर्स’चे चित्रपट आपल्या सदाबहार गाण्यांनी गाजवणाऱ्या सैगलने आपल्या ‘रणजीत’मध्ये भूमिका करून तशीच गाणी म्हणावीत, यासाठी शेठजींनी ‘भक्त सूरदास’साठी (आठवा- खुर्शीदचं एव्हरग्रीन सोलो- ‘पंछी बावरा’) त्याला कलकत्त्याहून मुंबईला येण्याचं आमंत्रण दिलं. त्याच्यासाठी रेल्वेचा फर्स्ट क्लासचा सबंध डबा रिझव्‍‌र्ह केला. शेठजींचा स्टुडिओ दादर पूर्वेला होता. सैगलचं दादर स्टेशनवर आगमन होताच खास बॅण्डपथकाद्वारे त्याचं जंगी स्वागत करून सैगलची स्टुडिओपर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात शेठजींनी जराही कसूर ठेवली नव्हती. चाळीस साली ही अभूतपूर्व मिरवणूक पाहायला लोकांनी तोबा गर्दी केली असणार, यात नवल नाही.
काही गोष्टी अनाकलनीयच असतात. ढिगाने सिनेमांचा रतीब टाकणाऱ्या ‘रणजीत’च्या कुठल्याही चित्रपटात नाझने भूमिका केल्याचं आठवत नाही. खरं तर कान्सच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट बालकलाकार म्हणून बक्षीस पटकावणाऱ्या बेबी नाझची शेठजींनी जराही दखल घेऊ नये, याचं आश्चर्य वाटतं.
आज दोघंही हयात नाहीत. तरीही त्यांच्याबाबतचा एक समांतर दुवा लक्षात येतो. कारकीर्दीच्या पूर्वार्धात पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान मिळूनही दोघांची अखेर दारुण उपेक्षेत झाली. लवकरात लवकर ‘हीरॉइन’ बनण्याच्या घाईने नाझला सी ग्रेड चित्रपटांच्या पंक्तीला नेऊन बसवलं. आणि इकडे रेस, मद्य, जुगार यांच्या नादाने शेठजींचाही निष्कांचन अवस्थेत मृत्यू झाला. समाधानाची बाब एवढीच की, त्यांना दीर्घायुष्य तरी लाभलं. नाझच्या नशिबी तेवढंही आलं नाही. जेमतेम पन्नाशी ओलांडणाऱ्या नाझने आपल्या बालपणी भलेही मोठय़ा रुबाबात ‘मुठ्ठी में है तकदीर हमारी’ असं जॉनचाचाला उत्तर दिलं खरं; पण तिचं नशीबच फाटकं होतं, त्याला कोण काय करणार?
विजय शिंगोर्णीकर