Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

नमस्कार, आमच्या ‘बोलके बाहुले’ या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला येत आहेत- महाराष्ट्रातील एक धडाडीचे नेते. ७२ दिवस काँग्रेसच्या बाहेर राहून आता ते परत काँग्रेसमध्ये परतले आहेत. सुरेश भटांची एक अप्रकाशित गझल आहे, त्यात ते म्हणतात-
‘ते आत गेले, बाहेर आले, पुन्हा आत गेले
एकच घोडे, गंगेच्या पाण्यात, पुन्हा पुन्हा न्हाले’
तर मंडळी, ते आले आहेत. आपण त्यांच्याशीच बोलूया..
‘नमस्कार..’
‘नमस्कार.. तुम्हाला आणि माझ्या लाखो चाहत्यांनाही.’
‘आता कसं वाटतं तुम्हाला?’
‘बाहेर खूप ऊन होतं कडक. आत गारगार वाटतं.’
‘म्हणजे तुम्ही आमच्या स्टुडिओबद्दल बोलता आहात का?’
‘मग? तुम्ही कशाबद्दल विचारलं होतं?’
‘मी एकूण परिस्थितीबद्दल विचारलं होतं..’
‘एकूण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.’
‘आता मी जरा स्पष्टच विचारते..’
‘मलाही स्पष्टच आवडतं.. एक घाव, तीन तुकडे!’
‘दोन तुकडे म्हणायचं आहे का तुम्हाला?’
‘नाही, तीनच म्हणायचं आहे. पहिलं म्हणजे एका घावात दोनच तुकडे पडत असतील, तर माझ्यात आणि इतरांच्यात फरक काय
 

राहिला? आणि दुसरं म्हणजे मला तीन तुकडे पाडावेच लागतात. दोन राजपुत्र आहेत माझ्या घरी!’
‘आता मी जरा स्पष्टच विचारते..’
‘मलाही स्पष्टच आवडतं.. उगा सोलकढीला जाऊन भांडं कशाला लपवावं माणसानं..?’
‘तुम्हाला, ताकाला जाऊन.. असं म्हणायचं आहे का?’
‘छे हो! आमच्या कोकणात कुठं दूधदुभतं आहे ताक होण्याएवढं? आमच्या इथं कोकम आणि नारळ! म्हणून आम्ही ही म्हण बदलून घेतली आमच्या सोयीप्रमाणं. तुम्ही बोला स्पष्ट!’
‘तुम्हाला पक्षात परत घेण्यासाठी एवढा विलंब का लावला गेला? तुम्हाला पुरतं नमवून मगच पक्षानं दार उघडलं, असं म्हटलं जात आहे..’
‘अहो, पक्षाची एक शिस्त असते. आमच्या पक्षानं मुख्यमंत्र्याला काढायला ७२ तास घेतले. नवा मुख्यमंत्री नेमायला ७२ तास घेतले. मग त्याच हिशेबानं मला पक्षात घ्यायला ७२ दिवस लावणं हे सुसंगतच नाही का?’
‘म्हणजे या हिशेबानं तुम्हाला मुख्यमंत्री करायला पक्ष ७२ महिने- म्हणजे सहा र्वष लावणार का आता?’
‘तुमच्या या प्रश्नावर मी ७२ मालवणी शिव्या देऊ शकतो. परंतु सध्या मी गप्प राहायचं ठरवलं आहे.’
‘आपले पाहुणे मनातल्या मनात मालवणीची उजळणी करीत आहेत, तोवर आपण घेऊ या एक छोटासा ब्रेक!’

‘ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत.. ‘आम्हाला सांगा, मराठी म्हणींमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनं बदल करून घेतले, तसाच ‘स्वाभिमान’ शब्दाचा अर्थ तुम्ही काही वेगळा केला आहे का?’
‘मी एकदा सांगितलंय की, त्यावेळी माझ्याकडून चुकून चूक झाली आणि मी संतापाच्या भरात काहीतरी बोलून गेलो. आता पुन्हा इतिहासात जायची माझी इच्छा नाही.’
‘तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. पण मी असं विचारत होते की स्वाभिमान..’
‘आता एकदा पक्षानं परत प्रवेश दिला आहे, तेव्हा पक्षश्रेष्ठी सांगतील ती जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे. माझं आता कोणाशीच भांडण नाही.’
‘या तुमच्या भूमिकेचं स्वागतच केलं पाहिजे. परंतु तुम्ही जेव्हा स्वाभिमान..’
‘तुम्ही एक लक्षात घ्या की, सगळ्यांनीच माझं स्वागत केलं आहे आणि माझ्या प्रवेशामुळे पक्ष बळकट झाला असल्याचं म्हटलं आहे.’ (तेवढय़ात ‘अँकर’च्या इअर फोनवर कंट्रोलरूममधून सूचना आली.. ‘अगं, ते स्वाभिमानाचं वगैरे जाऊ दे.. पुढला प्रश्न विचार त्यांना!’)
‘बरं स्वाभिमानाचं आपण सोडून देऊ. तुमचे एक जुने सहकारी त्यांच्या जुन्या साहेबांना जाऊन भेटले. त्याबाबतीतही तुमची चुकून चूक झाली असं काही वाटतं का तुम्हाला?’
‘सध्यातरी वाटत नाही.’


‘आता शेवटचा एकच प्रश्न- तुम्ही पुण्यात जाऊन ‘अनेकांपैकी एका’ भावी पंतप्रधानांची भेट घेतली, ती नेमकी कशासाठी होती?’
‘मी खरं सांगतो, पण तुम्हाला ते खरं नाही वाटणार.’
‘तुम्ही सांगा ना, आम्ही ते खरं मानू.’
‘सांगू?’
‘हो. सांगा.’
‘मला मालवणात उसाची लागवड करायची आहे, त्याविषयी त्यांचं मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो..’
‘तुम्ही स्टुडिओत आलात, त्याबद्दल धन्यवाद. (प्रेक्षकांना) तर हे होते आजचे बोलके बाहुले. आता आपण वाट पाहू या मालवणात साखर कारखाना केव्हा निघतो त्याची. नमस्कार!