Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

।। पाषाण ‘प्रस्तर’, ग्रावोपलाश्मान: शिला दृषत्।।
अमरकोशातली ही एक नामावली- ज्यामध्ये ‘दगड’ ही एकच गोष्ट, वस्तू निरनिराळ्या पद्धतीने, तऱ्हेने व्यक्त केली गेली आहे. पुणे विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे दगडांवरचे संग्रहालय पाहिले आणि कधीकाळी वाचलेल्या या विचारांची आठवण झाली.
सामान्यत: ‘दगड’ म्हटले की निर्जीव, निर्विकार, कठोर, कोरडा, रुक्ष अशाच आविर्भावाची वस्तू डोळ्यांसमोर येते. पण या सगळ्या रूढ कल्पनांना या संग्रहालयात पाऊल टाकले की छेद मिळतो. वेगवेगळ्या दगडांपासून बनवलेला एक मानवी पुतळा इथे दाराशीच भेटतो आणि समोरच्या वास्तूत काय दडले आहे, याचा पाटी न वाचताही अंदाज येतो- भूगर्भशास्त्र संग्रहालय!
या विभागाच्या निर्मितीबरोबरच १९७२ साली हे संग्रहालय सुरू झाले. दगड या गोष्टीसंबंधातील अभ्यास व संशोधनासाठी या
 

संग्रहालयाची निर्मिती झाली. शाळेत कधीतरी शिकलो होतो- खडकांचे तीन प्रकार. अग्निजन्य, स्तरीय आणि रूपांतरित! पण ही पुस्तकी माहिती फक्त परीक्षेपुरतीच राहिली आणि दगड हा एक ‘दगड’च उरला! पण आज त्याच विश्वात पुन्हा नव्याने पाऊल टाकताच अवघे ब्रह्मांड उभे ठाकले!
दगडाची ही कथा सुरू होते अगदी पृथ्वीच्या निर्मितीपासून! ४६०० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. निर्मितीच्या या सुरुवातीच्या काळातच हजारो ज्वालामुखींनी वर पृष्ठभागाकडे उसळी मारली. या लाव्हारसातून पृष्ठभागावर आणि अंतरंगात दोन्हीकडे अग्निजन्य खडकांची निर्मिती झाली. या अग्निजन्य खडकांतील बदलांतूनच पुढे स्तरीय आणि रूपांतरित खडकही तयार झाले. वेगवेगळ्या भौगोलिक, रासायानिक व अन्य काही कारणांनी या खडकांचे एकमेकांवर थर जमा होऊन स्तरीय खडक तयार होतात. रूपांतरित खडक म्हणजे अग्निजन्य खडकांचेच बदललेले रूप! पृष्ठभागावरील अग्निजन्य खडक काही कारणांनी पृथ्वीच्या पोटात गाडले गेले तर तिथले भिन्न तापमान आणि पृष्ठभागावरील खडकांचा दाब त्यांच्यात बदल घडवून आणतो. हेच बदललेले नवे खडक म्हणजे रूपांतरित खडक!
दरम्यान, पृथ्वीच्या पोटातील या खडकांमध्ये ते तयार होत असतानाच विविध कारणांनी काही पोकळ्या तशाच राहिल्या. ज्यात या लाव्हारसातील ‘मिनरलायझिंग फ्लुइड्स’ पसरतात आणि थंड झाल्यावर त्यांचीच ‘खनिज स्फटिके’ बनतात. दगडांवर स्फटिकांसारखे चमचमणारे सौंदर्य दिसते, ते हेच! तर दुसरीकडे अनेकदा पृथ्वीवरील उलथापालथींत सजीवसृष्टी गाडली जाते, नष्ट होते. या मृत जीवांच्या अस्थींचे ठसे तसेच मातीत मिसळतात आणि कालांतराने या आकाराचेच तयार होतात जीवाश्म. दगडांच्या अभ्यासातील हा एक महत्त्वाचा घटक. असे हे खडक, खनिज स्फटिके आणि जीवाश्मांचे दर्शन म्हणजे हे संग्रहालय!
अशा दगडांचे इथे एकूण चार हजार नमुने आहेत. प्रकार-आकार, रंग-रूप, काळ-वेळ, क्रिया-प्रक्रिया आणि खनिज-धातू अशा विविध मोजपट्टय़ांनी ते निवडलेत, मांडलेत. प्रत्येकालाच काहीतरी स्वतंत्र गुणधर्म, वैशिष्टय़, रचना आणि सौंदर्य आहे. या प्रवासाची सुरुवात होते ती खडकांपासून. एकटय़ा अग्निजन्य खडकाचे इथे २५ प्रकार आहेत. यातच येतो आपला बेसाल्ट ऊर्फ काळा पाषाण! त्याचेही पुन्हा पाच-दहा प्रकार. कपौंड फ्लो, सिंपल फ्लो अशा शास्त्रीय नावांचे. एक दगड अगदी पिरगळल्यासारखा दिसतो. हा एक रूपांतरित खडक. पृथ्वीच्या पोटातील भिन्न तापमान आणि पृष्ठभागावरील अन्य खडकांचा दाब यामुळे या बिचाऱ्याची अशी अवस्था झालीय. स्तरीय खडक पाहताना ‘तरंगतळ’ नावाची एक जादू मध्येच अडवते. हा वालुकामय दगड! पण तो तयार होत असतानाच त्यावर हवेने किंवा पाण्याने आपले तरंग उमटविले आणि कालौघात ते घट्टही झाले. आहे की नाही गंमत!
खडकांची ही गंमत पाहत असतानाच पुढची स्फटिक खनिजांची नखरेल दुनिया खुणावत असते. झिओलाइट्स, कॅल्साइट, क्लोराइट, क्वार्ट्झ अशा खनिजवर्गाचा हा पाषाणातील सौंदर्यमेळाच जणू. यातच मेसोलाइट आणि स्कोलेसाइट नावाची दोन खनिजे पुढे येतात. दगडाला तुरे फुटावेत असे त्याचे चित्र. सुईप्रमाणे पातळ, टोकदार व काचेसारखे पारदर्शक! ओकेनाईट नावाचे खनिज स्फटिक म्हणजे जणू काळ्या पाषाणावर स्फटिकांचा बारीक थर आणि त्यावर जागोजागी कापसांची बोंडे. अ‍ॅपोफिलाइट स्फटिक रचना म्हणजे जणू पांढऱ्याशुभ्र मोत्यांवर पाचू जडवलेले. इथेच काही क्वार्ट्झ, पट्टेरी अ‍ॅगेटही दिसतात. एका ‘अ‍ॅगेट’वर झेब्राच्या त्वचेच्या रंगसंगतीचे पट्टे दिसतात म्हणून त्याचे नाव ‘बॅन्डेड झेब्रा अ‍ॅगेट’. खरे तर ही सारी खनिजरत्ने त्यांच्या रंग, रूप व आकारांनी मोहून टाकणारी. त्यांच्याकडे पाहताना त्यांची निर्मिती, रसायने, खनिजे आदी वैज्ञानिक कारणमीमांसेपेक्षा या सौंदर्यातच अडकायला होते. पाषाणातील रत्नांचा हा बाजार भुलवून टाकतो. पण एक गोष्ट खटकते, ती म्हणजे- हे सारे आमच्या मुलुखातले सौंदर्य; पण आजही त्यांची ओळख अशी परकीय भाषेच्या दावणीला का? स्टिलबाइट, स्टेलेराइट, मॉर्डेनाइट, मेसोलाइट हा असा प्रवास किती दिवस चालणार? वैज्ञानिक विषयांवरची संग्रहालये पाहताना लोकभाषेतून संवाद नसणे, ही अडचण इथेही जाणवली.
खनिजांच्या या दुनियेनंतर येतात ती जीवाश्मं! प्राचीन काळी नष्ट झालेल्या या सजीवसृष्टीच्या जीवाश्मांतून तो काळ, त्यावेळेची भौगोलिक स्थिती, वातावरणातील बदल, सजीवसृष्टीतील उत्क्रांती आदी अनेक गोष्टींचा अभ्यास करणे शक्य होते. काहीशे दशलक्ष वर्षांपूर्वीचे अमोनाइड्स, ट्रायलोबाईट्ससारखे प्राणी आजही आपल्याला या जीवाश्मांमधून कळतात. तत्कालिन वनस्पती त्यांची माहिती पुरवतात. कधीकाळी जीवावशेष असलेले हे घटक आज त्या छापाचे जीवाश्म बनलेत. दगडांचा हा अभ्यास जणू साऱ्या सृष्टीचेच गणित सोडवू पाहतो.
एकूणच हा दगडांचा बाजार- त्यांचीच अनेक रहस्ये सोडवू पाहतो. पृथ्वीचे कवच, पाण्याचे साठे, धातू-खनिजांची निर्मिती, बांधकामातील साधने आणि कला-कलाकृतींचा हातभार असणाऱ्या या दगडांची ही दुनिया! यापुढे कुठलीही गोष्ट ‘दगड’ म्हणून सोडून द्यायची, की नावे ठेवण्यातली नाही, हाच विचार या संग्रहालयातून बाहेर पडताना कायम होतो!
(भूगर्भशास्त्र संग्रहालय, भूगर्भशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे, दूरध्वनी- ०२०-२५६०१३६१. हे संग्रहालय कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी मोफत खुले आहे.)
अभिजित बेल्हेकर
abhilbelhekar@gmail.com