Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

‘फॉलोइंग द इक्वेटर’ या ग्रंथात प्रवासवर्णन लिहिताना मार्क ट्वेननं एक ऐतिहासिक निरीक्षण नोंदवून ठेवलं आहे. ट्वेन बहुधा त्या प्रवासात मॉरिशसमध्ये गेला होता. पृथ्वीच्या नकाशावर अक्षरश: ठिपक्याएवढं दिसणारं, परंतु ‘भूतलावरचं नंदनवन’ म्हणून ओळखलं जाणारं ते नितांत रमणीय असं बेट पाहिल्यानंतर मार्कच्या लेखणीतून ते निरीक्षण कागदावर उतरलं होतं. त्यानं म्हटलं होतं, ‘परमेश्वरानं स्वर्गाची निर्मिती करण्याच्या आधी आपली सारी कल्पकता वापरून मॉरिशसची निर्मिती केली आणि नंतर त्या धर्तीवर स्वर्ग निर्माण केला..’
यातला अतिशयोक्तीचा भाग सोडून द्यायचा; पण हिरवीगार वनश्री, छोटय़ा छोटय़ा टेकडय़ा, नितळ पारदर्शी समुद्रकिनारा, जागोजागी दिसणारी इंद्रधनुष्यं, रत्नभांडारातील रत्नं वाटावेत असे विविध रंगांचे शिंपले आणि मॉरिशसच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नद्या,
 

तलाव, धबधबे आणि झरे पाहिल्यानंतर मार्कचं ते निरीक्षण ‘म्हण’ बनून मॉरिशसवासीयांत का लोकप्रिय बनलं असावं, याची खूणगाठ मनाशीच पटते..

टिकलीएवढय़ा देशांत मोडणारा ‘मॉरिशस’ हा असा.. हिंदी महासागरात आफ्रिकेजवळ वसलेला.. मादागास्करपासून ९०० किलोमीटरवर, कोलंबोपासून ३,५०० किलोमीटरवर आणि मुंबईपासून तब्बल ४,००० किलोमीटरवर असणारा. पण तरीही जगभरातल्या पर्यटकांना वेड लावणारा! मॉरिशसचं एकूण क्षेत्रफळ २,०४० चौरस किलोमीटर. लोकसंख्या २००७ च्या जनगणनेनुसार १२ लाख ६४ हजार. म्हणजे लोकसंख्येची घनता एका चौरस किलोमीटरला अवघी ६१६. साक्षरतेचं प्रमाण जवळपास ८३ टक्के.
मॉरिशसला ‘छोटासा भारत’ असंही म्हटलं जातं. त्याचं कारण अर्थातच दडलं आहे ते इतिहासात.. प्रभू रामचंद्रानं रावणाचा पराभव केला तेव्हा मारिच राक्षसाचे वंशज श्रीलंकेतून पळाले, ते या बेटावर येऊन राहिले. नावच नसलेलं ते बेट मग ‘मारिच’मुळे मॉरिशस म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण ही आहे लोककथा..
फार पूर्वी भारतीयांनी या बेटाचं नाव ठेवलं होतं- ‘द्वीप’! अरबांनी ताब्यात घेतल्यावर त्यांनी त्याला नाव दिलं- ‘दिनामगरबी’! पोर्तुगीजांनी त्याला म्हटलं- ‘सेने’! नंतर आलेल्या डचांनी त्याला नाव ठेवलं- ‘मॉरिशस’! त्यानंतर आलेल्या फ्रेंचांनी त्याला नाव दिलं- ‘फ्रान्सचे द्वीप’ अर्थात् ‘आइल द फ्रान्स’! मग इंग्रजांनी त्याला पुन्हा नाव दिलं ते ‘मॉरिशस’! पुढल्या वर्षी त्याला २०० र्वष पूर्ण होतील.
हिंदू धर्म हा मॉरिशसचा मुख्य धर्म. कारण इथलं हिंदूंचं प्रमाण आहे- ५३ टक्के. त्यांच्या खालोखाल ख्रिश्चन.. ३२ टक्के. त्यातले कॅथलिक २४ टक्के. इस्लाम तिसऱ्या क्रमांकावर. त्याचं लोकसंख्येतलं प्रमाण १४ टक्के. फ्रेंचांनी शेती करण्यासाठी मजूर हवेत, म्हणून मादागास्करमधून गुलामांना मॉरिशसमध्ये आणलं. पुढे या गुलामांच्या आणि फ्रेंचांच्या मिश्रणातून जी नवी जात जन्माला आली ती ‘क्रिओल’! त्यांची भाषा फ्रेंच भाषेचं भ्रष्ट रूप मानली जाणारी. तिचं नावही- क्रिओलच!
क्रिओलची गंमत अशी की, खेडय़ातली क्रिओल वेगळी आणि शहरातली क्रिओल वेगळी. खेडेगावांत क्रिओलमध्ये भोजपुरी शब्दांचा भरणा अधिक. अलीकडे तर त्यात मराठी-तेलुगू या भारतीय भाषांबरोबरच इंग्रजी, चिनी शब्दही आलेले आहेत. पण इंग्रजी ही मॉरिशसची मुख्य आणि अधिकृत भाषा. सारं सरकारी कामकाज याच भाषेत चालतं. शिक्षणक्षेत्रात इंग्रजीबरोबरच फ्रेंच ही भाषाही माध्यम म्हणून वापरली जाते. मॉरिशसच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये वरचष्मा दिसतो तो फ्रेंचचा. मॉरिशसच्या संसदेमध्येही कुणाही सदस्याला फ्रेंचमधून संवाद साधायला रीतसर परवानगी असते.

मॉरिशस छोटा- छोटा म्हणजे किती छोटा असावा? बसने किंवा टॅक्सीने फिरायचे ठरवले तर अख्ख्या देशाला एका दिवसात फेरी मारता येते. काही वर्षांपूर्वी इथं रेल्वेही होती; पण एवढय़ाशा देशाला रेल्वेची गरजच काय, असं सगळ्यांनाच वाटायला लागल्यानं रेल्वे बंद झाली. नऊ जिल्हे आणि पाच मोठी शहरं- एवढंच काय ते मॉरिशस! पोर्ट लुई हे त्यातलं सर्वात मोठं- राजधानीचं शहर. अर्धवर्तुळाकृती डोंगरांनी घेरलेलं आणि एका बाजूनं समुद्राचा आधार लाभलेलं असं हे शहर फ्रान्सचा राजा चौदावा लुई यानं वसवलं. बंदर असल्यानं ते ‘पोर्ट लुई’ बनलं.
मॉरिशसमध्ये डोंगरांची शिखरंही वैशिष्टय़पूर्ण आहेत. पोर्ट लुईच्या वायव्येला ‘मोका’ नावाची डोंगरमालिका आहे. यात ‘पीटर बोथ’ नावाचं एक शिखर आहे. २,५०० फूट उंचीचं हे शिखर माणसाच्या डोक्याच्या आकाराचं आहे. पीटर बोथ हा डच अधिकारी होता. १७ व्या शतकात मॉरिशसला येताना त्याचं जहाज वादळात सापडलं आणि मोडून गेलं. त्याच्या स्मरणार्थ या डोंगराला हे नाव दिलं गेलं आहे.
असंच एक शिखर ‘पाऊस’ नावाचं. २,७५० फूट उंचीचं. ‘पाऊस’ या शब्दाचा इथल्या भाषेतला अर्थ आहे- अंगठा. हे शिखर दिसतंही अंगठय़ासारखंच. समारेल डोंगर हा इथला आणखी एक चमत्कार. या एकाच डोंगरावर सात रंगांची माती पाहायला मिळते. जगात असं कुठेही आढळत नाही. याचं कारण मात्र मोठं गमतीदार दिलं जातं. थकला-भागलेला सूर्य म्हणे एकदा विश्रांतीसाठी निघाला. सजीव सृष्टी असेल तिथं सूर्याला विश्रांती घेणं शक्यच नव्हतं. मग म्हणे- दिसायला सुंदर आणि तरीही सजीव प्राणी नसणारी अशी ही जागा नारदमुनींनी शोधून काढली. सूर्य आपल्या सात घोडय़ांच्या रथातून येऊन इथं विश्रांतीसाठी राहिला. त्या सात घोडय़ांचे खूर डोंगराला जिथे लागले, तिथली जमीन सप्तरंगी झाली, असं मानलं जातं.
पण ज्वालामुखीच्या विस्फोटानं हा प्रदेश निर्माण झाला असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं असल्यानं असे सात रंग दिसत असावेत, असाही एक तर्क आहे. हा सगळा डोंगर हिरवागार आहे. पण या डोंगरावर जिथे सप्तरंगी माती आहे, तिथे मात्र गवताचं साधं पातंही उगवताना दिसत नाही, हे त्याचं आणखी एक वैशिष्टय़.

मॉरिशसचं दरडोई सरासरी उत्पन्न १० हजाराहून अधिक डॉलर्स इतकं आहे. त्यामुळे सुखवस्तूंची वाढती संख्या. मोटारीही स्वस्त. राहायला घर नाही, खायला अन्न नाही, नेसायला वस्त्र नाही- असा माणूस मॉरिशसमध्ये अपवादानंच सापडेल. त्यामुळे इथे भिकारी जवळजवळ नाहीतच. फुटबॉल हा इथला लोकप्रिय खेळ. पण आवडता छंद म्हणाल तर तो हरिणांच्या शिकारीचा. मॉरिशसच्या अरण्यात हिंस्र पशू नाहीत. त्यामुळे शिकारीला जाणाऱ्यांना भीती अशी नाहीच. अनेक घरांमध्ये हरणांची मुंडकी पेंढा भरून ठेवलेली सर्रास आढळतात.
वादळं ही इथं नेहमीचीच बाब! त्यांची नावं मात्र त्यांच्या वेगावरून दिली जातात. १८८२ सालच्या वादळानंतरचं मोठं वादळ १९६० चे. त्यानंतरही हॉलंड (१९९४) आणि डायना (२००२) ही भयानक वादळं मॉरिशसला झोडपून गेली. वादळाचा शे-दीडशे मैलांचा वेग नेहमीचाच. या प्रत्येक वादळात वित्तहानीबरोबरच जीवितहानीही झाली. गावांचं रंगरूपही पार बदलून गेलं..
मॉरिशसमध्ये फार पूर्वी डोडो नावाचा पक्षी होता. त्याची संख्याही खूप होती. काहीसा बदकासारखा दिसणारा, वाकडय़ा चोचीचा हा पक्षी उडू शकत नसे. डचांनी या उडू न शकणाऱ्या ‘डोडो’ला अशा क्रूरतेनं संपवलं, की त्याचा वंशज आजच्या घडीला नामशेष होण्याची वेळ आली आहे. आता डोडो दिसतो तो फक्त म्युझियममध्येच!

भारतीय मजूर मोठय़ा प्रमाणात मॉरिशसमध्ये आणले जाऊ लागले ते १९ व्या शतकाच्या प्रारंभी. प्रामुख्याने १८३० नंतर! पण त्याच्याही आधी शंभर वर्षे- इ. स. १७३५ मध्ये फ्रेंच गव्हर्नर माहे द लाबूर्दोने याने मद्रासवर अधिकार प्रस्थापित करून तिथले भारतीय इंजिनीयर मॉरिशसमध्ये आणवले होते व त्यांच्याकरवी पोर्ट लुई या शहराची आणि बंदराची उभारणी केली होती.
त्यानंतर १८०९-१८१० मध्ये रोड्रिग्ज हे बेट ताब्यात घेतल्यानंतर ज्या १६ हजार सैनिकांच्या साहाय्यानं इंग्रजांनी मॉरिशसवर हल्ला केला होता, त्यातले नऊ हजार सैनिक भारतीय होते. १८३५ मध्ये विल्यम निकोल या गव्हर्नरनं गुलामगिरी प्रथा बंद केली. परंतु तरीही त्यानंतरचा इतिहास हा भारतीयांच्या मॉरिशसमधील हलाखीच्या जीवनाचा आणि स्वातंत्र्याकरिता केलेल्या प्रयत्नांचाच इतिहास ठरला. भारतीयांची स्थिती सुधारण्याचं महत्त्वाचं कार्य केलं ते महात्मा गांधींचा वारसा सांगणाऱ्या डॉ. मणिलाल यांनी. अवघी पाचच वर्षे ते तिथे राहिले; पण ‘दुसरे रॉयल कमिशन नेमावे’, भारतीयांच्या जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणावा, इत्यादी मागण्या त्यांनी केल्या व त्या मंजूरही करून घेतल्या.
तिथल्या संसदेत भारतीयांना सर्वप्रथम निर्वाचित प्रतिनिधित्व मिळालं, ते मात्र १९२६ मध्ये डी. लाला यांच्या रूपानं. १९४५ मध्ये प्रथमच ७० हजार भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि तब्बल ११ भारतीय संसदेवर निवडून आले. त्यांचे बहुमत बनले. १९५९ पर्यंत हे बहुमत टिकून होतं. एच.आर. वाघजी हे तत्कालीन संसदेचे (ज्याचं नामकरण ‘विधान परिषद’ असं करण्यात आलं होतं!) पहिले भारतीय अध्यक्ष बनले, तर डॉ. रामगुलाम मुख्यमंत्री बनले.
१९६३ साली विधान परिषदेचं नाव ‘विधानसभा’ झालं. डॉ. रामगुलाम हेच प्रमुख राहिले. लेबर पार्टी, इंडिपेंडंट फॉरवर्ड ब्लॉक आणि मुस्लिम कमिटी फॉर अ‍ॅक्शन असे भारतीयांचे तीन पक्ष १९६७ साली एकत्र आले. पार्टी मॉरिशिया मात्र वेगळी राहिली. एकत्र येऊन बनलेल्या इंडिपेन्डन्स पार्टीने स्वातंत्र्याच्या मागणीवरच निवडणुका लढविल्या आणि १२ मार्च १९६८ ला मॉरिशसच्या स्वातंत्र्याची पहिली पहाट उगवली.

टिकलीएवढय़ा देशांच्या मालिकेत मॉरिशसचा उल्लेख यावेळी केला, तो आणखी एका कारणाने : येत्या १२ मार्चला ही पहाट चाळीशी ओलांडेल. त्याचबरोबर मॉरिशसमध्ये उद्या महाशिवरात्र थाटामाटात साजरी होईल, याचेही स्मरण करून देण्यासाठी!
मॉरिशसमध्ये जे अनेक तलाव आहेत, त्यात परीतलाव नावाचा एक तलाव आहे. या तलावामागे एक गमतीदार लोककथा आहे.. संपूर्णपणे सुकलेला हा तलाव एका शेताच्या रखवालदाराच्या अश्रूंनी भरल्याची! या शेतकऱ्यावर अशी पाळी का आली, त्याच्या अश्रूंनी हा तलाव भरेल, असा उ:शाप त्याला कुणी व का दिला, त्या उ:शापाप्रमाणे पूर्वेकडून आलेल्या (म्हणजे भारतीय) लोकांनी ते पाणी पवित्र का मानले, ही कथा मोठी रंजक आहे. पण एक गोष्ट खरी की, या तलावाचं पाणी आजतागायत कधीही आटलेलं नाही.
मॉरिशसचे शिवभक्त शिवरात्रीच्या दोन दिवस आधी इथे येतात. पांढरे स्वच्छ धोतर, शर्ट, टोपी घालून तलावावर जातात. हातातल्या कावडीत तलावाचे पाणी भरून घेतात. शृंगारलेल्या या कावडींची समारंभपूर्वक मिरवणूक काढतात. त्याचं नेतृत्व परंपरेप्रमाणे राष्ट्रप्रमुख डॉ. रामगुलाम करतात. (आधी डॉ. शिवसागर आणि आता नवीन रामगुलाम) मग सारे यात्रिक कावडीनं आपापल्या गावातील शंकराला स्नान घालतात.
ही मिरवणूक, हे पवित्र स्नान यंदाही मॉरिशसमध्ये पार पडेल. जगाच्या पाठीवर हिंदू बहुसंख्य असणारे देश तीन- भारत, नेपाळ आणि मॉरिशस. भारतानं निधर्मीवाद स्वीकारला. नेपाळ कम्युनिझमच्या मार्गानं गेला. मॉरिशस मात्र आजही पूर्वप्रथा टिकवून आहे. त्याचं स्मरण तुम्हा-आम्हाला व्हावं, हेच या स्तंभामागचं आजचं निमित्त..!!
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com