Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

आम्ही पहायला शिकू, पण तुमचं काय?
लोकरंग (१ फेब्रुवारी) मधील राजीव खांडेकर यांचा ‘न्यूज चॅनेल पहायला शिका’ हा लेख वाचला. लेखक स्वत: एका प्रतिथयश वृत्तवाहिनीचे संपादक असल्याने हे अगदी ‘फ्रॉम द हॉर्सेस माऊथ’ ऐकण्यासारखे होते. लेख वाचून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. पण काही महत्त्वाच्या मुद्द्यांना मात्र लेखकाने सफाईने बगल दिली आहे.
१) तासात एखादी बातमी चार वेळा दाखविणे समजू शकते. पण चार मिनिटांत एकच दृश्य चाळीस वेळा दाखविणे याला काय म्हणायचे?
२) स्टिंग ऑपरेशनद्वारे बरेचसे खळबळजनक खुलासे झाले आहेत, हे खरे आहे. त्याबद्दल प्रेक्षक माध्यमांचे ऋणी आहेत. पण
 

एखादी घटना घडत असताना तिचे चित्रिकरण करणे आणि चित्रिकरणासाठी एखादी घटना घडवून आणणे यात फरक आहे. सत्य समोर आणायचेच असेल, तर स्टिंग ऑपरेशन विनाकाटछाट दाखवायला हवे.
३) घटना आनंदाची असो, वा दु:खाची. ‘अब आपको कैसा लग रहा है?’ हा प्रष्टद्धr(२२४)्ना ऐकल्यावर काय करावे?
४) उगाचच सनसनाटी निर्माण करणाऱ्या, अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बातम्यांचे चालविलेले गुऱ्हाळ (उदा. ये शनि अमवास्या बहोत खतरनाक हो सकती है, ये सूर्यग्रहण जानलेवा हो सकता है) अशा बातम्या दिवसभर प्रसारित करणाऱ्या वाहिन्यांविषयी लेखकाने सोयिस्कररित्या मौन बाळगले आहे. आपल्या जातभाईंची पाठराखण करण्याचा प्रयत्नच लेखकाने केला आहे.
न्यूज चॅनेल पहायला शिकले पाहिजे हे खरे, पण ‘न्यूज चॅनेल दाखवायला कधी शिकणार?’ हा मोठा प्रश्न आहे.
मनीष खरनार, भुसावळ