Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

वेदवाङ्मयातील अनेक ऋचांचा नेमका अर्थ आजतागायत पूर्णपणे उलगडलेला नाही. हजारो वर्षांच्या परंपरेने ब्राह्मणांनी जतन करून ठेवलेले हे पुरातन वाङ्मय हिंदू धर्माच्या तसेच हिंदुस्थानच्या इतिहासाचा एक अमूल्य ठेवा आहे. आजपर्यंत अनेक देशी-विदेशी पंडितांनी वेदांवर विस्तृत भाष्ये केली आहेत आणि त्यांच्या परीने वेदांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या सर्वापेक्षा वेगळा पूर्णपणे नवा अर्थ, नवा दृष्टिकोन रवींद्र गोडबोले यांनी ‘इंद्राचा जन्म’ या ग्रंथात मांडला आहे. संस्कृत वाङ्मय अभ्यासाच्या ठरीव साच्यातून न गेलेल्या आणि भौतिक शास्त्रांच्या अभ्यासातून वस्तुनिष्ठ निष्कर्षांची शिस्त अंगी बाणलेल्या अभ्यासकाकडून वेदवाङ्मयातील काही ऋचांचा नवा अर्थ कसा उलगडतो याचे ‘इंद्राचा जन्म’ हा सैद्धांतिक ग्रंथ एक उत्तम उदाहरण आहे. या ग्रंथाचे लेखक रवींद्र गोडबोले हे रसायन अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून यापूर्वी त्यांनी औरंगजेब व अकबर या ऐतिहासिक व्यक्तींवर चरित्रात्मक ग्रंथही लिहिले आहेत. त्या ग्रंथांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. आजपर्यंत अनेक महत्त्वाचे शास्त्रीय शोध अपघाताने तसेच योगायोगाने लागले आहेत. अशाच प्रकारच्या एका योगायोगामुळे आणि इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या उपग्रहांनी घेतलेल्या पृथ्वीच्या छायाचित्रांच्या मदतीने गोडबोले यांना चिकित्सक बुद्धीने हा नवा सिद्धांत मांडणे शक्य झाले.
 

वेदवाङ्मयात ऋग्वेद हा सर्वात प्राचीन आहे. इंद्र ही ऋग्वेदातील प्रमुख देवता आहे. परंतु इतर देवतांप्रमाणे इंद्राचे स्वरूप आजपर्यंत स्पष्टपणे उमगलेले नाही. प्रस्तुत ग्रंथात लेखकाने, अवकाशातून आलेल्या प्रचंड धूमकेतूचा पृथ्वीवरील आघात, त्याचे भूतलावर, तेथील मानवसमूहांवर झालेले परिणाम, तसेच वेदपरंपरेतील काही यज्ञप्रक्रिया या सर्वाची सांगड घालून काही विशिष्ट वेदऋचांचा नवा अन्वयार्थ उलगडून दाखविला आहे. त्यातूनच इंद्र देवतेचे रूप कसे होते हे आधुनिक विज्ञानाच्या आधारे स्पष्ट केले आहे. इंद्र म्हणजे अवकाशातून पृथ्वीकडे येणाऱ्या भग्न धूमकेतूचा एक तेजस्वी भाग आणि त्या धूमकेतूची पृथ्वीवर पडलेली अशनी म्हणजे वृत्र! या अशनींमध्ये सापडणारी नैसर्गिक काच (‘मोल्डा व्हाईट’) म्हणजे सोम! असा सिद्धांत गोडबोले यांनी मांडला आहे. आकाशातून पडणाऱ्या धूमकेतूचा एक मोठा तुकडा पंजाबमधील सतलज-बियास नद्यांच्या संगमाजवळ पडला. ही घटना पाहणाऱ्या कवींनी त्याचे वर्णन ऋग्वेदातील ऋचांमध्ये करून ठेवले आहे. अलीकडच्या काळांत वैज्ञानिकांनी पृथ्वीवर आपटणाऱ्या धूमकेतूने भूतलावर काय उत्पात घडू शकतात ते प्रयोगशाळेतील विविध प्रयोगांमधून सिद्ध केले आहे. शिवाय पृथ्वीवर सापडलेल्या अशनींच्या अभ्यासातून कोणत्या काळात धूमकेतू पृथ्वीवर आदळला होता तेही शोधून काढले आहे. ऋग्वेदांतील विशिष्ट ऋचांमधून केलेले वर्णन हे अवकाशातून पृथ्वीवर आपटणाऱ्या एका महाकाय धूमकेतूचे आहे, असे गोडबोले यांनी सोदाहरण स्पष्ट केले आहे. या सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी अनेक रंगीत छायाचित्रे तसेच वैज्ञानिक आकृत्या या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. वैज्ञानिक विश्लेषण असूनदेखील हा ग्रंथ क्लिष्ट न होता सामान्य वाचकाला समजेल अशा प्रवाही व सोप्या भाषेत लिहिण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. हा सिद्धांत म्हणजे वेदवाङ्मयातील विशिष्ट ऋचांच्या अन्वयार्थाची ‘गुरुकिल्ली’च ठरेल यात शंका नाही.
इंद्र आणि सोम याविषयीचा हा नवा सिद्धांत या ग्रंथात सुमारे ७० पृष्ठात मांडला असून विविध परिशिष्टे आणखी ६० पानांमध्ये देऊन एकूण १३० पानांचा हा छोटेखानी ग्रंथ तयार केला आहे. या विषयाबद्दलची जागतिक पातळीवरील उत्सुकता लक्षात घेऊन लेखकाने हा सिद्धांत इंग्रजी भाषेत सुमारे ६० पानांमधून याच ग्रंथात समाविष्ट केला आहे. त्यामुळे हा सिद्धांत जगभरातील वेदवाङ्मयाच्या अभ्यासकांपर्यंत पोहोचेल.
नवा सिद्धांत मांडताना गोडबोले यांनी स्वत:च्या मर्यादा तसेच अधिक संशोधनाच्या दिशा स्पष्टपणे मांडल्या आहेत. सतलज, बियास नद्यांच्या संगमाजवळ उत्खनन करून अधिक संशोधनास वाव असून त्यातील निष्कर्षांमधून या नव्या सिद्धांतास पुष्टी मिळू शकेल. या नव्या सिद्धांताच्या अनुषंगाने आपले वेदवाङ्मय, आजपर्यंतचे जगभरातील उत्खनन आणि अवकाशात घडलेल्या अद्भुत घटना यांची सुसंगती लावल्यास मानवजातीच्या प्राचीन इतिहासावर नवा प्रकाश पडू शकेल, तसेच वेदवाङ्मयाच्या निर्मितीचा काळ निश्चित करण्यास मदत होईल.
डॉ. अजित जोशी
इंद्राचा जन्म
Birth of Indra

रवींद्र गोडबोले
देशमुख आणि कंपनी
पृष्ठे १३६ +६०, चित्रे १८
मूल्य रु. २००/
-

पुस्तकाच्या मागील पानावर पुस्तकाचा कथाविषय सांगणाऱ्या आशयाचा सारांश मांडणाऱ्या- मोजक्या ओळी असतात निर्मितीच्या प्रक्रियेत ‘मागे’ राहून ‘बोलकी’ आणि मोलाची कामगिरी करणारे हे समर्थ सारांश..

खाली जमीन वर आकाश
डॉ. सुनीलकुमार लवटे
मेहता पब्लिशिंग ङाऊस, पुणे
पृष्ठे : २०४; मूल्य : १५० रुपये

अनाथाश्रमात जन्मलेला, रिमांड होममध्ये वाढलेला तो.
त्यास आई-वडील नव्हते.
जात, धर्म, कुल, गोत्र, वंश, नातेवाईक अशा
पारंपरिक अस्तित्वाच्या कसल्याही खुणा न घेता,
जन्मलेला तो एक ‘नेम नॉट नोन’ होता.
त्याला नाव नव्हतं.
होता एक नंबर. (कैद्याला असतो तसा!)
त्याचं बालपण प्रश्नग्रस्त होतं.
कौमार्य कुस्करलेलं.
तारुण्य अव्हेरलं गेलेलं.
तो वयात आला तसे त्याचे प्रश्नही वयात आले.
प्रश्नांनी त्याला प्रौढ केलं.
प्रश्नांनीच त्याचं पालकत्त्व पेललं.
प्रश्नांनीच तो शिकला-सवरला नि सावरलांही!
आज त्याच्या पुढे आहे पर्यायांच्या प्राजक्तांचा सडा!
सर्व काही असताना काही न करणाऱ्यांना
आपल्या नाकर्तेपणाची जाण देणारी ही कर्मकहाणी आहे
‘खाली जमीन वर आकाश.’