Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

कविता आणि त्यातून भेटणाऱ्या पावसाबाबत एखादा हवामानशास्त्रज्ञ कसं भाष्य करेल?.. कदाचित त्याच्याकडच्या तांत्रिक माहितीनुसार तो पावसाची चिरफाडच करेल. सुदैवानं याला अपवाद आहेत. त्यापैकी एक म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर.
त्यांनी ९ फेब्रुवारी, २००९ रोजी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात केलेलं ‘मेघदूत, पाडगावकर आणि मान्सून’ हे सादरीकरण पाहायला मिळालं. त्यात साहित्य आणि विज्ञानाची अतिशय अनोखी गुंफण हवामानाची खरीखुरी ओळख करून देते अन् जोडीलाच साहित्यातील रुचीसुद्धा वाढवते..
‘विद्युत्सखिचा विरह घना रे,
माझ्यासम तुज क्षणहि न व्हावा..’

महाकवी कालिदासाच्या मेघदूतातील या भाषांतरीत पंक्ती- पावसाचे ढग आणि त्याच्यासमवेत असलेल्या विद्युल्लतेचं वर्णन करणाऱ्या; म्हणजेच पावसाचं उग्र रूप दर्शविणाऱ्या! तर दुसरीकडे ‘श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीमधारा..’ या कवी मंगेश पाडगावकरांच्या गीतातील ओळी- पावसाचं हळुवार ‘रिमझिम’ रूप उलगडणाऱ्या!
..खरं तर पाऊस एकच. पण एका कवीच्या वर्णनात तो विजेसह कडकडाट करणारा- रौद्र भासतो, तर दुसऱ्याच्या साहित्यात तो हळुवार बरसणारा- रोमँटिक वाटतो. असं का? कवींच्या वेगवेगळय़ा निरीक्षणांमुळे हा फरक जाणवतो की इतर कारणांमुळे? कवींनी पावसाची दोन भिन्न रूपं पाहून त्यांचं वर्णन केलं आहे? की खरंच दोघांनी पाहिलेला पाऊसच मुळी वेगवेगळा आहे? या प्रश्नांची अनेक उत्तरं येतील, अनेक तर्क-वितर्कही लढवले जातील. खरं काय आहे, कवी आणि तो पाऊसच जाणो!
कल्पना करा, या कविता आणि त्यातून भेटणाऱ्या पावसाबाबत एखादा हवामानशास्त्रज्ञ कसं भाष्य करेल?.. कदाचित त्याच्याकडच्या तांत्रिक माहितीनुसार तो पावसाची चिरफाडच करेल. सुदैवानं याला अपवाद आहेत. त्यापैकी एक म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात केलेलं ‘मेघदूत, पाडगावकर आणि
 

मान्सून’ हे सादरीकरण पाहायला मिळालं. त्यात साहित्य आणि विज्ञानाची अतिशय अनोखी गुंफण हवामानाची खरीखुरी ओळख करून देते अन् जोडीलाच साहित्यातील रुचीसुद्धा वाढवते.. आणि अर्थातच वेगळा आनंदसुद्धा मिळवून देते.
बरं, आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाचं काय- कालिदासाचा आणि पाडगावकरांचा पाऊस वेगळा का? केळकरांचं सादरीकरण सांगतं- पाडगावकर महाराष्ट्रातील पावसाचं वर्णन करतात. पावसानं जम बसवला की आपल्याकडे सरीवर सरी बरसतात, पण संततधार आणि हळुवार! ना विजांचा कडकडाट ना ढगांचा गडगडाट! पण कालिदास ज्या मध्य-उत्तर भारतातील पावसाचं वर्णन करतो- तो धडाकेबाज असतो, मेघ सरींच्या रूपात मोकळा होतो, तो विजांच्या कडकडाटातच! विद्युल्लता जणू मेघांची सखी असल्याप्रमाणे!
‘मेघदूत, पाडगावकर आणि मान्सून’मधून अनेक रहस्यांचा उलगडा होतो, त्याचबरोबर मनातील अनेक शंकांचं निरसनसुद्धा होतं. जुना काळ आणि तेव्हाच्या साहित्यात अनेक मनं रमतात. बऱ्याचदा त्याचं उदात्तीकरण करतात. वस्तुस्थिती वाढवून-चढवून सांगतात. वेदकालीन वाङ्मय, कालिदासाचं साहित्य म्हटलं तर असं करण्यास चालून आलेली संधीच. म्हणूनच कालिदासाचं ‘मेघदूत’ वाचून त्याला हवामानशास्त्रातील कितीतरी गोष्टी माहिती असाव्यात, असं मोघम बोललं जातं. पण खरंच त्याला हवामान किंवा त्याचं शास्त्र माहीत होतं का? केळकरांचं सादरीकरण त्यावर प्रकाश टाकतं आणि अनेक उदाहरणं देऊन ‘कालिदासाचा खरंच हवामानाचा अभ्यास असावा’ अशा निष्कर्षांप्रत येतं. (हवामान हा विषय कोळून प्यायलेल्या एका वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञाचं हे म्हणणं आहे हे इथं ठळकपणे सांगावंसं वाटतं.) हवामानाचं अतिशय नेमकं वर्णन करणारी अनेक उदाहरणं कालिदासाच्या मेघदूतात आढळतात.
‘धूम्रज्योति: सलिल मरुतां संनिपात: क्व मेघ:’.. ढगामध्ये पाणी, वारा, वीज आणि धूर असल्याचं कालिदास आपल्या काव्यात म्हणतो. या पंक्ती विज्ञानाच्या सर्व निकषांवर खऱ्या उतरतात. ढगांमध्ये पाणी म्हणजे बाष्प असतंच. वारा म्हणजे वरच्या दिशेनं वाहणारे प्रवाह असतात. विजेची निर्मितीसुद्धा त्यातच होते. त्यात धुराचा समावेश असतो का, याबाबत सध्या संशोधन सुरू आहे. कालिदासाचा काळ होता साधारणत: सोळाशे वर्षांपूर्वीचा! म्हणजे इतक्या जुन्या काळातही निसर्ग व हवामानाबाबत अचूक निरीक्षण केलं जात होतं हे निश्चित! मेघदूतातील ढगाचा प्रवास मध्य भारतातून उत्तर भारताकडे झाल्याचं मानलं जातं. पण या ढगाचा मार्ग काहीसा वक्र असेल, असं मेघदूतात म्हटलं आहे. मान्सूनबाबतचा सध्याचा अभ्यास असं सांगतो की हे वारे मध्य भारतातून थेट उत्तर भारतात जात नाही, तर ते वळून बंगालच्या उपसागरामार्गे हिमालयाच्या पायथ्यानं उत्तर भारताकडे सरकतात (म्हणजे वक्र होतात). पण वाऱ्यांचं हे वास्तवातील वळणं आणि कालिदासाच्या मेघदूतात म्हटलेलं वक्र होणं हे एकच आहे का, याबाबत मात्र केळकर कालिदासाला ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ देतात आणि कदाचित त्याला हेच अपेक्षित असेल असं सांगतात.
‘जरा क्षीणता येता सखया, विमल झऱ्यांचे पाणी प्यावे’.. मेघदूतात ढगाला त्याच्या प्रवासात नद्यांच्या ठिकाणी विश्रांतीचा सल्ला दिला आहे आणि थकवा आल्यावर झऱ्यांचं पाणी पिऊन पुन्हा ताजंतवानं होण्याची सूचनाही करण्यात आली आहे. याचा हवामानशास्त्रीय अर्थ लावताना, मान्सूनच्या भारतभर पसरण्याची प्रक्रिया समजून घ्यावी लागते. मान्सून एकदा भारतात दाखल झाला, की आगगाडीच्या प्रवासासारखा एका दमात शेवटपर्यंत पोहोचत नाही. तर त्याचा प्रवास टप्प्याटप्प्यानं होतो. तो काही प्रदेश व्यापतो, पुन्हा क्षीण होतो. पुन्हा नव्यानं ऊर्जा मिळाली की आणखी पुढं सरकतो. असा मजल-दरमजल करीत तो संपूर्ण भारत व्यापतो. हा प्रवास माहिती असल्यामुळेच मेघदूतात ढगाचं क्षीण होणं आणि अशा वेळी त्यानं विश्रांती घ्यावी, असा सल्ला देण्यात आला असावा. पुनरुज्जीवित होण्यासाठी झऱ्यांचं पाणी प्यावं म्हणजेच जास्त बाष्प मिळवावं आणि मग पुढचा प्रवास करावा असं सांगण्यात आलं आहे, अशी कारणमीमांसा केळकर करतात.
कालिदासाला कदाचित मान्सूनचा परतीचा प्रवासही ठाऊक असावा असा तर्कही केळकरांनी बांधला आहे. म्हणून तर मेघदूतात ढगाला सांगण्यात आलं आहे की ‘हिमाचलाच्या शिखरांवरूनी वेगे, सखया, येई परतुन’! म्हणजे ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्याच्या आगमनापासून ते त्याच्या माघारी फिरण्यापर्यंतची निरीक्षणं त्या काळीसुद्धा करण्यात आली होती. रूढ अर्थानं कालिदासाला हवामानशास्त्रज्ञ म्हणता आलं नाही, तरी त्याला वारा, पाऊस अशा हवामानाच्या घटकांचं उत्तम ज्ञान होतं हे निश्चित! ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा नियम आजही पावसाच्या आगमनाबाबत लागू होतो. त्यामुळे कालिदासाच्या काळापासून आजपर्यंत म्हणजे किमान सोळाशे वर्षे तरी या पावसाच्या वेळापत्रकात विशेष फरक पडलेला नाही, असा निष्कर्षही काढता येतो.
मेघदूताप्रमाणेच आजच्या मराठी साहित्यातील दूत असलेल्या पाडगावकरांच्या गीतांमधूनही पाऊस व सृष्टीचं चपखल वर्णन पाहायला मिळतं. चपखल तसंच वैज्ञानिक कसोटय़ांवर खरं उतरणारंसुद्धा! ‘मेघदूत, पाडगावकर आणि मान्सून’मध्ये याचीही अनेक उदाहरणं केळकर देतात. ‘जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी..’ पावसाच्या आगमनाबाबत पाडगावकरांच्या या पंक्ती! हवामानशास्त्रसुद्धा हेच सांगतं. उन्हाळय़ात भेगाळलेली जमीन, वातावरणातील धग, उन्हाची काहिली, त्यामुळे होणारा त्रास यामुळे पावसाची प्रतीक्षा केली जाते आणि अशी वाट पाहिल्यानंतरच तो बरसतो. ‘श्रावणात घननिळा..’ या पंक्तींमधील प्रत्येक शब्दामध्ये केळकर यांना विज्ञान दिसतं. पाडगावकरांच्याच गीतांमधील वारा वेगवेगळय़ा रूपांमध्ये भेटतो. कधी चंचल होतो, कधी आर्त बनतो, कधी मंद राहतो, तर कधी धुंद होतो.. बदलणं हा खरा तर वाऱ्याचा गुणधर्मच! तो पाडगावकरांच्या गीतांमधूनही डोकावतो. म्हणूनच केळकरांना ‘कविकल्पना’ महत्त्वाच्या वाटतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचे, तर ‘साहित्यातील कल्पनांना कविकल्पना म्हणून हसता कामा नये. खरं तर कवी शास्त्रज्ञांच्याही पुढे असतात. त्यांच्याच कल्पना पुढच्या काळात शास्त्रज्ञ मंडळी साकार करतात. त्यांचा प्रवास सुरू होतो या कल्पनांमधूनच’.. यावर कुणाच विश्वास बसो ना बसो, पण हवामान आणि मान्सूनच्या बाबतीत तरी हे खरं ठरलं आहे.
कालिदासाच्याही मागच्या कालखंडात जाऊन काहींनी त्या त्या काळातील साहित्यातून हवामानाच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे. वेदकालीन समाजाला हवामानाची कितपत माहिती होती, याबाबत अनेकांनी अभ्यास केला आहे. ‘ऋग्वेदातील हवामान’ हे हेमकांत बलकुंदी यांचं पुस्तकही यावर प्रकाश टाकतं. ऋग्वेदातील अनेक ऋचांमध्ये हवामानाची निरीक्षणं डोकावतात. ती अतिशय अचूक असल्याचं आज सांगता येतं. त्यातील काहींचा खरेपणा तर अचंबित करतो. ऋतू बदलला की हवेची दिशा बदलते. ढगांचे प्रकार- पाऊस देणारे (रुद्र) आणि पाऊस न पाडणारे (वृत्र). रुद्राचं वर्णन म्हणजे त्याचं कापसाच्या राशीसारखं असणं आणि गर्जना करत, विजेच्या लखलखाटात मुसळधार पाऊस पाडणारा (मोठय़ा पावसाला किंवा ढगफुटीला कारणीभूत ठरणाऱ्या ढगाप्रमाणे). इतकंच नव्हे तर पाऊस विशिष्ट काळातच आणि विशिष्ट दिवसच पडतो, याचाही उल्लेख ऋग्वेदात येतो. पश्चिम पंजाबात म्हणजेच सिंधू नदीच्या खोऱ्यात तो सात आठवडे पडतो आणि त्याच प्रदेशात पूर्वेला त्याचा कालावधी अकरा आठवडय़ांचा असतो, असं ही निरीक्षणं सांगतात. विशेष म्हणजे ती आजसुद्धा तंतोतंत जुळणारी आहेत. मरुतांबद्दल तऱ्हतऱ्हेची माहिती ऋग्वेदात आहेच. याचबरोबर मरुद्गण अर्थात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची माहितीसुद्धा तेव्हाच्या माणसाला असावी, असे बलकुंदी यांनी म्हटलं आहे. हे वारे शेकडो योजनांचं अंतर ओलांडून पंजाबकडे येतात हे हवामानाचं वास्तव ऋग्वेदकालीन समाजाला ठाऊक होतं, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
कविता, गीते, प्रवासवर्णनं व साहित्यातील इतरही कलाकृतींमधून हवामान पावलोपावली डोकावतं. ते रंजक तर असतंच, शिवाय ज्ञानात भर टाकणारंसुद्धा! हिंदी चित्रपटगीतांचं उदाहरण घेतलं तरी हे स्पष्ट होतं. बऱ्याचशा हिंदी गीतांमधील पाऊस ‘पूरवय्या’ असतो, म्हणजे पूर्वेकडून येणारा. आनंद बक्षी यांचं ‘चुपके चुपके चलरि पूरवय्या’ हे असंच एक गीत. पण महाराष्ट्राचा विचार केला तर (विदर्भाचा काही भाग वगळता) पाऊस पश्चिमेकडून येतो. मग हे ‘पूरवय्या’ काय प्रकरण आहे? अशी गीते रचणारे आनंद बक्षी किंवा इतर बहुतांश गीतकार मूळचे उत्तर भारतातील आहेत आणि त्या प्रदेशात मान्सूनचे वारे बंगालच्या उपसागराकडून हिमालयाच्या पायथ्यानं पूर्वेकडे सरकतात. त्यामुळे त्यांना पाऊस मिळतो तो पूरवय्याच! असंच आणखी एक आगळं वर्णन समोर येतं ते ‘मेरे नयना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा’ या गीतातून! हे वर्णन आपल्याकडील पावसापेक्षा वेगळं आहे. त्यातील ‘सावन भादो’ म्हणजेच श्रावण-भाद्रपद हे महिने जास्त पाऊस देणारे मानले आहेत. पण आपल्याकडे तर आषाढात धो धो पाऊस पडतो. म्हणजेच हे वर्णन करताना महाराष्ट्र डोळय़ांसमोर नव्हता. ते वर्णन उत्तरेकडील गंगेच्या खोऱ्यातील आहे. पाहा, गीतातील पावसाच्या, वाऱ्याच्या वर्णनावरूनसुद्धा ते कुठं रचलं गेलं असेल किंवा कोणत्या प्रदेशातील गीतकारानं त्याला आकार दिला असेल हे सांगता येतं..
‘मेघदूत, पाडगावकर आणि मान्सून’च्या निमित्तानं सुरू झालेली ही चर्चा खरंतर अशीच कायम राहावी आणि माणसाच्या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणारं हवामान अशा रंजक पद्धतीनं सर्वांपर्यंत पोहोचावं. त्यातून साहित्याचा आस्वाद तर घेता येईलच अन् जोडीला हवामानाचं वैज्ञानिक वास्तवसुद्धा माहीत होईल!
अभिजित घोरपडे
abhighorpade@rediffmail.com

गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं ‘गणेश तो जाणावा’ ही स्पर्धा घेतली होती, तो एक वेगळा प्रयत्न म्हणून. गणपतीचं स्वागत तर आपण मोठय़ा उत्सवात करतो, पण खरंच गणपतीबद्दल आपल्याला किती माहिती असते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न होता. स्पर्धा म्हटलं की फक्त नाच आणि गाणी असं समीकरण जुळल्याचा आजचा काळ. त्यात सध्या सगळ्याच क्षेत्रात सामान्यीकरण प्रमाणभूत होत असतांना, स्पर्धेच्या गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड करावयाची नाही, हा पवित्राही प्रवाहाच्या विरूध्दच जाणारा. या पाश्र्वभूमीवर मनात साशंकता घेऊनच ही स्पर्धा जाहीर केली होती. पण या स्पर्धेला वाचकांकडून मिळालेला प्रतिसाद गुणवत्तेला समाजमनात अजूनही स्थान आहे, या विचाराला दुजोरा देणारा आणि पर्यायाने मनाची उमेद वाढवणारा होता. त्यामुळे अशा स्पर्धा आयोजित करायला हरकत नाही, अशी ग्वाहीही नकळतच मिळाली होती. त्यातूनच ‘एथ चातुर्य शहाणे झाले’ या स्पर्धेचा उगम झाला.
वाचकांना विविध प्रकारची माहिती हवी असते. त्यांना अनेक प्रश्न असतात. कधी या प्रश्नांची उत्तरं असतात, तर कधी नसतात. ज्या प्रश्नांची उत्तरं नसतात, त्यांची उत्तरं शोधण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांतून मराठी साहित्यावर आधारित एखादी स्पर्धा सुरु करावी, या विचारानं मनात आकार घेतला. पण अशी स्पर्धा घ्यायची तर ते किती वेळखाऊ काम असतं याचा अनुभव ‘गणेश तो जाणावा’ या स्पर्धेच्या निमित्तानं घेतला होता, त्यामुळे वर्षभर चालणाऱ्या या स्पर्धेसाठी जाणकार आणि जबाबदार व्यक्तीची आवश्यकता होती. संजय भास्कर जोशी यांनी ही जबाबदारी स्वीकारून हा प्रश्नच मिटवला. स्पर्धाच घ्यायची तर त्यासाठी बक्षिसं का असू नयेत, या विचाराला राजहंस प्रकाशनाच्या दिलीप माजगावकर यांनी पुष्टी दिली आणि बक्षिसं द्यायचं मान्य केलं. सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटत असतांना या स्पर्धेला प्रतिसाद कसा मिळेल, ही साशंकता (नेहेमीप्रमाणे) मनात होतीच. पण तो प्रश्न वाचकांनी सहज सोडवला- तो या स्पर्धेत मोठय़ा प्रमाणावर भाग घेऊन. त्याचप्रमाणे ही स्पर्धा महिन्यात एकदा घेण्याऐवजी आठवडय़ातून एकदा घ्यावी, ही मागणी करून. ही मागणी म्हणजे या स्पर्धेला मिळालेली पोचपावतीच आहे, असं मानायला हरकत नाही. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही जागेचा प्रश्न सोडवला, स्पर्धेचे प्रश्न आणि उत्तरं तयार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचं कोष्टक संजय भास्कर जोशी यांनी मांडलं, तर बक्षिसांचं आर्थिक गणित राजहंस प्रकाशनाच्या दिलीप माजगावकर यांनी सोडवलं.
त्यामुळे आता ही स्पर्धा महिन्यातून दोन वेळा घेतली जाईल. एका आठवडय़ात प्रश्न, दुसऱ्या आठवडय़ात उत्तरं आणि तिसऱ्या आठवडय़ात विजेते आणि पुढचे प्रश्न असे या स्पर्धेचे स्वरूप असेल.
पहिल्या स्पर्धेत १२ उत्तरं बरोबर असणारी फक्त एक प्रवेशिका होती. तर दुसऱ्या स्पर्धेत १२ उत्तरं बरोबर असणारे १६ वाचक आहेत.
पहिल्या स्पर्धेत ११ उत्तरं बरोबर असणारे चार वाचक होते. तर दुसऱ्या स्पर्धेत ११ उत्तरं बरोबर असणारे २६ वाचक आहेत.
बरोबर उत्तर असणाऱ्या प्रवेशिकांचं अ‍ॅव्हरेज सात आहे.
ही ‘आकडेवारी’ स्पर्धेचा वाढता प्रतिसाद आणि अचूक प्रवेशिकांचं वाढतं प्रमाण दाखवण्यासाठी पुरेशी ‘बोलकी’ आहे. भविष्यात हे प्रमाण अजूनच वाढत जाईल, यात शंका वाटत नाही.
संपादक

उत्तरे
१. ‘मोगरा फुलला’ ही गोनीदांची कादंबरी कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
उत्तर - ब. संत ज्ञानेश्वर मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, माचीवरला बुधा अशा अनेक लोकप्रिय आणि उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहिणाऱ्या गो.नी. दांडेकरांनी संतांबद्दल आणि संतसाहित्याबद्दल उत्तम लेखन केले. स्मरणगाथा या गोनीदांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.

२. खालीलपैकी कोणते ग्रंथ साहित्य ‘अकादमी पुरस्कारप्राप्त आत्मचरित्र’ नाही?
उत्तर - क. टीकास्वयंवर एक झाड आणि दोन पक्षी हे विश्राम बेडेकरांचे आणि एका मुंगीचे महाभारत हे गंगाधर गाडगीळांचे आत्मचरित्र. खरं तर विश्राम बेडेकर रणांगण कादंबरीसाठी आणि गंगाधर गाडगीळ हे कथालेखनासाठी ओळखले जातात. बहुरूपी या चिंतामणराव कोल्हटकरांच्या आत्मचरित्रालाही साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. पण टीकास्वयंवर हे नेमाडय़ांचे अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तक समीक्षेचे आहे.

३. ऊष्ण वारे वाहती.., गुलाबाला सुकविती काश्मिरात। गुप्ते यांच्या या कवितेच्या ओळीतील रिकाम्या जागी कोणता शब्द आहे?
उत्तर - ड. नासिकात नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांच्या ‘माझी कन्या’ या अत्यंत गाजलेल्या सुरेख कवितेतील या ओळी आहेत. ‘नासिकात’वर इथे गावाचे नाव आणि नाक असा अर्थपूर्ण श्लेष आहे.

४. ‘महाराष्ट्राचे रेनॉल्ड्स’ असे ज्यांना म्हणत व ज्यांच्या ‘कालिकामूर्ती’, ‘बंधुद्वेश’ या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत असे लेखक कोण?
उत्तर - क. गो. ना. दातार गो. ना. दातार यांच्या कालिकामूर्ती, बंधुद्वेश, अध:पात वगैरे कादंबऱ्या विलक्षण गाजल्या. रहस्यमय वातावरण, अतिशय उत्कंठावर्धक निवेदन आणि अद्भुतरम्यता यांच्या बळावर या कादंबऱ्या वाचनीय ठरल्या. गो. ना. दातारांचे वर्णन तात्या शिरवाडकरांनी ‘मला वाड्मयीन व्यवहाराकडे ओढून नेणारा एक प्रकांड साहित्यकार’ असे केले होते.

५. ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीचा नायक कोण?
उत्तर - अ. कर्ण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंतांच्या कादंबरीने मराठी वाचकात लोकप्रियतेचे शिखर गाठले. कर्णाच्या जीवनावर आलेल्या रणजित देसाई यांच्या ‘राधेय’, आनंद साधले यांच्या ‘महापुरुष’, गोनीदांच्या ‘श्रीकर्णायन’ वगैरे कादंबऱ्यांमध्ये मृत्युंजयने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली.

६. जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ कादंबरीवर आधारित नाटकाचे लेखक कोण?
उत्तर - क. शं. ना. नवरे महानंदा या दळवींच्या कोकणच्या पाश्र्वभूमीवरील कादंबरीचे नाटय़ रूपांतर शं. ना. नवरे यांनी ‘गुंतता ह्रदय हे’ या नावाने केले.

७. ‘एक होता काव्‍‌र्हर’ हे चरित्रपर पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर - क. वीणा गवाणकर जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर या विख्यात
कृष्ण्वर्णीय शास्त्रज्ञावरचे वीणा गवाणकर यांनी लिहिलेले आणि राजहंस प्रकाशनाने प्रसिध्द केलेले लोकप्रिय पुस्तक. यानंतर वीणा गवाणकर यांनी आयडा स्कडर, सलीम अली यांच्या जीवनावर पुस्तके लिहिली.

८. एकाच नावाचे नाटक आणि ललित समीक्षात्मक ग्रंथ अशा दोन्ही मराठी पुस्तकांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यातल्या नाटककाराचे नाव काय?
उत्तर - ब. महेश इरावती कर्वे यांचा महाभारतावरील ललित समीक्षात्मक ग्रंथ युगांत आणि प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांचे नाटय़त्रय युगांत, या दोन्ही पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कार लाभला. महेश एलकुंचवारांच्या त्रिनाटय़धारेत वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत अशी तीन नाटके आहेत. ११ एप्रिल १९९४ रोजी आविष्कार संस्थेतर्फे या तीन नाटकांचा सलग प्रयोग प्रथमच झाला.

९. ‘गोटय़ा’ आणि ‘चिंगी’ या पात्रांचे निर्माते कोण?
उत्तर - ब. ना. धों. ताम्हनकर भा.रा. भागवतांचा फास्टर फेणे आणि प्रभावळकरांचा बोक्या सातबंडे नंतरच्या काळात जसे खूप लोकप्रिय झाले तसे ताम्हनकरांचे गोटय़ा आणि चिंगी एके काळी बाळगोपाळात प्रिय होते.

१०. खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचा साहित्यप्रकार इतरांहून वेगळा आहे?
उत्तर - ड. थांबताच येत नाही ‘खूप लोक आहेत’ आणि ‘उत्सुकतेने मी झोपलो’ या श्याम मनोहर यांच्या कादंबऱ्या आहेत, तर ‘वस्ती वाढते आहे’ ही भाल पाटील यांची कादंबरी. ‘थांबताच येत नाही ’ हा मात्र हेमंत दिवटे या ताज्या दमाच्या कवीचा कवितासंग्रह आहे.

११. ‘नटसम्राट’ या नाटकाचे लेखक कोण?
उत्तर - ड. वि. वा. शिरवाडकर शेक्सपियरच्या किंग लिअरवरून स्फुरलेले हे तात्यासाहेब शिरवाडकरांचे गाजलेले नाटक. श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी, यशवंत देव वगैरे दिग्गजांनी आपापल्या शैलीत नटसम्राट साकार केला.

१२. विख्यात विनोदी लेखकाचे साहित्यअकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तक ज्यांना अर्पण केले आहे, त्यांच्या पत्नीचे हे काव्यविषयक पुस्तक प्रसिद्ध आहे-
उत्तर - ब. कवितारती पु.ल.देशपांडे यांचे ‘व्क्ती आणि वल्ली’ हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांना अर्पण केले आहे. त्यांच्या पत्नी विजया राजाध्यक्ष यांचे ‘कवितारती’ हे काव्यसमीक्षेवर आधारित पुस्तक आहे.
संजय भास्कर जोशी

बारा प्रश्नांची उत्तरे बरोबर देणारे वाचक -
पांडुरंग शंकर पवार (नांदगाव), उज्ज्वला सुहास जाधव (नांदगाव), सुहास हरीबा जाधव (नांदगाव), दादासाहेब बाजीराव माने (येळगाव), बाळासाहेब भानुदास घोंगडे (पुणे), प्रभाकर विष्णू जोग (ठाणे), विष्णू सखाराम सतरंगे (वसई), शोभा प्रभाकर चौधरी (जळगाव), नीतिन प्रभाकर वैद्य (सोलापूर), जयप्रकाश चिपलकट्टी (कोल्हापूर), योगेश हिरामण महाले (पुणे) दोन प्रवेशिकांवर नाव नाही.

अकरा प्रश्नांची उत्तरे बरोबर देणारे वाचक -
विलास रां. रानडे (पुणे), प्रताप हिंदुराव साळुंखे (कोल्हापूर), दशरथ येलू कानडे (ठाणे), प्रकाश खुपेरकर (कोल्हापूर), जयवंत भाऊसाहेब कांबळे (कोल्हापूर), सविता प्रदीप दिवाण (कोल्हापूर), वासंती भालचंद्र लिमये (कोल्हापूर), मीनल प्रभाकर जोग (ठाणे), विजय वामनराव दळवी (अकोला), अरविंद श्रीधर पुजारी (सोलापूर), उमा जितेंद्र निजसुरे (बदलापूर), रेश्मा मदन कंदलकर (पुणे), हरेश संपत शेळके (पुणे), डॉ. उषा रामवाणी (मीरा रोड), नवेंदु साईदास मराठे (शिर्डी), डॉ. श्रीपाद ज. काशीकर (सावंतवाडी), अनघा बाळकृष्ण सावंत (विक्रोळी), सुनंदा माधवराव वैद्य (धुळे), भाग्यश्री मधुकर सतरंगे (वसई), वैभव मधुकर सतरंगे (वसई), भक्ती मधुकर सतरंगे (वसई), विशाखा हेमचंद्र चितळे (चिपळूण), वैशाली जोशी ( माहीम), शरद चाफळकर (नाशिक), अरविंद ओढकर (नाशिक), ब.अ.अळवणी (मुलुंड), रवी कौठाळकर
६ पेक्षा कमी (सामान्य, अजून खूप वाचा), ६-७ (चांगले वाचक, पण अजून वाचा),
८-९ ( उत्तम वाचक, वाचत राहा), १०-११ (श्रेष्ठ वाचक, असेच वाचा), १२ ( महावाचक)