Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

बुलढाण्याच्या भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आणि शाळेचे ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार यांनी संपादित केलेल्या कथांचा संग्रह ‘कथांकुर’ हा बालसाहित्यातील एक अभिनव प्रयोग ठरावा. शाळकरी मुलांनी लिहिलेल्या साध्या-सरळ कथांमध्ये एक प्रकारचा भाबडेपणा आढळून येतो. या साऱ्याच कथा मूल्यव्यवस्थेवर बेतलेल्या आहेत. प्रामाणिकपणा, प्रयत्न, चिकाटी, चातुर्य याबद्दल आजच्या मुलांना नेमकं काय वाटतं, हे या गोष्टींमधून समजतं. त्याचसोबत सूर्यमाला, विज्ञान, अध्यात्म, व्यापार या गोष्टींचे संदर्भही कथांमधून डोकावतात. पूजा काळे, संकेत सिद्धभट्टी, प्रतीक्षा जाधव, प्राची दहीभवन, उमेश राऊत, सागर मोरे, अनिरूद्ध पाटील, अनिकेत चव्हाण, कपिल गवळी या ११ ते १४ वयोगटातील मुलांनी या कथा लिहिल्या आहेत. त्यातील ही एक कथा-
शिरपूर नावाच्या गावात दाम्या नावाचा एक रिकामटेकडा माणूस राहत असे. तो कोणत्याही प्रकारचं काम करीत नसे. तो कामापेक्षा नशिबालाच जास्त महत्त्व द्यायचा. तो कोणतेही काम न करता सतत ‘मला कोणत्याही कामात यश का येत नाही?’ याचा विचार करीत राहायचा आणि त्या विचारानं नेहमीच खिन्न राहायचा.
त्याला वाटलं की, आपल्याला जर एखादा साधू भेटला, तर तो आपल्याला नक्कीच मदत करील आणि आपले नशीब उजळेल.
 

त्यासाठी मग तो गावाबाहेरच्या टेकडीकडं निघाला. टेकडी फार दूर होती. वाटेत त्याला एक सिंह भेटला व गयावया करीत म्हणाला,
‘‘माझे पंजे फारच दुखत आहेत आणि माझ्या आयाळीचे केसही झडत आहेत. मी फार त्रासून गेलेलो आहे. अरे भल्या माणसा, मला सोडव रे या त्रासातून!’’
‘‘नाही, मी थांबणार नाही. मी टेकडीवरील साधूला भेटायला निघालो आहे,’’ असं म्हणून तो पुढं चालू लागला. तेवढय़ात सिंह त्याला म्हणाला,
‘‘जर तो तुला भेटला, तर त्याच्याकडून माझ्या त्रासावर काही उपाय विचारून ये.’’
‘‘ठीक आहे,’’ असं म्हणून तो पुढं निघाला. तो थोडा पुढं गेला. त्याला कण्हण्याचा आवाज ऐकू आला. त्यानं इकडं-तिकडं पाहिलं. रडणाऱ्या वडाच्या झाडाकडं पाहून त्याला आश्चर्य वाटलं. वडाचं झाड म्हणालं, ‘‘अरे, माझ्या मुळांची फार आग होतेय, मला मदत कर ना.’’
‘‘नाही, मी साधूकडं निघालो आहे. मला वेळ नाही.’’
‘‘ठीक आहे, जातोस तर जा. पण माझ्या त्रासलेल्या मुळांवर काहीतरी उपाय आण.’’
‘‘बरं, आणतो,’’ असं म्हणून दाम्या पुढं निघाला. पुढे जाताच तो एका शेतात पोहोचला. त्या शेतात एक म्हातारा शेतकरी नांगरणी करीत होता. शेतकरी म्हणाला,
‘‘मला नांगरणी करण्यासाठी मदत करतोस का?’’
‘‘नाही, मी थांबत नाही. मी साधूला भेटायला निघालोय.’’
शेतकरी म्हणाला, ‘‘जातोस तर जा; पण त्या साधूकडून माझ्या शेतीची भरभराट होण्यासाठी काही उपाय आण.’’
‘‘बरं’’, असं बोलून दाम्या पुढं निघाला. थोडय़ाच वेळात त्याला एक साधू भेटला. ‘‘नमस्कार, साधुबुवा!’’ दाम्या खूश होऊन म्हणाला.
‘‘माझं नशीब फुटलंय. माझं नशीब उजळेल, असा काहीतरी उपाय सांगा.’’
‘‘नशीब तुझ्याकडं वारंवार येत होतं; पण तू त्याला ओळखू शकला नाहीस. तू डोळे उघडून नशिबाकडं पाहात जा, म्हणजे तुला तुझं नशीब मिळेल.’’
‘‘ठीक आहे. मी माझ्या नशिबाकडं डोळे उघडून पाहत जाईन.’’
निघण्यापूर्वी त्यानं सिंह, वडाचं झाड आणि शेतकरी यांच्या त्रासावर उपाय विचारून घेतले. परतत असताना त्याला सर्वप्रथम शेतकरी भेटला. शेतकऱ्यानं त्याला विचारलं, ‘‘तू माझ्या त्रासावर काही उपाय आणलास का?’’
‘‘होय,’’ दामू म्हणाला, ‘‘तुझ्या शेतात फार हिरे आहेत. थोडी खोल नांगरणी केलीस, तर ते तुला मिळतील.’’
शेतकरी म्हणाला,
‘‘आपण दोघं मिळून नांगरणी करू, हिऱ्यांचा अर्धा हिस्सा तुला देतो.’’
दामू म्हणाला,
‘‘नाही, मला माझ्या नशिबावर लक्ष ठेवायचं आहे, हे काम तूच कर.’’
थोडय़ाच वेळात तो वडाच्या झाडाजवळ पोहोचला. झाडानं त्याला विचारलं, ‘‘माझ्या त्रासलेल्या मुळांवर काही उपाय आणलास का?’’
‘‘होय,’’ दामू म्हणाला, ‘‘तुझ्या मुळांच्या खाली सोन्याची खाण आहे.’’
झाड म्हणालं, ‘‘तू त्या खाणीला नष्ट कर किंवा ते सर्व सोनं तू घेऊन जा; पण मला या त्रासातून वाचव.’’
दामू म्हणाला, ‘‘नाही, मला वेळ नाही, मला माझ्या नशिबाला शोधून काढायचं आहे,’’ असं म्हणून तो पुढं निघाला.
नंतर त्याला सिंह भेटला. सिंहानं विचारलं, ‘‘माझ्या त्रासावर उपाय आणलास का?’’
‘‘होय,’’ दामू म्हणाला, ‘‘तू चुकून प्राण्याऐवजी बाजूला पडलेलं सोन्याचं फळ खाल्लंस, त्याचा परिणाम तुझ्या शरीरावर होतोय.’’
सिंह म्हणाला,
‘‘ते फळ तू कसंही माझ्या शरीराबाहेर काढ आणि तुला घेऊन जा.’’
परंतु, दामू ‘नाही’ म्हणाला. कारण त्याला त्याच्या नशिबाला शोधायचं होतं. त्याला वाटत होतं, आपलं नशीब आपल्या भोवतालीच कुठंतरी आहे, आपण ते शोधून काढलं पाहिजे. खरं तर त्या साधूनं सांगितल्याप्रमाणं त्याचं नशीब त्याच्याजवळ आलं होतं. शेतातले हिरे त्याला मिळाले असते. वडाखालचं सोन्याचं फळही त्याला मिळालं असतं. पण त्यासाठी कष्ट घ्यायची दामूची तयारी नव्हती. तो फक्त नशिबाच्या मागं लागला होता. नशिबाचा शोध घेत होता. अजूनही तो नशिबाचाच शोध घेत आहे. कसं सापडेल त्याला नशीब? आधी कष्ट, मग नशीब! हो की नाही बालमित्रांनो?
संकेत प्रदीप सिद्धभट्टी

उंट, बगळा, हत्ती, अस्वल, माकड, खारुताई, सिंह हे तुमचे लाडके प्राणी पुन्हा एकदा गोष्टींमधून तुमचं मनोरंजन करायला, तुम्हाला चार युक्तीच्या गोष्टी सांगायला पुस्तकरुपात तुमच्यासमोर उभे ठाकले आहेत. निर्मला मोने लिखित ‘जंगल जंमत’या पुस्तकमालिकेत मेहता पब्लिशिंग हाऊसने बच्चेकंपनीसाठी हा धम्माल गोष्टींचा खजिना पेश केला आहे. या गोष्टींत तुमचे लाडके प्राणी भेटतात. ते कधी जंगलची सैर घडवून आणतात , तर कधी तुम्हांला त्यांची फटफजिती पाहायला मिळते. कधी ते शहाण्यासारखे वागतात, तर कधी वेडय़ा विचारापायी स्वत:चं नुकसान करून घेतात. काही प्राणी चक्क शहाण्यासारखं वागत आपल्याला चक्क काही धडे देतात. उंटाला देवाने दिलेल्या लांब मानेच्या वराने तो कसा शेफारतो आणि देवच त्याचे कसे गर्वहरण करतो ही गोष्ट वाचताना ‘गर्व करणं हे वाईटच’ ही शिकवण मिळते. पिंटू पेलिकनच्या दुष्टपणाची खेकडा कशी त्याला सजा देतो, हे वाचताना ‘बरं झालं अशीच खोड मोडली पाहिजे’, असं आपल्या तोंडून सहज निघून जातं.
माकडाच्या हावरटपणाला राजा त्याला कायमची अद्दल घडवतो. मोती हत्तीची हुशारी, कबुतर आणि कासवाची दोस्ती, खारीने कोल्ह्याला घडविलेली अद्दल, कावळ्यानं हुशारीने कोल्ह्याला दिलेला मार, मैनेचा लोभीपणा,अप्पू आणि मिंटूची दोस्ती अशा अनेक गमती-जमती या गोष्टींतून आपल्याला वाचायला मिळतात. या गोष्टींमध्ये कधी कधी माणसेही येतात, पण क्वचितच. खरी धम्माल घडवतात ते जंगलातचे प्राणीच.
एक मात्र नक्की, या गोष्टी आपले मनोरंजन करतात. त्याचबरोबर नकळतपणे आपल्याला चांगल्या वर्तणुकीच्या गोष्टीही शिकवून जातात. या गोष्टी दुसऱ्याशी चांगलं वागायला शिकवतात. नेहमी दुसऱ्याला मदत करायला सांगतात. खोटेपणाने वागू नका. सच्ची मैत्री कशी असावी, हे शिकवतात. या पक्षी-प्राण्यांमध्ये माणसांसारखेच राग-लोभ आहेत. रुसवा-फुगवा आहे, भांडण-मैत्री आहे. त्यामुळेच या गोष्टी आपल्याला अधिक जवळच्या वाटतात. पुस्तकांच्या सुरुवातीला जोक्स व शेवटी रंगविण्यासाठी चित्र दिली आहेत.
मग तुम्ही कधी सैर करताय या जंगलाची? ‘जंगल जंमत’ या पुस्तक मालिकेअंतर्गत या सात पुस्तकांची किंमत प्रत्येकी ३० रुपये इतकी आहे.
लता

एका वहीत एक संपूर्ण चित्र वेगवेगळ्या भागांत काढून घ्या. म्हणजे एकाच पानावर पूर्ण चित्र न काढता चित्राचा पहिला एक दशांश भाग पहिल्या पानावर, पुढचा एक दशांश भाग दुसऱ्या पानावर या प्रमाणे हे चित्र दहा पानांत क्रमवार पूर्ण करा. आता वहीची पाने वेगाने उलटा. काय वाटतं? चित्र गतिशील आहे आणि जणू एखादा मूकपट आपण पाहात आहोत, असं वाटतं ना!
मूकपट बनविण्याचा आणखी एक मजेशीर प्रकार आहे. तो असा - बरणीचे दहा सेंटीमीटर व्यासाचे, प्लास्टिकचे एक झाकण घ्या. त्याच्या मध्यावर एक भोक पाडा. (आकृती क्रमांक १) या भोकात बॉलपेनचे रिफिल असं बसवा की लिहिण्याचे टोक झाकणाच्या भोकात अडकेल (आकृती क्रमांक २). मात्र झाकणाचे हे भोक असे असू द्या की झाकण रिफिलवर मोकळेपणाने फिरेल. आता कागदाची एक लांब पट्टी कापा. एवढी लांब की ती झाकणाच्या आतल्या कडेवर गोलाकार गुंडाळल्यावर पुरेल. या कागदाच्या पट्टीवर क्रमवार बदलणारी चित्रे काढा (आकृती क्रमांक ३). झाकणाच्या आतल्या भागावर आता ती चित्रं चिकटवा. झाकण गोलगोल फिरवल्यावर माणूस पळताना किंवा पक्षी उडताना दिसेल (आकृती क्रमांक ४). चित्र अधिक उठावदार दिसण्यासाठी चित्राची कडा काळया रंगाने रंगवा.
अरविंद गुप्ता,
आयुका

सुंदरबन नावाचं
एक जंगल होतं.
शाल पांघरून फुलांची
मजेत बसलं होतं.

मिठ्ठी-मिठ्ठी जांभळं होती.
आंबट-चिंबट बोरं होती.
करवंदीच्या जाळीमागे
निवडुंगाची चेटकी होती.

डोईवरला तुरा मिरवत
निळे मोर धावायचे.
कापूस-पांढरे ससे
लपाछपी खेळायचे.

एक दिवस जंगलामध्ये
एक दुष्ट कुऱ्हाड आली.
गर्रागर्रा डोळे फिरवत
जिभल्या चाटत फिरू लागली.

दात विचकत येत होती.
नजरेत तिच्या धार होती.
सपासप, झपाझप
झाडं खाऊ लागली.

लता-वेली, पशुपक्षी
धायधाय रडू लागले.
माओं, माओं टाहो फोडत
निळे मोर धावू लागले.

पण कुऱ्हाड बहिरी होती.
डोळ्यांनी आंधळी होती.
हिरव्यागार रानाची
भूक तिला लागली होती.

फस्त करून सारे रान
कुऱ्हाड सुस्त झाली.
क्रूर, खुनशी पात्याला
मस्त डुलकी आली.

लपून-छपून पानाआडून
चतुर पोपट पहात होता.
दुष्ट कुऱ्हाड कधी झोपते
लक्ष त्याचे बारीक होते.

झोपी जाताच कुऱ्हाडबाई
पोपट गेला भुंग्याकडे,
उठा, उठा भुंगेदादा
कुऱ्हाडीला दावू इंगा.

भुंग्याने मग केलं काय?
कुऱ्हाडीचा मोडला पाय
काय त्याची चक्की चाले
भुसुभुसू दांडा पिसे

फुंकणीसारखा पोकळ केला
काटकन् मोडून पडला
चतुर आमचा पोपटदादा
कुऱ्हाडीला दावला इंगा.

जंगल पुन्हा हसू लागले.
वाऱ्यावरती डुलू लागले.
गुंगुं भुंगा बोले
मिठुमिठू पोपट बोले.

या मित्रांनो, लवकर या.
भरभर झाडे लावूया.
झरझर पाणी घालुया.
पृथ्वी सुंदर करूया.
माधवी सामंत

बालदोस्तांनो, होळी आणि रंगपंचमीच्या सणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल. आम्हांला ठाऊक आहे, की तुम्ही मुलं पर्यावरणाचे मित्र आहात. त्यामुळे तुम्ही ‘इकोफ्रेंडली रंगपंचमी’ साजरी करण्याचा विचार केला असेलच. यावर्षी कशी साजरी कराल तुम्ही ‘इकोफ्रेंडली रंगपंचमी’,
हे आम्हाला दीडशे शब्दांत
२६ फेब्रुवारीपर्यंत
जरूर लिहून पाठवा.
आमचा पत्ता - लोकरंग - बालरंग, लोकसत्ता संपादकीय विभाग, इंडियन एक्स्प्रेस न्यूजपेपर्स लिमिटेड, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई -४०००२१.