Leading International Marathi News Daily
रविवार, २२ फेब्रुवारी २००९

भारतीय उपखंडात २०११ साली होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. नवी दिल्लीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चार यजमानांची पहिली बैठक झाली. आयसीसीने आपली उपस्थिती राखली. पाकिस्तान, श्रीलंका या दोन देशात कायम अशातंता आहे. भारतात, अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर प्रामुख्याने मुंबईवरील हल्ल्यानंतर विचारांची चक्रे वेगात फिरायला लागली. यजमान आयसीसीलादेखील स्पर्धेच्या भवितव्याविषयी काळजी वाटत होती; पण भारताने मुंबईवरील हल्ल्यानंतर ताबडतोब इंग्लंडबरोबरची कसोटी मालिका आयोजित करून क्रिकेट विश्वाच्या मनातील किंतू दूर केला. त्यामुळे आयसीसीलादेखील विश्वास वाटला. त्यांनीही विश्वचषक ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये हलविण्याचा विचार बाजूला सारला. २०११ ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतीय उपखंडात होणार हे आता निश्चित झाले.
या निश्चितीबरोबर आयसीसीला निश्चिंती मात्र मिळालेली नाही. कारण चार यजमानांपैकी एक प्रमुख असलेल्या पाकिस्तानातील सद्य:परिस्थिती समाधानकारक नाही. सुरक्षिततेचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. आतापर्यंत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, दक्षिण
 

आफ्रिका या गौरवर्णीयांच्या संघांनी पाकिस्तानात जाणे टाळले होते. मात्र आशिया खंडातील कोणत्याही देशाला पाकिस्तान हा देश खेळण्यासाठी असुरक्षित वाटत नव्हता. मुंबईवरील हल्ल्यानंतर भारताने सुरक्षिततेच्या व राजकीय कारणास्तव पाकिस्तानचा दौरा रद्द केला. त्यामुळे पाकिस्तानातील परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव क्रिकेट विश्वाला झाली. पाकिस्तानची त्रयस्थ ठिकाणी मालिका खेळण्याची मागणीही भारताने धुडकावली आहे. तो निर्णय राजकीय धोरणांचा एक भाग आहे. पाकिस्तानचा दौरा रद्द करणे आणि राजकीय पातळीवरील संबंधातील कटूता या दोन गोष्टी, विश्वचषक स्पर्धेच्या संयुक्त यजमानपदाच्या आयोजनात बाधा आणणाऱ्या आहेत.
आयसीसीने पाकिस्तानातील सामन्यांबाबत सध्या कोणताही निर्णय जाहीर केला नसला तरी आयोजन समितीला पाकिस्तानातील सामन्यांसाठी पर्यायी केंद्र, ठिकाणे शोधून ठेवण्यास सुचविले आहे. ही ठिकाणे पाकिस्तानाबाहेर असावीत हेही स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानाबाहेरची ही ठिकाणे संयुक्त अरब अमिराती किंवा अबू धाबी वा तत्सम ठिकाणी नसावीत, असेही आयसीसीचे म्हणणे आहे. २०११ च्या विश्वचषक भारतीय उपखंडाला देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी जागा उर्वरित तीन देशातच असाव्यात, असेही सुचविण्यात आले आहे. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचे अंतिम सामन्यांसह भारतात एकूण २२ सामने होणार आहेत. मुंबई, कोलकाता, चेन्नई, नवी दिल्ली, हैदराबाद, बंगलोर, पुणे, अहमदाबाद, मोहाली, नागपूर या शहरांमध्ये हे सामने होणार आहेत.
पाकिस्तानातील लाहोर, पेशावर, कराची, फैसलाबाद, मुलतान, रावळपिंडी या सहा शहरांमध्ये एकूण १४ सामने होणार आहेत. बांगलादेशात ढाक्क्यालाच सामन्यांच्या आयोजनास मान्यता मिळाली आहे. श्रीलंकेत फक्त कोलंबो या शहरालाच हिरवा कंदील आयसीसीने दाखविला आहे. याचाच अर्थ पाकिस्तानातील १४ सामन्यांच्या आयोजनाचा भार भारतावर पडणार आहे. भारतात जगात सर्वाधिक क्रिकेट केंद्रे आहेत. ३३ पेक्षाही अधिक केंद्र असणाऱ्या भारतात या सामन्यांचे सहज आयोजन होईल.
पण तोच कदाचित कळीचा मुद्दा ठरू शकेल. मुंबईवरील हल्ल्याच्या कारणांपैकी क्रिकेटमधील भारताच्या सर्वागीण यशाची पोटदुखी हे एक कारण असल्याची माहिती पुढे आली होती. पाकिस्तानच्या तोंडचा घास जर आपण गिळला तर? पाकिस्तानकडून होणारा भारताचा दु:स्वास त्यामुळे वाढणार आहे. शिवाय उर्वरित केंद्रांवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा अल्पावधीत करण्याचे नवे आव्हान पुढे येणार आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या आयोजन समितीच्या साऱ्या अटींची पूर्तता सर्व भारतीय केंद्रांना करावी लागेल. मुंबईसारख्या केंद्रावरही त्यापैकी बऱ्याच गोष्टींची पूर्तता होत नव्हती. त्यामुळे वानखेडे स्टेडियमचे दोन मुख्य भाग पाडून तेथे नव्याने स्टेडियम उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये आयसीसीच्या अटींची पूर्तता होणाऱ्या साऱ्या गोष्टी असतील. मोहाली, नागपूरचे नवे स्टेडियम, काही प्रमाणात हैदराबादचे स्टेडियम यावरच या गोष्टी परिपूर्ण आहेत. अन्य केंद्रांवर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांच्या तुलनेत क्रिकेट व प्रसिद्धी माध्यमांसाठीच्या सुविधा परिपूर्ण नाहीत.
अशा परिस्थितीत आयसीसी पाकिस्तानातील सर्व सामने भारतात हलविण्यास राजी होईल काय?
सुरक्षा व्यवस्थेची समस्या त्यापेक्षाही मोठी आहे. यजमान क्रिकेट बोर्डापेक्षाही तो प्रश्न त्या त्या देशाचा आहे. विश्वचषक आयोजन समितीला प्रत्येक देशाच्या प्रमुखांनी सुरक्षिततेची हमी दिली आहे. भारताच्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानचे त्या वेळचे अध्यक्ष लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी, तसेच श्रीलंका व बांगलादेशच्या प्रमुखांनी पत्राद्वारे सुरक्षेची हमी आयोजन समितीला दिली आहे. पाकिस्तानातील परिस्थिती त्यानंतर बदलली. लोकशाही सरकार तेथे स्थापन झाले. त्यामुळे मुशर्रफ यांच्या काळातील सुरक्षा व आजची यात बरीच तफावत आढळते. मुशर्रफ स्वत: क्रिकेटप्रेमी होते आणि पाकच्या लष्कराचा ताबा त्यांच्याकडे होता. त्या वेळी भारतीय संघालादेखील समाधानकारक सुरक्षा देण्यात आली होती. आज टेलिव्हिजनवर तेथील परिस्थिती बदलली असल्याचे लक्षात येते. सध्याच्या वातावरणात तेथे स्पर्धेत सहभागी होणारे प्रमुख संघ जातील, अशी परिस्थिती नाही. मैदान, ड्रेसिंग रूम, हॉटेल, आहारव्यवस्था आदींची सुरक्षा याची हमी पाकिस्तान बोर्डाने दिली असली तरीही शहरातील सुरक्षेची हमी तेथील सरकारने द्यायची आहे. तीच मुख्य समस्या आहे. आयसीसीच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणाऱ्या यंत्रणेला पाकिस्तान सरकारने सुरक्षा व्यवस्था समाधानकारक असल्याचे पटवून द्यावे लागणार आहे. पाकिस्तानात येणाऱ्या प्रत्येक संघाची समस्या वेगवेगळी असेल. प्रत्येक संघाचे शत्रू वेगळे असतील. संभाव्य धोका त्या धोक्याचे स्वरूप वेगवेगळे असेल. त्यामुळे आयसीसीच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणाऱ्या यंत्रणेला प्रत्येक संघाच्या सुरक्षिततेचा, त्यांना होणाऱ्या संभाव्य धोक्याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागणार आहे. विश्वचषक दोन वर्षांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक यजमानांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. पाकिस्तानची समस्या सर्वात गंभीर स्वरूपाची आहे. तेथे जाण्याइतपत विश्वास सहभागी संघांना देणे मोठी अवघड गोष्ट आहे. दरम्यानच्या काळातील पाकिस्तानातील घटनाही आयसीसीच्या पुढील निर्णयावर प्रभाव पाडणाऱ्या असतील.
विनायक दळवी

कर्णधार हा संघातला महत्वाचा घटक. जय- पराजयाबरोबरच संघ घडविणे सुद्धा कर्णधाराचेच काम, एखादा चांगला कर्णधार मिळाला तर तो संघाला जगज्जेताही बनवू शकतो. सध्या सगळ्या देशातील बोर्डाना आगामी विश्वचषकाची चाहुल लागली असून तो जिंकण्यासाठी खमके आणि अनुभवी नेतृत्व असावे यासाठी सारे जण प्रयत्नशील आहेत आणि त्याच धर्तीवर अवघ्या क्रिकेट विश्वात नेतृत्व बदलाचे वाहू लागले आहेत. त्या नव्या कर्णधाराला संघाशी जुळवून घ्यायला, संघ बांधणी करायला, पुरेसा अनुभव मिळायला विश्वचषकाच्या दोन वर्षांपूर्वीपासूनच कर्णधाराची अदला-बदली सुरु झालेली पहायला मिळते आहे.
श्रीलांकेचा महेला जयवर्धनेचेच उदाहरण घ्याना. पकिस्तानला त्याने त्यांच्याच मातीत धूळ चारली. त्यानंतर भारताने त्यांचा ४-१ असा पराभव केला व कावळा बसायला आणि फांदी तुटायला, असा हा एकच पराभव त्याला कर्णधारपदावरून पायउतार व्हायला पुरेसा ठरला. या मालिकेनंतर बोर्डाने त्याला बोलावून " २००१ च्या विश्वचषकासाठी नवा संघ बनवायचा असल्याने तू कर्णधारपदाचा राजीनामा द्यावास", अशी विनंतीवजा धमकी दिली आणि महेलाला कर्णधारपद सोडावे लागले. ज्याने २००७ च्या विश्वचषकात संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचविले त्याची गच्छंती बोर्डाने फक्त एका पराभवाने केली. महेलाच्या कर्णधार कौशल्याचे गोडवे तर अवघ्या क्रिकेट विश्वात गायले जात होते. पण त्याच्या या इनिंगचा शेवट मात्र चांगला झाला नाही. त्याच्या नंतर हा काटेरी मुकु ट कोणाच्या माथी ठेवणार हे अजूनही बोर्डाने स्पष्ट केलेले नाही. सनथ जयसूर्याला वयोमानामुळे तर संगकाराने नापसंती दर्शविल्याने तिलकरत्ने दिलशान हा श्रीलंकेचा नवा कर्णधार ठरू शकतो.
दुसरा बदल घडला तो नेहमीच अशांत असलेल्या पाकिस्तानात. शोएब मलिकच्या ऐवजी युनूस खानला कर्णधार करण्यात आलेले असले तरी यामागे पीसीबीची दूरदृष्टी वगैरे वाटत नाही. कारण मलिक एक कर्णधार म्हणून चांगलाच सेट झालेला होता आणि एका पराभवानेच त्याचा बळी घेतला. इथल्या अनाकलनीय राजकारणाचे कोडे कुणालाही सुटलेले नाही. आज मलिक गेला, उद्या युनूस जाईल यानंतर ‘वरचा मजला रिकामी’असलेल्या शहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तरला कर्णधार केल्यास आश्चर्य वाटू नये.
नेतृत्व बदलाचे हे वारे ऑस्ट्रेलियातही पोहचले आहेत. दोन वेळा विश्वचषक मिळवून देणाऱ्या रिकी पॉन्टिींगला डच्चू मिळण्याची लक्षणे दिसत आहेत. पॉन्टिंग हा एक चाणाक्ष कर्णधार असला तरी त्याने बनवलेला संघ आता राहीलेला नाही. त्याचबरोबर संघात दुफळी निर्माण केली आहे ती उपकर्णधार मायकेल क्लार्कने. या दोघांमधला संघर्ष काही दिवसांपूर्वी चव्हाटय़ावर आला होता. २०११ च्या विश्वचषकात कर्णधारपद भूषविण्याचे स्वप्न तोही मनी बाळगून असेलच. नुकत्याच
झालेल्या एकदिवसीय आणि ट्वेंन्टी-२० साामन्यांमध्ये पॉन्टींगला संघाबाहेर काढण्यात आले होते आणि हिच नेतृत्व बदलाची नांदी ठरू शकते.
नेतृत्व बदल हा इंग्लंडच्या संघातही पहायला मिळाला. पीटरसनच्या जागी स्ट्रॉस आला, पण हा निर्णय घेण्यात आला तो फक्त पीटरसनच्या एका मागणीवरून. खरंतर एवढा ‘हार्ड अ‍ॅन्ड फास्ट रूल’ अवलंबताना यापूर्वी इंग्लंड दिसली नाही. खरेतर पाटरसनमध्ये एक चांगला कर्णधार दडलेला होता. पण हा निर्णय त्यांचा योग्य ठरतो का अंगावर येतो हे काही दिवसातच कळेल.
हे सारे नेतृत्व बदल घडत आहेत ते भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा विजयी टक्का पाहून. भविष्याची पावले फार पूर्वीच ओळखून दोन्ही देशांच्या निवडसमितीने युवा खेळाडूंकडे कर्णधारपद सुपूर्द केले आणि या दोघांनीही योग्य ती संघबांधणी करून एकामागून एक यशाची शिखरे पादाक्रांत केली. हे मिळालेले घवघवीत यश पाहूनच अनेक संघाचे कर्णधार बदलले गेले आहेत किंवा जातील. कारण सध्याचे क्रिकेट हे फास्टफूड सारखे झाले आहे आणि प्रत्येकाला चव चाखायची आहे ती फक्त यशाची. यामुळे एखाद्या कर्णधाराचे भवितव्य हे एका मालिकेच्या यशा-अपयशावरून ठरवले जात आहे. कुंबळे, जयवर्धने आणि मलिक हे त्याचेच शिकार ठरले आणि अजुन अशा किती विकेट्स पडणार माहीत नाही.
एका मालिकेच्या पराभवावरून जर नेतृत्व बदल होणार असतील तर एकेकाळी संघात बारावा असलेला खेळाडू कर्णधार झालेला दिसेल आणि त्याच्यापेक्षा सर्व बाबतींमध्ये वरचढ असलेले खेळाडू त्याच्या हाताखाली खेळताना दिसतील. ज्यांनी कधी हातात बॅट धरली नाही त्यांना संघनेतृत्व काय चीज आहे हे कसे कळणार.
लोकही हल्ली क्रिकेटवर प्रेम करत नाहीत तर विजयावर करतात, या खेळाचे दर्दी रसिक कमी झालेले आहेत आणि याचा ही काहीसा प्रभाव नेतृत्व बदलावर पहायला मिळतो. पण असे जर तडकाफडकी नेतृत्वात बदल झाले तर यामुळे संघाची वाताहत होणार आणि याचाच विपरीत परिणाम संघावर होऊ शकतो, हे यांना कोण समजावून सांगणार. संघाचे नेतृत्व बदलले म्हणजे यश मिळते असे थोडेच आहे. त्यासाठी कर्णधाराला पुरेसा वेळ द्यायला हवा, शितावरून भाताची परीक्षा करणं कितपत योग्य आहे याचा विचार करायला हवा. नाहीतर यशाच्या मृगजळामागे धावता-धावता, कर्णधाराची अदला-बदली करता करता संघाची ससेहोलपट होईल आणि नेतृत्व बदलात होरपळलेला संघाचा श्वास तुटल्या वाचून राहणार नाही.
प्रसाद लाड

क्रिकेटचे प्रभावी मार्केटिंग हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने चघळण्याचा विषय असला तरी क्रिकेटव्यतिरिक्त इतर क्रीडाप्रकारांसाठी मात्र चिंतेचा किंबहुना हेवा करण्याजोगा मुद्दा आहे. क्रिकेटला एवढी प्रसिद्धी का दिली जाते, आमच्या खेळांना न्याय का दिला जात नाही, अशी ओरड सातत्याने क्रिकेटेतर खेळांकडून होत असते. त्यात तथ्य असले तरी क्रिकेट त्याला कारणीभूत नाही, हेदेखील तेवढेच खरे आहे. मात्र तरीदेखील या ना त्या कारणाने हा मुद्दा मध्येमध्ये डोके वर काढत असतो. भारताचे माजी बॅडमिंटनपटू आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकणारे प्रकाश पदुकोण यांनी मध्यंतरी क्रिकेटच्या या यशस्वी मार्केटिंगच्या तंत्राला सलाम केला होता. इतर खेळांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे, असा सल्ला द्यायला ते विसरले नव्हते. पदुकोण यांनी दिलेला अशाप्रकारचा प्रथमच दिलेला हा सल्ला नाही, किंबहुना क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांतील अनेक खेळाडूंनीही क्रिकेटच्या मार्केटिंगच्या तंत्राची प्रशंसा केली आहे.
भारतात किंवा भारतीय उपखंडात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे, हे वेगळे सांगण्याची गरज उरलेली नाही. क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळातून स्वत:चे हित साध्य करण्याचा जर कुणी प्रयत्न करीत असेल तर त्यात त्यांचे चुकले असे म्हणता येणार नाही. इथे क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा क्रिकेटचा प्रसार करण्याच्या उदात्त हेतूने कोणतेही उद्योग किंवा कंपन्या क्रिकेटकडे आकर्षित होत नाहीत, हे लक्षात ठेवायला हवे. क्रिकेट लोकप्रिय असल्यामुळे आपले उत्पादन अनेकापर्यंत पोहोचेल आणि नफा कमावता येईल, हा एकमेव उद्देश या उद्योगांचा असतो. इतर खेळांत पैसा गुंतवून तोच नफा मिळविता येणे अशक्य आहे. त्यामुळेच त्या खेळांसाठी क्रिकेटच्या तुलनेत कमी रकमेची तरतूद केली जाते. यात मग क्रिकेटची चूक नाही किंवा त्या उद्योगांचीही नाही. अर्थात, या उद्योगांकडून क्रिकेटेतर खेळांनाही मदत मिळायला हवी, हेही तेवढेच खरे आहे. त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चालण्यासारखे नाही.
क्रिकेटेतर खेळांकडे क्रिकेटच्या तुलनेत आर्थिक पाठबळ नक्कीच कमी आहे. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही विविध योजना राबविता येत नाहीत. हे पाठबळ वाढविण्यासाठी क्रिकेटच्या श्रीमंतीकडे द्वेषाने पाहण्याची गरज नाही. हे पाठबळ स्वकर्तृत्वानेच मिळविता येईल. त्यासाठी विविध खेळातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उंचावण्याशिवाय पर्याय नाही. ही कामगिरी उंचावली तरच त्यांना कॉर्पोरेट क्षेत्राकडे मदतीची अपेक्षा करता येईल. वर्षांनुवर्षे खराब कामगिरी केल्यानंतरही जर आर्थिक मदत मिळत नाही, असे रडगाणे कुणी गात असेल, तर त्याचा दोष त्याच्याकडेच जाईल. आज टेनिससारखा खेळ लिएण्डर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे प्रकाशझोतात आला आहे. या खेळाच्या स्पर्धा वाढल्या आहेत, आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतात येऊन खेळू लागले आहेत. भारतीय खेळाडूंना परदेशात जाऊन प्रशिक्षण घेण्याची, विविध स्पर्धात भाग घेण्याची संधी मिळू लागली आहे. अशा परिस्थितीत हा खेळ उद्योगांकडे अपेक्षेने पाहू शकतो आणि उद्योगक्षेत्राकडूनही त्यांच्या या कर्तृत्वाला दाद मिळू शकते. गेल्या वर्षी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतातील नेमबाज, बॉक्सर्स, मल्ल यांनी आपली छाप पाडली. बॅडमिंटनपटू सायना नेहवालही ऑलिम्पिकसह अनेक स्पर्धात चमकली. मात्र त्याचा फार थोडा काळ गवगवा झाला. उलट, मिळालेल्या यशाचा कसा फायदा उठवायचा याचा विचार क्रिकेटने वेळोवेळी केला. ट्वेन्टी-२०चा विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत काढण्यात आलेली प्रचंड मिरवणूक, अनेक छोटय़ा-मोठय़ा घडामोडींची तात्काळ प्रसिद्धी, एखादा वादग्रस्त मुद्दा सतत धगधगत ठेवण्याची पद्धत यामुळे क्रिकेट चर्चेत राहिले. इतर खेळ वादविवादांच्या बाबतीत अनेकदा पुढे राहतात, पण खेळाडूंच्या किंवा स्पर्धाच्या प्रसिद्धीच्या बाबतीत पुढाकार घेत नाहीत, परिणामी खेळाच्या प्रसाराला कुठेतरी खीळ बसते. स्पर्धेच्या प्रसिद्धीच्या बाबतीत फारशी काळजी घेतली जात नाही. अल्पसंतुष्ट राहण्यातच धन्यता मानली जाते. त्यामुळे काही ठराविक प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यानंतर आपले काम झाले, ही भावना बळावते. जिल्हा किंवा राज्यस्तरावरच्या संघटना प्रसिद्धीच्या बाबतीत फारशा सजग दिसत नाहीत. स्पर्धांचे आयोजन होते, पण त्या कधी होतात, कधी संपतात हे कळत नाही. या लहान बाबी दुर्लक्षित केल्या जातात. आज कबड्डी, खो-खो यासारखे देशी खेळ जिल्हा किंवा राज्यस्तरावर खेळविले जातात, त्यावेळी त्याचे निकाल पाठविण्यात तत्परता दाखविली जाते. ती तत्परता टेबल टेनिस, बॅडमिंटनमध्ये अल्पप्रमाणात दिसते. प्रसारमाध्यमांनी दखल घ्यावी यासाठी थोडे प्रयत्न संघटनांकडूनही व्हायला हवेत, प्रसारमाध्यमे सहाय्य करीत नाहीत अशी ओरड करून चालण्यासारखे नाही. प्रसारमाध्यमांनी दखल घेण्यासाठी त्यांचे क्रिकेटपासून लक्ष वळविण्यासाठी क्रिकेटेतर खेळांनाही मेहनत घ्यावी लागेल.
आज अनेकदा असे पाहायला मिळते की, एखाद्या एजन्सीकडे स्पर्धेचे वृत्त देण्याची जबाबदारी सोपवून आपले काम झाले, अशी भावना बळावत चालली आहे. पण त्या वृत्ताची दखल प्रसारमाध्यमांकडून घेतली जाते आहे की नाही, घेतली जात नसेल तर त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून ती घेण्यासाठी प्रयत्न करणे संघटनांच्या हाती असते. पण एजन्सीने सर्व वर्तमानपत्रांत बातमी छापून आणल्याचे दाखविल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडण्याची पद्धत संघटनांनी सोडून द्यायला हवी. प्रसारमाध्यमे व संघटना यांच्यातील संवाद वाढायला हवा. क्रिकेटला दोष देण्यापेक्षा शून्यापासून सुरुवात करायला हवी आहे. आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी प्रथम खेळाचा दर्जा उंचवायला हवा. हे पाठबळ मागून मिळणारे नाही, ते मिळवावे लागेल.
महेश विचारे