Leading International Marathi News Daily                               रविवार , २२ फेब्रुवारी २००९

अस्वस्थता!
संतोष प्रधान, मुंबई, २१ फेब्रुवारी

शिवसेना व राष्ट्रवादीचे वाढलेले गुफ्तगू, भाजपबरोबर घटस्फोट घ्यावा म्हणून शिवसेनेत वाढत चाललेला दबाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गुगलीमुळे काँग्रेसमध्ये निर्माण झालेला संभ्रम या विविध राजकीय घडामोडींमुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय पातळीवर कधी नव्हे एवढी अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोण कुठे जाणार, कोणती आघाडी आकारास येणार याची अनिश्चितता असल्याने राजकीय पातळीवर सारेच अनिश्चित झाले आहे! यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.शिवसेना भाजपबरोबरील युतीला कंटाळली आहे. भाजपला बरोबर घेऊन सत्तेचा सोपान गाठणे कठीण असल्याचा मतप्रवाह शिवसेनेत झाला आहे. शिवसेनेबरोबरील संबंध तोडल्याशिवाय राज्यात पक्षाची वाढ होऊ शकत नाही, असे ठाम मत भाजपात झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीत वेगळे चित्र नाही.

‘स्लमडॉग’वर दोन अब्ज रूपयांचा सट्टा
नवी दिल्ली २१ फेब्रुवारी/पीटीआय

ऑस्कर पुरस्कारांचे मानकरी कोण ठरणार याबाबत जगभरात उत्सुकता वाढत चालली असून या पुरस्कारांची यादी अगोदरच फुटली व ‘स्लमडॉग मिलिनियर’ या चित्रपटाला दोन ऑस्कर मिळाली, अशी अफवाही शुक्रवारी उठली होती. या चित्रपटावर दोन अब्ज रूपयांचा सट्टा लागल्याचे समजते. २२ फेब्रुवारीला हे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर होत असून त्यात ए.आर.रेहमान व रिसुल पोकुट्टी यांचे भवितव्य त्यात ठरणार आहे. संगीतकार ए.आर.रेहमान हे अगोदरच लॉसएंजल्सला गेले असून पोकुट्टी लवकरच दाखल होणार आहेत. डॅनी बॉयल यांच्या स्लमडॉग मिलिनियरचा चमूही येणार आहे. या चित्रपटाला एकूण दहा ऑस्कर नामांकने मिळाली आहेत.

शाळेत मोबाईल वापरल्यास विद्यार्थ्यांना ५० तर, शिक्षकांना १०० रुपये दंड
नागपूर, २० फेब्रुवारी /प्रतिनिधी

शाळेच्या परिसरात किंवा वर्गातही विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षक, शिक्षेकतर कर्मचाऱ्यांचा, एवढेच नव्हे तर मुख्याधकांचाही मोबाईल फोन वाजला तर त्यांना ५० रुपयांपासून तर १०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. शालेय शिक्षण खात्याने यासंदर्भात नुकचेत एक परिपत्रक काढले असून ते सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांना पाठविले आहे. गेल्या काही दिवसात शिक्षण संस्थांमध्ये मोबाईलचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे शैक्षणिक कार्यात व्यत्यय येत होता. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळा परिसरात मोबाईल वापरण्यावर बंदी आणली आहे. पूर्वी शाळांमध्ये केवळ शिक्षकांजवळ मोबाईल असायचे पण, गेल्या काही दिवसात विद्यार्थ्यांजवळही मोबाईल आले. त्याचा शाळेच्या परिसरात वापर होऊ लागला.

‘हुकमी एक्का’ मुख्यमंत्र्यांकडेच;
राऊत बसले रुसून, दर्डा समर्थक नाराज
मुंबई, २१ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी
महत्त्वाच्या खात्याची अपेक्षा असलेल्या नारायण राणे यांच्याकडे उद्योग व बंदरे ही खाती सोपवून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नगरविकास व गृहनिर्माण सारखी सर्वार्थाने महत्त्वाची असलेली आपल्याकडेच ठेवून ‘हुकमाचा एक्का’ आपल्याच हाती ठेवला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून तसेच खातेवाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे. आधीच राज्यमंत्री केले व आता गृहराज्य मंत्रीपदातील शहरे विभाग काढून घेतल्याने नितीन राऊत रुसून बसले आहेत. मंत्रीपद नाकारल्याने गोविंदराव आदिक यांच्यापाठोपाठ राजेंद्र दर्डा यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानातील दहशतवाद्यांवरही उगारला अमेरिकेने कारवाईचा बडगा!
न्यूयॉर्क, २१ फेब्रुवारी/पीटीआय

पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्या सीमावर्ती भागामध्ये दडून बसलेल्या अल काईदा व तालिबानी दहशतवाद्यांच्या तळांवर तुफानी हल्ले चढविण्याबरोबरच अमेरिकेने आपल्या कारवाईची व्याप्ती वाढविली आहे. पाकिस्तानच्या भूमीत आश्रय घेतलेल्या तालिबानींच्या तळांवर अमेरिकी लष्कराकडून आता जोरदार हल्ले चढविले जात आहेत. धडक कारवाई करावयाच्या दहशतवादी गटांची एक यादी अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएने तयार केली असून त्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आणखी काही नावांची भर घातली आहे. बैतुल्ला मसुद याच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटाचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

‘रुळलेले’ मजूर घाबरले, पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली
मुंबई, २१ फेब्रुवारी / प्रतिनिधी

रेल्वेमार्गावरून एक एक्स्प्रेस गाडी वेगाने मार्गक्रमण करीत आहे..ही बाब रेल्वेमार्गातील रुळ उचलणाऱ्या मजुरांच्या लक्षात येते..गर्भगळीत झालेले मजूर हातातील रुळ रेल्वेमार्गावर टाकून तशीच धूम ठोकतात..ते पाहून एक्स्प्रेसचा चालक आणीबाणीचा ब्रेक दाबतो..तरीसुद्धा गाडी जावून रुळावर धडकते..तो रुळ एक्स्प्रेसच्या इंजिनात अडकतो आणि गाडीतील प्रवाशांना जोरदार धक्का बसतो..बऱ्याच अंतरापर्यंत एक्स्प्रेस तशीच फरफटत जाते..चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने एक्स्प्रेसचे इंजिन व डबे रुळांवरच राहतात..

निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये अल्पसंख्य पोलीस महासंचालक
अहमदाबाद, २१ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

गुजरातच्या पोलीस महासंचालकपदी शब्बीर हुसैन शेखदम खांडवावाला यांची नियुक्ती नरेंद्र मोदी सरकारने आज केली. अशा रितीने गुजरातच्या पोलीस महासंचालकपदी प्रथमच अल्पसंख्य समाजातील आयपीएस अधिकारी विराजमान होत आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच गुजरात सरकारने ही नियुक्ती केल्याचे सांगितले जात आहे. आधीचे पोलीस महासंचालक पी. सी. पांडे यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त ओ. पी. माथूर यांच्या जागी या पदावर एस. के. सैकिया या ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

सत्यम कंपनीच्या हस्तांतरणासाठी गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागविणार
हैदराबाद, २१ फेब्रुवारी/पीटीआय

हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या सत्यम कॉम्प्युटर कंपनीच्या हस्तांतरणासाठी गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. तसेच या कंपनीचे विद्यमान ऑडिटर प्राईस वॉटरहाऊस कूपर्सला हटवून त्यांच्या जागी नव्या ऑडिटरची नेमणूक करावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय सत्यम कॉम्प्युटरच्या नव्या संचालक मंडळाने घेतला आहे. सत्यम कंपनीच्या नव्या संचालक मंडळाचे प्रमुख किरण कर्णिक असून, या मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सत्यम कॉम्प्युटरचे १२ टक्के समभाग लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या ताब्यात आहेत. सत्यम कॉम्प्युटर ताब्यात घेण्यासाठी लार्सन अँड टुब्रो व बी. के. मोदी यांची स्पाईस कॉर्पोरेशन या कंपन्या उत्सुक आहेत. दरम्यान सत्यम कॉम्प्युटरचे विद्यमान ऑडिटर प्राईस वॉटरहाऊस कूपर्सला हटवून त्या जागी नव्या ऑडिटरची नेमणूक करावी अशी शिफारस या कंपनीचे नवे संचालक मंडळ केंद्र सरकारला करणार आहे. प्राईस वॉटरहाऊस कूपर्सचे भागीदार एस. गोपालकृष्णन व तलौरी श्रीनिवास यांनाही सत्यम कंपनीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान ७८०० कोटी रुपयांचा घोटाळा करणारा सत्यम कंपनीचा माजी अध्यक्ष रामलिंग राजू, त्याचा भाऊ व कंपनीचा माजी व्यवस्थापकीय संचालक राम राजू याच्यासह पाच आरोपींच्या न्यायालयीन कोठडीच्या मुदतीत येत्या सात मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हैदराबादच्या स्थानिक न्यायालयाने हा आदेश दिला.

झी गौरव पुरस्कार
चित्रपटांमध्ये ‘जोगवा’ तर नाटकांमध्ये ‘यू टर्न’ सर्वोत्कृष्ट
मुंबई, २१ फेब्रुवारी / प्रतिनिधी

अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अतुल परचुरे यांनी मारलेल्या कोपरखळ्यांनी गोरेगावच्या ‘एसआरपीएफ’ मैदानावर रंगलेल्या झी गौरव पुरस्कार समारंभात ‘जोगवा’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा तर ‘यू टर्न’ने सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार पटकावला. तर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाचा पुरस्कार ‘एक रिकामी बाजू’ने पटकावला. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव आणि ज्येष्ठ संकलक एन. एस. वैद्य यांना या समारंभात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रेया गोशाल, कैलास खेर यांनी या वेळी मराठी गाणी सादर केली. अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे - चित्रपट विभाग - सर्वोत्कृष्ट कथा - श्रीधर तिळवे - चित्रपट - जोशी की कांबळे, पटकथा - रमेश मोरे - चित्रपट - महासत्ता, दिग्दर्शन - राजीव पाटील - जोगवा, अभिनेता - गिरीश परदेशी - मर्मबंध, अभिनेत्री - लीना भागवत - डोह. नाटय़ विभाग - सर्वोत्कृष्ट लेखक - आनंद म्हसवेकर - यू टर्न, दिग्दर्शन - सचिन गोस्वामी - गोची प्रेमाची, अभिनेता - संग्राम समेळ - संन्यस्त ज्वालामुखी, अभिनेत्री - इला भाटे - यू टर्न.

पाकिस्तान म्हणते, कसाबवर भारतातच खटला चालवा
इस्लामाबाद, २१ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

मुंबईमध्ये हल्ला करण्यात सहभागी असलेला दहशतवादी अजमल आमीर कसाब याचे भारतातून पाकिस्तानात हस्तांतरित करणे शक्य होणार नाही. कसाब याने भारतात गुन्हा केला असल्यामुळे तिथेच त्याच्यावर खटला चालवावा असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री अहमद मुख्तार यांनी म्हटले आहे. मुख्तार पुढे म्हणाले की, मुंबईवरील हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्यांपैकी ज्यांना पाकिस्तानमध्ये अटक झाली आहे त्यांच्यावर पाकिस्तानमध्येच खटले चालविले जातील.

 


 

प्रत्येक शुक्रवारी