Leading International Marathi News Daily

रविवार , २२ फेब्रुवारी २००९

(सविस्तर वृत्त)

पारधी समाजाची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल!
कळंब, २१ फेब्रुवारी/वार्ताहर

पिढय़ानपिढय़ा गुन्हेगार म्हणून कलंक लागलेला व गावकुसाबाहेर राहणारा, अशिक्षित समाज म्हणून

 

पारधी समाजाकडे पाहिले जाते. अशिक्षित असतानाही, कायद्याचा अभ्यास असणाऱ्या या समाजाच्या महिला, पतीने केलेल्या गुन्ह्य़ामधून त्यांना सोडविण्यासाठी धडपडत असतात. या समाजाचा हा कलंक पुसावा व या समाजाची लहान मुले शिक्षणाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. या समाजाच्या तरुण मुलांना शेतीची गोडी लागावी, यासाठी शासनाने मोफत जमिनीचे वाटप केले असल्याने गुन्हेगारीचा लागलेला कलंक पुसून आता शेतकरी बनू पाहत आहेत.
गावाबाहेर वस्ती, या वस्तीवर कसलीच सोय नाही, दारूचा उग्र दर्प, फक्त महिलांचीच वर्दळ, लहान मुलांच्या हातात पाटी, पेन्सिलच्याऐवजी ही मुले हातभट्टीचे कँड घेऊन बसलेली, बापाचा पत्ता नाही, सतत पोलिसांचा ससेमिरा असल्याने पुरुष मंडळी रात्रीच येऊन बायकोची भेट घेऊन जातात, चोरी करून आणलेल्या पैशांचाही उपभोग घेता येत नाही; परंतु हा धंदा सोडूनही चालत नाही, सोडला तरी पोलीस कुठल्याही गुन्ह्य़ात अडकवितात, हा समाज म्हणजे पारधी समाज. या समाजाने समाजाच्या व शासनाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे यासाठी शासनाबरोबर, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती प्रयत्न करीत आहेत. आपला पती गुन्हेगार आहे, त्याला सोडविण्यासाठी या समाजाच्या महिला धडपडत असतात, वकिलाच्याही पुढे एक पाऊल टाकणाऱ्या या महिला कायद्याच्या अभ्यासक म्हणून परिचित आहेत.
या समाजाची तरुण मुले गुन्हेगारीपासून परावृत्त व्हावी, यासाठी विविध योजनेद्वारे त्यांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात कळंब, वाशी या तालुक्यांत पारधी समाजाची संख्या भरपूर आहे. शासनाच्या आदिवासी प्रकल्प योजनेअंतर्गत गुन्हेगारमुक्त पारधी पेढीचे जनक बिभीषण काळे यांनी या भागातील पारधी समाजाच्या झोपडीपर्यंत विविध योजना आणल्याने हा समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. या जिल्ह्य़ातील गुन्हेगार शेतीकडे आकर्षित व्हावा यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, दीडशे एकर जमिनीचे वाटपही करण्यात आल्याची माहिती श्री. काळे यांनी दिली.
या समाजातील महिला आणखी सक्षम बनाव्यात, यासाठी महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पुरुषाने शेती करावी व महिलांनी कुटुंब चालवावे, असा हेतू यामध्ये आहे. हा समाज वस्तीवर असल्याने, त्याच वस्तीवर शासन घरकूल योजनेतून चांगले घरे बांधून देत असून मोहा, ढोकी, वाकडी, मस्सा, कन्हेरवाडी आदी ठिकाणी घरकुल तयार होऊन या मंडळीने तिथे संसार थाटला आहे. लहान मुलांच्या कपाळी गुन्हेगारीचा कलंक लागू नये, यासाठी या जिल्ह्य़ातील या समाजाची शंभर मुले इंग्रजी शाळेत शिकू लागली आहेत. त्यामुळे हा समाज आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असून गुन्हेगार असलेल्यांनी यापूर्वी आत्मसमर्पण करून गुन्ह्य़ाची कबुली दिली होती. त्यामुळे आता सर्वसामान्य शेतकऱ्याप्रमाणे हा समाजही शेतीकडे आकर्षित झाला आहे.