Leading International Marathi News Daily                               सोमवार, २३ फेब्रुवारी २००९

राष्ट्रवादी-शिवसेना युतीची शक्यता दिल्लीतील गणितांमुळे कठीण
सेनेसाठी पवार दिल्लीची लढाई सोडतील?

समर खडस, मुंबई, २२ फेब्रुवारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उद्धव ठाकरे यांची दिल्ली येथे गुप्त भेट झाली असून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी युती होणार असल्याच्या बातम्या सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून काढत आहेत. मात्र अशी युती होणे शक्य नसल्याचे शरद पवार यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यास त्याचा परिणाम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात होईल. मात्र समजा या दोन्ही पक्षांच्या मिळून ३५ जागा जरी निवडून आल्या तरी शरद पवार यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न त्यामुळे कसे काय पुरे होऊ शकते, असे पवारांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

सगळय़ाच राजकीय पक्षांच्या सावध भूमिका
नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी/पीटीआय

चौदाव्या लोकसभेचे अधिवेशन लवकरच संपत असून, त्यानंतर काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी सुरू करणार आहे. सध्या राजकीय वातावरण तापू लागले असले तरी देशपातळीवर राजकीय चित्र अनिश्चित आहे. एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले की, संसद अधिवेशनाचे दडपण नसेल अशाच वेळी काँग्रेस पक्ष मित्र पक्षांशी जागावाटपाची बोलणी करील. पक्षाचे सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष व इतर वरिष्ठ नेते जागावाटपाच्या बोलण्यांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतील, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते शकील अहमद यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकारणाच्या सारीपाटावर अजूनही मोहरे स्थिरच आहेत. संसद अधिवेशन संपल्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने डावपेचांना सुरुवात होईल.

वेळ पडल्यास स्वत: मातोश्रीवर जाईन - गोपिनाथ मुंडे
ठाणे, २२ फेब्रुवारी/प्रतिनिधी

शिवसेना - राष्ट्रवादी युती शक्य नाही. कारण भाजपा-सेना युती ही हिंदूत्त्वावर आधारीत असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्त्वाला तिरांजली देतील असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपिनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा इतिहास पाहता त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संघटक शरद कुलकर्णी यांच्या आठवणी शब्दबद्ध केलेल्या 'समर्पित शरद' या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपिनाथ मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. . त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबतच्या वावडय़ा या मिडियांनी उठविलेल्या आहेत. ठाकरे-पवार भेटीच्या वृत्तात तथ्य नसल्याचे सांगताना ते म्हणाले, त्या दिवशी पवार दिल्लीत नव्हते. केवळ काँग्रेसवर दबाव टाकण्याची पवारांची ही रणनिती आहे.

काश्मीरमधील चकमकीत दोन ठार
लष्कराच्या विरोधातही गुन्हा दाखल

श्रीनगर, २२ फेब्रुवारी/पी.टी.आय.

जम्मू-काश्मीरमधील सोपोर शहरात लष्कराकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन युवक ठार; तर एकजण जखमी झाले. या घटनेच्या विरोधात स्थानिकांनी केलेल्या निदर्शनानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, लष्करावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. बारामुल्लाचे उपायुक्त बशीर अहमद खान म्हणाले, की सोपोर शहरात सावधगिरी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या गोळीबारात महंमद अमीन तांत्रे आणि जावेद अहमद या युवकांचा मृत्यू झाला होता.

बावन्नकशी विश्वविक्रम
कराची, २२ फेब्रुवारी/ पीटीआय

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने आणि थिलान समरवीरा यांनी वैयक्तिक द्विशतके झळकावित नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. येथील नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध खेळत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने आणि थिलान समरवीरा यांनी चौथ्या विकेटसाठी ४२८ धावांची भागीदारी रचत तब्बल ५२ वर्षांनंतर नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी इग्लंडच्या पीटर मे आणि कॉलीन काऊड्री यांनी १९५७ साली एजबॅस्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना चौथ्या विकेटसाठी ४११ धावांची भागीदारी रचली होती.

पंतप्रधान कार्यालयीन कामकाज सुरू करणार
नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

महिन्याभरापूर्वी झालेल्या बायपास शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे ते आपले कार्यालयीन कामकाज आता पाहू शकतील, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. डॉ. विजय डिसिल्वा यांनी सांगितले, की शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधानांनी चार आठवडे विश्रांती घेतल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली. त्यामुळे आता ते आपले दैनंदिन व्यवहार स्वतंत्रपणे पाहू शकत आहेत. पण अजून एक आठवडा डॉ. सिंग यांना फिजिओथेरपी देण्यात येणार असून, त्यांना आहाराची पथ्ये सुरू राहणार आहेत. डॉ. सिंग यांच्यावर २४ जानेवारी रोजी बायपास शस्त्रक्रिया झाली होती.

शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीलाच शिक्षण खात्याच्या मंत्रीपदाचा घोळ
तुषार खरात, मुंबई, २२ फेब्रुवारी

हाता तोंडावर आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा, पर्सेटाईलचा लटकलेला प्रश्न, आगामी शैक्षणिक वर्षांतील प्रवेश प्रक्रियेचे धोरण, वस्तीशाळा शिक्षकांच्या नेमणुकांचा वाद, राज्यात डीएड संस्थांचे फोफावलेले पीक, कायम विनाअनुदानित शाळांचे अन्यायकारक धोरण, शाळांनी दहावी-बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा दिलेला इशारा..असे अनेक प्रश्न राज्याच्या शालेय शिक्षण विभागासमोर आ वासून उभे असतानाही या महत्त्वपूर्ण खात्यासाठी मंत्री नेमतानाही सत्ताधाऱ्यांकडून कमालीचे राजकारण होत असल्याची नाराजी शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

‘यूजीसी’ नियमावलीचाच स्वायत्तता मोहिमेला खीळ!
पुणे, २२ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

अधिकाधिक महाविद्यालयांनी स्वायत्तता घेण्याबाबत राज्य शासनाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमावलीमुळेच या मोहिमेला खीळ बसत आहे.
तंत्रशिक्षण संचालनालय आणि ‘व्हीआयटी’च्या संयुक्त विद्यमाने आज स्वायत्ततेविषयी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्वायत्ततेसंदर्भातील विविध पैलूंवर विचारविनिमय करण्यात आला. तंत्रशिक्षण संचालक डॉ. एस. के. महाजन, प्राचार्य डॉ. हेमंत अभ्यंकर, नौशाद फोर्बस्, डॉ. अशोक घाटोळ, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. बी. एम. नाईक, डॉ. आर. एम. जालनेकर, बाळासाहेब वाघ आदींनी त्यामध्ये भूमिका मांडली.

श्रीलंकेतील धुमश्चक्रीत ७३ तामीळ वाघ ठार
कोलंबो, २२ फेब्रुवारी/पी.टी.आय.

मुल्लाईटिवू या श्रीलंकेतील एलटीटीईच्या ताब्यातील बालेकिल्ल्यात श्रीलंकेचे लष्कर आणि तामीळ गनिम यांच्यात अंतिम धुमश्चक्री सुरू झाली असून त्यामध्ये ७३ तामीळ बंडखोर ठार करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या लष्कराने दिली. तामीळ वाघांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात लंकेचे लष्कर आता चोहोबाजूने घुसले असून एलटीटीई गनिमांचा शस्त्र निर्मितीचा कारखानाही त्यांनी ताब्यात घेतला आहे. मुल्लाईटिवू भागातील पुथुकुडियीरीप्पू आणि अंम्पालावनपोक्कानई या भागात शनिवारी सकाळीपासूनच गनिमांसमवेत जोरदार चकमकी घडत आहेत. शनिवारी सकाळी सुरू झालेल्या या पहिल्याच चकमकीत ३६ गनीम ठार झाले व ११ बंडखोरांचे मृतदेह श्रीलंकेच्या लष्कराला मिळाले. त्यानंतर या भागामध्ये खोलवर घुसून लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत आणखी ३७ तामीळ बंडखोर ठार झाल्याचे लष्कराने म्हटले आहे.

स्वातमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याचे अपहरण
इस्लामाबाद, २२ फेब्रुवारी / पीटीआय
शस्त्रसंधी झाल्यानंतर एक दिवसातच पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात आज एका प्रशासकीय अधिकाऱ्यासह त्याच्या सहा सुरक्षारक्षकांचे अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे.
नुकतेच नियुक्त करण्यात आलेले जिल्हा समन्वय अधिकारी खुशाल खान यांचे स्वात जिल्ह्णाातील मिंगोरा भागाच्या सीमेवर त्यांच्या सुरक्षारक्षकांसह अपहरण करण्यात आले आहे. खान आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांचे कोणी अपहरण केले याबाबत अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही, असे स्वातमधील मलाकंद विभागाचे आयुक्त सईद मोहम्मद जावेद यांनी सांगितले.

चीनमध्ये कोळसा खाणीतील स्फोटात ७३ ठार
बीजिंग, २२ फेब्रुवारी/पी.टी.आय.

चीनच्या शांक्सी प्रांतात एका कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात आज ७३ खाणकामगारांचा मृत्यू झाला. जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक असलेल्या चीनमध्ये कोळसा खाणींमध्ये स्फोट होण्याच्या घटना वरचेवर घडत असून, त्यात मोठय़ा प्रमाणावर खाणकामगारही दगावत आहेत. बचाव पथकांनी सांगितले, की या स्फोटात जखमी झालेल्या ११३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यापैकी २१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.झिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या खाणीत स्फोट झाल्यावर तेथील ३४० कामगार स्वत:ची सुटका करून घेण्यात यशस्वी झाले. खाणीत अडकलेल्या अन्य कामगारांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू असून, अपघातस्थळी ४० रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. जखमी कामगारांना कार्बन मोनॉक्साईड वायूची बाधा झाली आहे, असेही या वृत्तात म्हटले आहे.

ओरिसामध्ये अपघातात १४ ठार
संबळपूर, २२ फेब्रुवारी/पी.टी.आय.

लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणारी गाडी एक्स्प्रेस ट्रेनला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात वऱ्हाडातील वधूसह १४ जण ठार, तर दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. संबळपूरपासून जवळ असलेल्या धानगेर येथे ही दुर्घटना घडली. वऱ्हाडाला घेऊन जाणारी जीप ट्रेनच्या इंजिनामध्ये अडकून २०० मीटर इतक्या लांबपर्यंत फरफटत नेली गेली. बारगड आणि बारपेली या रेल्वेस्थानकांच्यादरम्यान जीपने पेट घेतला. या भीषण अपघातात एकूण १४ जण ठार झाले असून मृतांमध्ये सात महिला एक लहान मूल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात वधू पिंकी देहुरे (१८) आणि इतर ११ जण जागीच ठार झाले. ही गाडी लग्नसमारंभ आटोपून नवऱ्याच्या घरी नेली जात असताना हा अपघात झाला.

 


प्रत्येक शुक्रवारी