Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
व्यापार -उद्योग
(सविस्तर वृत्त)

पुढील दीड वर्षांत १०० शाखांचे अभ्युदय बँकेचे लक्ष्य -सीताराम घनदाट
व्यापार प्रतिनिधी:
एकंदर सहकार चळवळ अडचणीत असताना, जनसामान्य-श्रमिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे कामगिरी चोखपणे बजावणारी अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक प्रगतीचे नवनवे टप्पे गाठत चालली आहे. ‘आपली बँक’ हे आपले ब्रीद पुरेपूर निभावताना अभ्युदय बँक यापुढेही अशीच प्रगती करीत राहील आणि येत्या वर्ष-दीड वर्षांत १०० शाखांचा टप्पाही गाठेल, असा संकल्प अभ्युदय

 

बँकेचे माजी अध्यक्ष व विद्य्मान ज्येष्ठ संचालक सीताराम घनदाट यांनी व्यक्त केला.
अभ्युदय बँकेच्या ७५ व्या शाखेचे उद्घाटन अलीकडेच भाईंदरमध्ये करण्यात आले. नव्या क्षेत्रात शाखा उघडण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न बँकेकडून सुरू असून, गेल्या सहा महिन्यांत सुरू झालेली ही बँकेची २१वी शाखा आहे. बँकेच्या या घोडदौडीबद्दल ‘लोकसत्ता’शी बोलताना ज्येष्ठ संचालक घनदाट म्हणाले की, ‘मुंबईतील गिरणगावात ४५ वर्षांपूर्वी रूजलेल्या इवल्याशा रोपटय़ातून आज वटवृक्ष साकारताना दिसत आहे.’’ बँकेच्या अलीकडच्या काळातील वेगवान प्रगतीत अभ्युदय बँकेकडून वर्षभरापूर्वी ब्रॅण्ड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले गेलेले चतुरस्र अभिनेते आदेश बांदेकर यांचे योगदानही मोठे आहे, असे घनदाट यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
अभ्युदय बँकेच्या ७५ व्या भाईंदरस्थित शाखेचे उद्घाटन मीरा-भाईंदर महानगर पालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष नित्यानंद प्रभू हे होते, तर व्यासपीठावर माजी अध्यक्ष व विद्य्मान संचालक सीताराम घनदाट, व्यवस्थापकीय संचालक विजय मोर्ये, बँकेचे ब्रॅण्ड अम्बॅसेडर आदेश बांदेकर तसेच मीरा-भाईंदरचे माजी नगराध्यक्ष गिल्बर्ट मेन्डोंसा व प्रफुल्ल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष रोहिदास पाटील तसेच मीरा-भाईंदरचे अनेक लोकप्रतिनिधी आणि मोठय़ा संख्येने नागरिक समुदाय उपस्थित होता.
अभ्युदय बँकेने गेल्या दोन वर्षांत पुण्याच्या सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातमधील बडोद्यची श्रीकृष्ण सहकारी बँक तसेच अहमदाबादच्या माणिक चौक सहकारी बँक त्याचप्रमाणे कर्नाटकातील उडिपीस्थित जनता को-ऑपरेटिव्ह बँक अशा चार बँकांना संपादित करून, त्यांच्या हवालदिल ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा तर दिला आहेच, पण आपला शाखा व व्यवसायविस्तार महाराष्ट्राच्या सीमांबाहेर विस्तारण्यातही यश मिळविले आहे.