Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
व्यापार -उद्योग
(सविस्तर वृत्त)

‘ल्युसीफर लाइट्स’तर्फे एलईडी आधारित लायटिंग उत्पादने
व्यापार प्रतिनिधी:
भारतात लाइट एमिटिंग डायोड (एलईडी) आधारित लायटिंग उत्पादनांची प्रवर्तक असलेल्या ‘ल्युसीफर लाइट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या पुणेस्थित कंपनीने आपली विशाल उत्पादन श्रेणी भारतभर उपलब्ध करून दिली आहे. मुंबईत गोरेगाव (पूर्व) येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये येत्या २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या ‘लायटिंग साऊथ एशिया’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ही सर्व उत्पादने एकत्रित प्रदर्शित केली जाणार आहेत. एलईडी आधारित लायटिंग उत्पादने लक्षणीय वीजबचत करणारी, पर्यावरण सुरक्षित आणि सध्याच्या टय़ूबलाइट्स, सीएफएल व सोडियम लॅम्प्सना पर्यायी

 

ठरणारी आहेत.
या संदर्भात माहिती देताना ‘ल्युसीफर लाइट्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पुरोहित म्हणाले, की एलईडी आधारित दिव्यांचा वापर फार पूर्वीपासून विशेषत: सजावटीच्या रोषणाईसाठी केला जातो. या दिव्यांना अगदी कमी वीजप्रवाह पुरतो, देखभालीची गरज नसते आणि त्यांचे आयुष्य किमान ५०,००० तास (पारंपरिक विद्युत दिव्यांपेक्षा पाच ते दहापट अधिक) असते. आम्ही याच एलईडीवर आधारित विविध लायटिंग उत्पादने अलीकडेच देशभर उपलब्ध करून दिली आहेत. घरात, तसेच घराबाहेर वापरासाठी उपयुक्त असणाऱ्या ६३ उत्पादनांची श्रेणी आम्ही सादर केली असून, येत्या मार्चपर्यंत त्यात आणखी २० उत्पादनांची भर पडणार आहे.
‘ल्युसीफर’च्या श्रेणीमध्ये इनडोअर लाइट्स, फ्लड लाइट्स, सायनेज, स्ट्रीट लाइट्स, अंडरवॉटर लाइट्स, इंडस्ट्रिअल लाइट्स, क्लिन रूम, फ्लेम प्रूफ, एलईडी ड्रायव्हर्स, डीसी ऑपरेटेड स्ट्रिप्स अशा विविध उत्पादनांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने मोठय़ा प्रमाणावर वीजबचत करतात. सोडियम लॅम्प्सच्या तुलनेत ८० टक्के, सीएफएलच्या तुलनेत ७० टक्के, तर टय़ुबच्या तुलनेत ५० टक्के कमी वीज एलईडी आधारित दिव्यांना लागते. स्ट्रीटलाइट, बेलाइट, फ्लड लाइट अशा प्रखर दिव्यांना उच्च वॉटेजची वीज लागते. त्याजागी एलईडी आधारित लायटिंग उत्पादने वापरल्यास वीज वापर व खर्च कमी होतो. याचे उदाहरण देताना पुरोहित म्हणाले, की पुण्यासारख्या शहरात दीड लाख पथदिवे (स्ट्रीट लाइट) असून, त्यातील बहुतेक २५० वॉटचे सोडियम व्हेपर आहेत. त्यांच्या विजेचा खर्च दिवसाला ११ लाख रुपये (प्रति किलोव्ॉट २.९० रुपये विशेष दराने) येतो शिवाय ते दिवसाला १६१ टन एवढे कार्बन उत्सर्जन करतात. या जागी एलईडी आधारित पथदिवे वापरल्यास प्रकाश क्षमता तेवढीच राखूनही त्यांना प्रत्येकी केवळ ४५ वॉट वीज पुरेल, वीज खर्च दोन लाख रुपयांपेक्षा कमी येईल आणि कार्बन उत्सर्जनामुळे होणारे प्रदूषण टळेल.