Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

लोकमानस

प्रदर्शन नव्हे, वास्तव दर्शन

 

८१ व्या ऑस्कर समारंभात ‘स्लमडॉग मिलिऑनर’ चित्रपटाने आठ ऑस्कर पटकावले, याचा भारतीयांनी आनंद साजरा केला हे उचितच आहे. संगीतकार ए. आर. रहमान आणि उत्कृष्ट ध्वनिमिश्रणासाठी रसूल पुकुट्ट या दोघा भारतीयांना ऑस्करची बाहुली स्वीकारताना पाहिले तेंव्हा भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला असेल. गीतकार गुलझार हे त्याचा गौरव स्वीकारण्यासाठी तेथे उपस्थित नव्हते. या तीनही ‘अस्सल भारतवासी’यांचे मनपूर्वक अभिनंदन. ह्य़ा चित्रपटाचे लौकिकार्थाने कर्ते-करविते, अर्थात निर्माते, दिग्दर्शक भारतीय नाहीत, तरीही या चित्रपटाच्या यशाची खरी धनी आपली मुंबई आहे हे मान्य करावेच लागेल. चित्रपटाची कथावस्तु, त्यातील कलाकार, त्याचे चित्रण हे सर्वथा येथील आहे. चित्रपट पाहून काहींनी नाके मुरडली होती कारण त्यांच्या मते हा चित्रपट भारतातील दारिद्य््रााचे प्रदर्शन करतो, असा त्यांचा आक्षेप आहे. पण ते योग्य नाही कारण ते प्रदर्शन नसून वास्तव दर्शन आहे. चित्रपटांनी केवळ छान छान व गोजीरवाणे असावे असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी आपल्याकडच्या कारखान्यांतून अनेक चित्रपट येत असतातच. त्यातले किती लक्षात राहतात? यापूर्वी अशीच टीका सत्यजित रे यांच्यावरही केली जात असे. पण ते त्याला बधले नाहीत. त्यांचे चित्रपट अजरामर ठरले. केवळ परकीय माणसांनी येथे येऊन येथली फक्त गरिबीच टिपली म्हणून गळा काढण्यात अर्थ नाही. वास्तवतेला स्वीकारण्याची मानसिकता जेव्हा आपण अधिकाधिक दृढतेने जोपासू तेंव्हाच स्लमडॉग मिलिनेअरसारखे चित्रपट आपल्याला खऱ्या अर्थाने उमजू शकतील.
कुणाल देशमुख, अहमदनगर

जागतिकीकरणावर मात!
‘स्लमडॉग मिलिऑनर’ चित्रपटाला तब्बल आठ ऑस्कर मिळणे हे भारताचाच बहुमान आहे. या चित्रपटाच्या नावाविषयी ज्यांनी आक्षेप घेतले त्यांच्या ‘ज्ञाना’विषयी आदर राखूनही असे म्हणता येईल, की हा चित्रपट चाकोरीबाहेर जाऊन वास्तवाचे दर्शन घडविणारा आहे. ए. आर. रहमान यांचे संगीत ही या चित्रपटाची खासियत ठरली. त्यांचे संगीत हे त्यांच्या इतर चित्रपटांइतके चांगले नसेलही कदाचित, पण त्यांनी दिलेल्या गाण्यातले ‘जय हो’ हे शब्दच मनाला एकदम भुरळ घालणारे ठरले आहेत. एकूण हा चित्रपटाचाच ‘जय’ आहे.
भारतात दारिद्रय़ आहे, असंख्य नागरिक झोपडय़ांमध्ये राहतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यात लाजण्यासारखे काय आहे? न्यूयॉर्कमध्ये असणाऱ्या झोपडय़ा दाखवल्या तर वाहवा आणि मुंबईतल्या दाखवल्या तर हळहळ, असे वाटून कसे चालेल? राज कपूरचा ‘श्री ४२०’ तेव्हा ‘ऑस्कर’मध्ये उतरला नाही म्हणून, अन्यथा त्या वेळीही त्याचा विचार होऊ शकला असता. ‘स्लमडॉग’ने एका अर्थाने जागतिकीकरणावरही अशी मातच केली आहे.
श्रीनिवास साठे, पुणे

प्रतिभावान संगीतकारामुळेच
‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटासाठी संगीतकार ए. आर. रहमान यांना मिळालेली दोन ऑस्कर पारितोषिके प्रत्येक भारतीय संगीत प्रेमींचे हृदय उचळंबून टाकणारी आहेत. आपले संगीत जागतिक स्तरावर पोहोचू शकते, याचा हा एक पुरावा आहे. रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीतकाराने आत्तापर्यंत दिलेल्या संगीताचाही हा गौरव म्हटला पाहिजे.
या संपूर्ण चित्रपटात संगीत पडद्यावर कुठेही ‘दिसत’ नाही आणि तरीही त्याचे अस्तित्व आपल्याला सतत जाणवत राहते. ‘जय हो’ हे गीत खास रहमान शैलीतले असले तरी ते चित्रपटात ठिगळासारखे येत नाही. उलट ते आशय अधिक समृद्ध करते.
रहमान यांच्यासारखा तरुण आणि प्रतिभावान संगीतकार आजमितीस आहे, म्हणून भारतीय संगीताचा डांगोरा साऱ्या जगभर पिटता येतो आहे, हे त्याच्या विरोधकांनाही मान्य करावे लागेल.
शैलेंद्र वाघमारे, पुणे

ब्रिटिश दिग्दर्शकाने हॉलीवूडला दिलेले भान
‘स्लमडॉग’ हा विषय म्हणजे डॅनी बॉयल या ब्रिटिश दिग्दर्शकाने हॉलिवूडला दिलेले भान आहे. अमेरिकेखेरीज जगात असणाऱ्या इतर देशांकडे पाहायची ही चांगली दृष्टी आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ किंवा ‘हू वॉन्ट्स टू बी मिलिऑनर’ सारखे कार्यक्रम जगभर गाजले, पण त्यावर चित्रपट होऊ शकतात आणि त्यात वेगळया प्रकारचा मसाला वापरला जाऊ शकतो, हे विकास स्वरूप या भारतीय लेखकाने ओळखले. त्यांच्या नावाचा उल्लेख मात्र ‘स्लमडॉग’ला ऑस्कर जाहीर करताना व्हायला हवा होता. स्वरूप हे भारताचे राजनैतिक अधिकारी आहेत, याचा विसर न व्हावा.
योगेश पवार, मुंबई