Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

इस्लामपूर पालिकेत रंगले ‘संगीत मानापमान’
इस्लामपूर, २३ फेब्रुवारी / वार्ताहर

नगराध्यक्षांनी अवमान केला म्हणून उपनगराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला असतानाच माजी नगराध्यक्षांनी अवमान केल्याच्या निषेधार्थ आता दस्तुरखुद्द नगराध्यक्षांनीच राजीनामा देण्याचा पवित्रा घेतल्याने इस्लामपूर नगरपालिकेत सध्या ‘संगीत मानापमान’ नाटक चांगलेच रंगू लागले आहे!

दिल्लीचा सोनूसिंग व चंद्रहार पाटील ‘जनसेवा’ व ‘नारायण’ केसरीचे मानकरी
सोलापूर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

दिल्लीच्या सोनूसिंग याने पंजाबच्या मनजितसिंगला अवघ्या सहाव्या मिनिटात एक चाकी डावावर लोळविले आणि उपस्थित २५ हजार कुस्तीप्रेमींच्या नेत्रांचे पारणे फेडत एक लाखाच्या रोख इनामासह सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या स्मरणार्थ ‘जनसेवा केसरी’ चांदीची गदा पटकावली.

वांग मराठवाडी धरणाचे काम बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा
सातारा, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

वांग मराठवाडी धरणाच्या काम बंद आंदोलनास श्रमिक मुक्ती दलाचा पाठिंबा असून कृष्णा खोऱ्याचे ठेकेदार, अधिकारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ माफी मागेपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन जारी ठेवण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत पन्हाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

भुईंजमध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
पै. कर्तारसिंग, चंद्रहार पाटील यांची उपस्थिती
सातारा, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील आराध्य दैवत श्री माणकाईदेवी यात्रेनिमित्त कारखाना व कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व २७ फेब्रुवारीला कार्यस्थळावर राज्यस्तरीय मॅटवरील ‘किसन वीर केसरी’ भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष आमदार मदन भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

ओबीसी आरक्षण बचाव रथयात्रा गुरुवारी सोलापुरात
सोलापूर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मराठा आरक्षणाला विरोध दर्शवून ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ओबीसी समन्वय समितीतर्फे हनुमंतराव उपरे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण रथयात्रा दि. २६ फेब्रुवारी रोजी सोलापुरात येणार आहे.तुळजापूर वेशीतील बलिदान चौकात दुपारी चार वाजता रथयात्रेचे आगमन होणार आहे. याबाबतची माहिती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राजन दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही रथयात्रा १ फेब्रुवारी रोजी शनिशिंगणापूर येथून निघाली असून त्यास ओबीसींकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. ५२ टक्के ओबीसींना २६ टक्के आरक्षण मिळाले असताना आता मराठा ओबीसी आरक्षणाची मागणी पुढे आल्याबद्दल ओबीसीवर्ग संकटात सापडला आहे. या आक्रमणाला आमचा तीव्र विरोध असल्याचे प्रा. दीक्षित यांनी सांगितले. या वेळी युवराज चुंबळकर, उस्मान बागवान, पुरुषोत्तम निकते आदी उपस्थित होते

हिंदू धर्मजागृती सभा
मिरज, २३ फेब्रुवारी / वार्ताहर

हिंदू धर्मावर होणारी आक्रमणे परतवून लावण्याचा निर्धार मिरज येथे झालेल्या हिंदू धर्मजागृती सभेत करण्यात आला. निधर्मी राज्यकर्त्यांकडून हिंदुद्रोही कायदे केले जात असून, हा धोका ओळखून हिंदूंनी अधिक जागरूक होण्याची गरज प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केली. या सभेत निळकंठ शिवाचार्य महास्वामी, पत्रकार अरविंद कुलकर्णी, धर्मशक्ती सेनेचे विजय पानवळकर, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक व हिंदू जनजागृतीचे प्रवक्ते रमेश शिंदे आदींनी आपले विचार मांडले. याप्रसंगी राष्ट्रभाषा हिंदीची गळचेपी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. या धर्मसभेत विविध १२ ठराव करण्यात आले. या धर्मसभेनिमित्ताने येथील मैदानावर विविध पुस्तकांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते.

जलनीतीबाबत २ मार्चला सांगलीमध्ये कार्यशाळा
सांगली, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

शेती, औद्योगिक व घरगुती पाणी वापराच्या ठोक जलनीतीबाबत दि. २ मार्च रोजी नागरिक हक्क संघटना व प्रयास संस्थेच्यावतीने एक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे व नगरसेवक हणमंत पवार यांनी दिली.जल प्राधिकरण आयोगाने जलस्त्रोताचे नियोजन व नियमन करण्यासाठी मसुदा तयार केला असून त्यात अनेक उणीवा आहेत. पाणीटंचाई काळात समन्यायी वितरणाला प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे पाणी वाटपातील विषमता नष्ट झालेली नाही. पाण्याची दर निश्चिती करतानाही मोठय़ाप्रमाणात दोष निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नावर या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत आमदार राजू शेट्टी, कॉम्रेड दत्ता देसाई, प्रयासचे प्रतिनिधी सचिन वरघडे, राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष अशोक पाटील- किणीकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. तरी सांगली व कोल्हापूर जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका व संबंधित अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेस मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही बर्वे व पवार यांनी केले आहे.

मोहोळजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात दोन तरुण मजूर ठार
सोलापूर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

भीमा नदीतील वाळूचा उपसा करून निघालेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला अपघात होऊन त्यात ट्रॉलीतील दोन तरुण मजूर जागीच मरण पावले, तर अन्य एक मजूर जखमी झाला. मोहोळ तालुक्यातील आरबळीजवळ सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात घडला. पांडुरंग बाबुराव भांगे (वय २२) व बालाजी गिरिधर सुरवसे (वय २०, दोघे रा. वडदेगाव, ता. मोहोळ) अशी या अपघातातील दोघा दुर्दैवी मृत मजुरांची नावे आहेत. जखमीचे नाव समजले नाही. तो याच गावचा असून, त्याचे वय २० वर्षांचे आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पळून गेला. एमएच १३ एजे ०७९२ या ट्रॅक्टरने दोन ट्रॉल्यांमधून बेगमपूर येथील भीमा नदीतील वाळूचा उपसा करून मजूर निघाले होते; परंतु पुढे काही अंतरावर आरबळी गावाजवळ अपघात होऊन त्यात तिन्ही मजूर ट्रॉलींमधून खाली पडले आणि त्यांच्या अंगावर वाळूचा ढिगारा कोसळला. त्यात दोघेजण गाडले जाऊन जागीच मरण पावले, तर तिसरा जखमी झाला.

साताऱ्यातील शिक्षण संस्थांचा बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार
कराड, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये येत्या गुरुवारपासून (दि. २६) सुरू होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील शिक्षण संस्थांचे अनेक प्रश्न, न्याय्य मागण्या प्रलंबित आहेत. यावर आक्रमक पवित्रा घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष देवीसिंह शेखावत यांनी महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन राज्यातील शिक्षण संस्थांनी येत्या १२ वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.या आवाहनास अनुसरून सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठक होऊन महामंडळाच्या आवाहनाचे जोरदार समर्थन करण्यात आले आहे. परीक्षांवर बहिष्कार म्हणजे विद्यार्थी, पालकांना वेठीस धरले जात नसून, त्यांचे हित जोपासले जात असल्याचा दावा जिल्हा संघाने केला आहे. महामंडळाने राज्य शासनाकडे सादर केलेल्या; परंतु अद्यापही कार्यवाही न झालेल्या शिक्षण संस्थांच्या १७ मागण्यांची यादी प्रसिद्धी माध्यमांना सादर करण्यात आली आहे. सदर बैठकीतील माहिती जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अशोकराव थोरात यांनी दिली.

जयंत फुटबॉल स्पर्धेत गोवा संघ विजेता
मिरज, २३ फेब्रुवारी / वार्ताहर

अखेरच्या क्षणापर्यंत शौकिनांची उत्सुकता राखलेल्या फुटबॉल स्पर्धेत गोवा संघाने हैद्राबाद संघाचा ट्रायबेकरवर पराभव करीत जयंत चषक पटकाविला. गेले आठ दिवस येथील शिवाजी क्रीडांगणावर सुरू असणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील फुटबॉल सामन्यातील खेळ पाहण्यास हजारोंच्या संख्येने क्रीडारसिकांनी गर्दी केली होती.उपांत्य व अंतिम सामने ट्रायबेकरवरच निकाली काढण्यात आले. गोवा संघाने चार विरूध्द तीन अशी आघाडी घेत हैद्राबाद संघाला पराभूत केले. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला रोख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. रात्री उशिरा गृहमंत्री जयंत पाटील, नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ, आमदार शंभुराजे देसाई व अजित घोरपडे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.या सामन्याचे नियोजन वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे सचिव वसंत अग्रवाल व स्थानिक खेळाडूंनी केले होते. महापौर मैनुद्दीन बागवान, गटनेते सुरेश आवटी, नगरसेवक इद्रिस नायकवडी व शिक्षण मंडळाचे सदस्य इब्राहिम चौधरी यांनी गृहमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मुंबई, गोवा, हैद्राबाद व कोलकत्ता आदींसह २० संघांनी सहभाग नोंदविला होता.

बचत गटाच्या माध्यमातून मंगल कार्यालय व लॉन्स
सोलापूर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मनोरमा परिवार, मनोरमा सखी मंच व मनोरमा महिला बचतगटाच्या माध्यमातून मनोरमा मंगल कार्यालय व लॉन्सची उभारणी विजापूर रस्त्यावरील कोटणीस नगरात करण्यात आली असून त्याचा शुभारंभ दि. २ मार्च रोजी काँग्रेसच्या नेत्या उज्ज्वला शिंदे यांच्या हस्ते होत असल्याची माहिती मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. मनोरमा सहकारी बँक व कविता सहकारी बँकेच्या सहकार्याने मनोरमा महिला बचतगटांची वाटचाल सुरु असून या परिवारात सध्या तीनशे महिला बचतगट कार्यरत आहेत. महिला स्वयंपूर्ण होण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून मनोरमा महिला स्वयंसहायता सहकारी पतसंस्था स्थापन करुन कर्जपुरवठा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. महिला दिनाचे औचित्य साधून दि. १ ते ८ मार्चपर्यंत ‘अष्टपैलू महिला सप्ताह’ आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त रांगोळी स्पर्धा, काव्य वाचन, कथाकथन, वक्तृत्व, निबंध, बुध्दिमत्ता चाचणी, उखाणे, संगीत खुर्ची आदी विविध कार्यक्रम होणार आहेत.