Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

इस्लामपूर पालिकेत रंगले ‘संगीत मानापमान’
इस्लामपूर, २३ फेब्रुवारी / वार्ताहर

 

नगराध्यक्षांनी अवमान केला म्हणून उपनगराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला असतानाच माजी नगराध्यक्षांनी अवमान केल्याच्या निषेधार्थ आता दस्तुरखुद्द नगराध्यक्षांनीच राजीनामा देण्याचा पवित्रा घेतल्याने इस्लामपूर नगरपालिकेत सध्या ‘संगीत मानापमान’ नाटक चांगलेच रंगू लागले आहे!
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान इस्लामपुरात जोमाने राबवून उभ्या महाराष्ट्रात पहिला नंबर पटकाविणाऱ्या इस्लामपूर नगरपालिकेत आता ‘तंटामुक्त’ अभियानही राबवावे व त्याची सुरूवात नगरपालिकेतील सत्ताधारी गटापासून करून नंतर ते विरोधी गटात व या दोन्ही ठिकाणी यशस्वी ठरल्यास संपूर्ण इस्लामपूर शहरात राबवावे, असा रास्त प्रस्ताव शहरवासीयांकडून पुढे आला आहे.
नूतन नगराध्यक्षा श्रीमती शारदादेवी पाटील या १५ दिवसापूर्वी नगरपालिका कामासाठी मुंबईला गेल्या होत्या. आपल्या गैरहजेरीत त्यांनी आपल्या कार्याचा पदभार उपनगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांच्याकडे न देता तो त्यांनी पाणीपुरवठा सभापती संजय कोरे यांच्याकडे सोपविला व येथेच मानापमानाची पहिली ठिणगी पडली. अ‍ॅड. चिमण डांगे यांना ही बाब खटकली. शाब्दिक चकमकही उडाली व त्यांनी नगराध्यक्षांनी आपला जाणीवपूर्वक अवमान केला म्हणत आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षप्रतोद विजय पाटील यांच्याकडे देऊन निषेध नोंदविला.
अ‍ॅड. चिमण डांगे यांच्या राजीनामा नाटय़ाची चर्चा ऐन रंगात आली असतानाच नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील ‘संगीत मानापमान’ नाटकाच्या दुसऱ्या अंकास शुक्रवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सुरूवात झाली. या ‘मानापमान’ नाटकाच्या दुसऱ्या अंकास निमित्त ठरले ते संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाच्या मुंबईत झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे! संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात इस्लामपूर नगरपालिकेला प्रथम क्रमांकाचे ४० लाख रूपयांचे पारितोषिक मिळाले. पारितोषिक वितरण मुंबई येथे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याहस्ते व वाळवा तालुक्याचे नेते गृहमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास नगराध्यक्षा श्रीमती शारदादेवी पाटील, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, माजी नगराध्यक्षा प्रा. अरूणादेवी पाटील, पक्षप्रतोद विजय पाटील व मुख्याधिकारी डॉ. उदय टेकाळे आदी उपस्थित होते.
मात्र प्रत्यक्षात या पुरस्काराचा स्वीकार माजी नगराध्यक्षा प्रा. अरूणादेवी पाटील यांनी केला व इथेच संघर्षांची ठिणगी पडून संगीत मानापमान नाटकाच्या दुसऱ्या अंकास प्रारंभ झाला. इस्लामपूर नगरपालिकेतील सत्ताधारी गट हा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. सव्वा दोन वर्षांपूर्वी २६ जागांसाठी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जयंत पाटील व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे २१ सदस्य निवडून आले, तर विरोधी आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या!
इस्लामपूर नगरपालिकेचे पहिल्या अडीच वर्षांचे नगराध्यक्षपद खुल्या गटातील महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सत्ताधारी गटाने नगराध्यक्षपदी प्रा. अरूणादेवी पाटील यांची निवड केली. त्यांच्या कार्यकाळातच संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत इस्लामपूर शहराची राज्यस्तरीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. मात्र निकाल घोषित होण्यापूर्वीच त्यांच्या कारकीर्दीला दोन वर्षे पूर्ण झाल्याने व महत्त्वाचे म्हणजे उर्वरित सहा महिन्यांच्या कालावधीसाठी श्रीमती शारदादेवी पाटील यांना नगराध्यक्ष पदाची संधी देण्यासाठी प्रा. अरूणादेवी पाटील यांना पक्षाच्या सुकाणू समितीने नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले व त्यानुसार त्यांनी दि. ६ जानेवारी रोजी राजीनामा दिला व श्रीमती शारदादेवी पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड
झाली. इथंपर्यंत सारं कसं शांत- शांत होतं, अगदी सुरळीतपणे सुरू होतं!
नगराध्यक्षा श्रीमती शारदादेवी पाटील यांचे पती बबनराव पाटील हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व अनुभवी अभ्यासू माजी नगरसेवक! आरक्षणामुळे बबनराव पाटील यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला, तेथे त्यांच्या पत्नी श्रीमती शारदादेवी पाटील उभ्या राहिल्या व विक्रमी मतांनी निवडून आल्या व नगराध्यक्ष बनल्या.
खरं तर पूर्वी नगरपालिकेत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील नागरिक संघटना व अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखालील शहर सुधार समिती अशा दोन आघाडय़ातच सत्ता संघर्ष असायचा. बबनराव पाटील हे अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखालील शहर सुधार समितीचे उमेदवार.. नगरसेवक! मात्र २००१- ०२ च्या नगरपालिका निवडणुकीत शहर सुधार समितीची भिस्त असणारे बबनराव पाटील हे अण्णासाहेब डांगे यांच्या शहर सुधार समितीतून बाहेर पडले व जयंत पाटील यांच्या नागरिक संघटनेत सहभागी झाले, निवडून आले व उपनगराध्यक्ष बनले!
या गटबदलातूनच अण्णासाहेब डांगे व बबनराव पाटील यांच्यात छुपा संघर्ष सुरू झाला. पुढे अण्णासाहेब डांगे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगरपालिका स्तरावरील शहर सुधार समिती बरखास्त केली व जयंत पाटील व अण्णासाहेब डांगे यांनी एकत्रित येऊन नगरपालिका निवडणूक लढवली व बहुमताने जिंकली. हे एकत्रिकरण घडल्याने बबनराव पाटील व अ‍ॅड. चिमण डांगे हे पुन्हा एकाच गटात आले. गट एक झाला, तरी मने मात्र दुभंगलेलीच राहिली.
अ‍ॅड. चिमण डांगे हे उपनगराध्यक्ष बनले, तर बबनराव पाटील यांच्या पत्नी श्रीमती शारदादेवी पाटील या नगराध्यक्ष बनल्या. बबनराव पाटील हे अभ्यासू व कामसू नगरसेवक अशी ख्याती असणारे असल्याने त्यांनी नगरपालिका कारभारात लक्ष घातले. कामकाजाला नेमकी दिशा देण्याचा प्रयत्न करू लागले. बबनराव पाटील यांचा हस्तक्षेप हा मानापमान नाटकाचा कळीचा मुद्दा ठरू लागला व सारं कसं शांत- शांत असणारे वातावरण वाढत्या उकाडय़ाबरोबरच तापू लागले.
एकवीस सदस्य असलेल्या सत्ताधारी गटात जशी धुसफूस आहे, तशीच ती केवळ पाच सदस्य असलेल्या विरोधी गटातही आहे. विरोधी आघाडीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना व काँग्रेस अशा तीन पक्षांचे सदस्य असले तरी संघर्ष आहे तो भाजपच्या बाबा सूर्यवंशी व विक्रम पाटील यांच्यात! त्यामुळे नगरपालिकेतील दोन्ही गट अंतर्गत संघर्षांबाबतीत समान पातळीवर आहेत. यामुळे तंटामुक्त अभियान राबवायचेच ठरले, तर ते नगरपालिकेतील सत्ताधारी- विरोधी आघाडी अशा स्तरावर प्रारंभी राबवावे लागेल व तेथे पूर्णपणे यशस्वी ठरले, तर मग शहरात राबवावे, असा प्रस्तावित योग्य प्रस्ताव नागरिकांनी मांडला आहे.
नगराध्यक्षा श्रीमती शारदादेवी पाटील यांनी मुंबईवरून परतल्यानंतर शनिवारी नगरपालिका कामकाजात भाग न घेता थेट राजीनामा सादर करण्याचा पवित्रा घेऊन मानापमान प्रकरण चव्हाटय़ावर आणले. येत्या एक- दोन दिवसात त्याला कसे वळण मिळते यावरच या मानापमान नाटकाचा शेवट अवलंबून असल्याने आगामी आठवडा नगरपालिकेतील सत्ताधारी गटांतर्गत संघर्षांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने तो लक्षवेधी आठवडा बनला आहे.