Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

दिल्लीचा सोनूसिंग व चंद्रहार पाटील ‘जनसेवा’ व ‘नारायण’ केसरीचे मानकरी
सोलापूर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

दिल्लीच्या सोनूसिंग याने पंजाबच्या मनजितसिंगला अवघ्या सहाव्या मिनिटात एक चाकी डावावर लोळविले आणि उपस्थित २५ हजार कुस्तीप्रेमींच्या नेत्रांचे पारणे फेडत एक लाखाच्या रोख इनामासह सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या स्मरणार्थ ‘जनसेवा केसरी’ चांदीची गदा पटकावली. दुसऱ्या लढतीत दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलने दिल्लीच्या अरविंदकुमारला अवघ्या आठव्या मिनिटात घुटना डावावर अस्मान दाखवून एक लाखाचे इनाम व अभिजित कदम स्मरणार्थ ‘नारायण केसरी’ चांदीची गदा मिळवून मैदान गाजविले.
सांगोला तालुक्यातील जवळा येथे नारायणदेव व महाशिवरात्र यात्रेनिमित्त आयोजिलेले भव्य कुस्त्यांचे मैदान सोनूसिंग व चंद्रहार पाटील यांच्या नेत्रदीपक प्रेक्षणीय कुस्त्यांमुळे चांगलेच गाजले. जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत देशमुख हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने हे कुस्त्यांचे मैदान भरवित आहेत. यंदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह दिल्लीचा महाबली, हिंदकेसरी सत्पाल, श्रीपती खंचनाळे, मारुती माने, गणपत आंदळकर, दीनानाथसिंह, दादू चौगुले, विनोद चौगुले, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता अप्पालाल शेख आदी नामवंत मल्लांची हजेरी होती. याशिवाय माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील, धवलसिंह मोहिते-पाटील, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, आमदार मधुकरराव चव्हाण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश पाटील, भारती विद्यापीठाचे कार्यवाह विश्वजित कदम हेही उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाची कुस्ती रोहित पटेल (इंदोर, मध्य प्रदेश) व पंजाब केसरी मनजितसिंग यांच्यात ठरली होती; परंतु ऐनवेळी रोहित पटेल न आल्याने त्याच्याऐवजी दिल्लीच्या चाँदरुप आखाडय़ाचा सोनूसिंग हा मैदानात उतरला. सोनू व मनजितसिंग दोघेही १२५ किलो वजनाचे उंचे, तगडे व तुल्यबळ होते. हिंदकेसरी मारुती माने यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. सलामी झडताच दोघा मल्लांनी एकमेकांची गर्दनखेच केली. सोनू सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र्यात होता. त्याने दुसऱ्या मिनिटात एकेरीपट काढून उलटी पुट्टी लावली. त्यातून मनजित निसटला खरा; मात्र पुन्हा सोनूने त्याच्यावर ताबा मिळविला. नंतर अतिशय चपळाईने कुस्ती करीत सोनूने स्वतच्या पोट व छातीचा पूल तयार करून मनजितला वर उचलून मागे फेकून दिले. ‘बॅक साल्थो’ नावाचा हा डाव त्याने दोनवेळा खेळला. अखेर डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच त्याने मनजितला सहाव्या मिनिटात एकचाकी डावावर खाली लोळविले. तेव्हा सर्वानी त्याचा जयजयकार केला. चांगली कुस्ती पाहिल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.
प्रथम क्रमांकाच्या दुसऱ्या कुस्तीत दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने दिल्लीच्या चंदगीराम आखाडय़ाचा महाबली सत्पाल यांचा पट्टा अरविंदकुमार यास अवघ्या आठव्या मिनिटात घुटना डावावर चारीमुंडय़ा चीत केले. अधिक ताकदीच्या चंद्रहारने सुरुवातीला अरविंदकुमारवर आकडी डाव टाकून वर्चस्व मिळविले. सहाव्या मिनिटास त्याने पुन्हा त्यास खाली घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून अरविंदकुमारने कशीबशी सुटका करून घेतली; परंतु नंतर काही क्षणांतच चंद्रहारने घुटना डाव टाकून त्याला अस्मान दाखविले. त्यास एक लाखाचे इनाम व अभिजित कदम यांच्या स्मरणार्थ ‘नारायण केसरी’ चांदीची गदा बहाल करण्यात आली.
७५ हजार इनाम व चांदीची गदा असलेली दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा अस्लम काझी याने दिल्लीच्या महाबली सत्पाल यांचा पठ्ठा रवींद्रकुमारबरोबर तब्बल ३८ मिनिटे झुंज देत अखेर विजय संपादन केला. शहीद अशोक कामटे, हेमंत करकरे व विजय साळसकर यांच्या स्मरणार्थ ७५ हजार इनाम व ‘हुतात्मा केसरी’ चांदीची गदा असलेली दुसरी कुस्ती कोल्हापूरच्याच गंगावेस तालमीच्या नितीन खुर्दने तब्बल ५५ मिनिटांनंतर कशीबशी जिंकली. या दोन्ही कुस्त्या अतिशय निरस व कंटाळवाण्या झाल्या. तत्पूर्वी तिसऱ्या क्रमांकाच्या ५१ हजार इनाम व चांदीच्या ढाली असलेल्या दोन कुस्त्या झाल्या. यात आटपाडीच्या रवींद्र गायकवाडने दिल्लीच्या चंदगीराम आखाडय़ाचा सुरेंद्र याच्यावर मात केली, तर आटपाडीचा अनिल कोळेकर व खवासपूरचा बापू मंडले यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. या मैदानावर एकूण २५० लहान-मोठय़ा कुस्त्या झाल्या. या वेळी मुलींच्याही कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. या संपूर्ण कुस्ती मैदानाचे धावते समालोचन शंकर पुजारी यांनी खुमासदार पद्धतीने करताना कुस्तीच्या इतिहासाचा पट अलगदपणे उलगडून दाखविला. कुरुंदवाडच्या राजू आवळे यांनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण हलगीवादनाने सर्व मल्लांना रोमांचित केले.