Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शाहूवाडीत फुललाय चहाचा मळा
शाहूवाडी, २३ फेब्रुवारी / वार्ताहर

 

गेल्या काहीच दिवसात आंबा घाटात फुललेल्या चहाच्या मळ्याचा स्वाद चाखायला मिळणार असून, बाळासाहेब टेकावडे यांनी आंब्याच्या फोंडय़ामाळावर ५० एकरात फुलवलेल्या टेकावडे टी मार्च-एप्रिल महिन्यात बाजारात येत असल्याची माहिती ऋषिराज टेकावडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.दरम्यान, येथेच मळ्याशेजारी सुमारे एक ते सव्वा कोटी रुपये खर्चुन चहाप्रक्रिया फॅक्टरीही उभी करण्यात आली असून सर्व मशिनरी बसवण्यात आल्या आहेत. येथे उत्पादित चहावर प्रक्रिया करून त्याचे टेस्टिंग चालू आहे. सर्वसाधारणपणे चहाची वरील तीन कोवळी पानेच प्रक्रियेसाठी वापरली जातात. या पानांचा चहाच दर्जेदार असतो. नंतरची जुन पाने वापरल्यानंतर हा दर्जा घसरतो. त्याचबरोबर पानांची तोडणी केल्यानंतर अवघ्या सात तासांच्या आत त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असते. यामुळे येथील चहाच्या मळ्यातील पानांची तोडणी करून ती एकतरी कर्नाटकात न्यावी लागत पण ती वेळेत पोहोचत नसल्याने ती तोडून तशीच टाकली जाई. चहाच्या पिकास गवे अथवा अन्य कोणतेही जनावर साधे तोंडदेखील लावत नाहीत. यामुळे याला कुंपण घालावे लागत नाही. त्याचबरोबर पाणी आणि खताची मात्राही मर्यादित लागते. हा आंब्यातला चहा दर्जेदार आणि लोकांच्या जिभेचे चोचले पुरवणारा चविष्ट असेल असा विश्वास ऋषीराज टेकावडे यांनी बोलून दाखवला. त्याचबरोबर जसा कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्ता, कोल्हापूरची लवंगी मिरची, कोल्हापुरी गूळ ही कोल्हापूरची ओळख बनली तसाच हा ‘आंब्याचा चहा’ कोल्हापूरची ओळख बनेल असाही ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.