Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भीमा कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहिते यांना उद्या कार्यमुक्तीचा आदेश
सोलापूर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. एस. मोहिते यांना येत्या २५ फेब्रुवारी रोजी कार्यमुक्त करण्याचा आदेश जिल्हा सहकार न्यायाधीश सोनाली पोरे यांनी दिला.कार्यकारी संचालक मोहिते हे २००० साली नियत वयोमानामुळे निवृत्त झाल्यानंतर त्यांना कारखान्याने २००३ पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यास साखर आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र २००३ नंतर साखर आयुक्त अथवा शासनाची मान्यता नसताना सहा वर्षे मोहिते हे कारखान्यात नियमबाह्य़ काम करीत होते. म्हणून कारखान्याचे एक सभासद विनोद विष्णुपंत महाडिक (रा. पंढरपूर) यांनी जिल्हा सहकार न्यायालयात दावा दाखल केला. श्री. मोहिते यांनी कार्यकारी संचालक म्हणून काम करू नये. त्यांनी मान्यता नसताना घेतलेले आर्थिक फायदे परत करावेत, अशी त्यात मागणी करण्यात आली, तसेच मोहिते हे सभांना वारंवार गैरहजर राहतात. वयोमानामुळे व आजारपणामुळे त्यांना तत्काळ सेवानिवृत्त करण्याचा आदेश साखर आयुक्तांनी देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांचा आयकर बेकायदेशीररीत्या कारखान्याने भरला. बेकायदेशीररीत्या लाखोंची बिले उचलली. त्यामुळे कारखान्याचे सुमारे २५ लाखांचे जादा नुकसान झाले. याबाबत न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर कारखान्याच्या संचालक मंडळाने मोहिते यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव केला. सदर ठरावानंतर सभासद महाडिक यांनी तातडीने कार्यमुक्त करण्याची मागणी केली. त्यानुसार कारखान्याने येत्या २५ फेब्रुवारी रोजी मोहिते यांना कार्यमुक्त करीत असल्याचा लेखी अर्ज दिला. तो अर्ज न्यायाधीशांनी मंजूर केला. यात महाडिक यांच्या वतीने अ‍ॅड. विनायक नागणे, अ‍ॅड. वैभव देशमुख, तर कारखान्यातर्फे अ‍ॅड. विजय मराठे यांनी काम पाहिले.