Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने उभारणार एक कोटीचा मॉल
सांगली, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

महिला आíथक विकास महामंडळाच्यावतीने सांगली येथे एक कोटी रुपये खर्चुन मॉल उभारण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मदन पाटील यांनी दिली.
पुणे येथील श्रीमती मातोश्री बयाबाई कदम न्यास, सांगली जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने आयोजित महिला बचतगट मेळावा, महिला बचतगटाने उत्पादित केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री अशा ‘कृष्णाई २००९’ या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मदन पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती मातोश्री बयाबाई कदम न्यासच्या कार्यकारी विश्वस्त श्रीमती विजयमाला पतंगराव कदम या उपस्थित होत्या.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या या मॉलमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मदन पाटील यांनी सांगितले. राज्यातील महिला बचतगटांना चार टक्के व्याजदराने कर्ज देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. नजीकच्या काळात महिला बचतगटांचे विभागवार प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्याचा मानस आहे. महिला बचतगटामुळे महिला स्वत:च्या पायावर उभी राहिली असून तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या विक्रीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कृष्णाई महोत्सवाने महिला बचतगटांना एक नवे दालन उपलब्ध करुन दिले असल्याचे सांगून ते म्हणाले की, यापुढील काळात असे उपक्रम आयोजित करुन महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्यात येईल. या महोत्सवात महिला बचतगटामार्फत एक कोटी रूपयांवर उलाढाल झाली असल्याबाबत मदन पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या महोत्सवात उत्कृष्ठ ठरलेल्या महिला बचतगटांना पारितोषिकेही देण्यात आली.
याप्रसंगी सोनहिरा सहकार साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांचेही भाषण झाले. तसेच श्रीमती राधा भऊस्वार, संगीता देवरुके, वंदना बगले, नीलम गायकवाड, शारदा पाटील, रंजना कुलकर्णी, अंजली पाठक, मीना कल्याणकर, रंजनी सावंत व अनिता कोरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर मालती मेस्त्री यांनी उखाणा सादर केला. प्रारंभी श्रीमती मातोश्री बयाबाई कदम न्यासच्या कार्यकारी विश्वस्त श्रीमती विजयमाला कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
या महोत्सवात महिला उद्योग व्यवसायी बचतगट (पुणे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून अबोली महिला बचतगट (सांगली) द्वितीय, तर बेडग येथील शिवपार्वती महिला बचतगटाने तृतीय क्रमांक मिळविला. स्वामी विवेकानंद महिला बचतगट (अकोला), गृहलक्ष्मी महिला बचतगट (मालगाव), श्रमांजी महिला बचतगट (कवठेपिरान), महात्मा फुले कृषि विद्यापीठ कृषी विज्ञान कंेद्र महिला बचतगट (धुळे) व दर्शना महिला बचतगट (सांगली) यांना उत्तेजनार्थ म्हणून पारितोषिके देण्यात आली. यावेळी पलूस पंचायत समितीच्या सभापती श्रीमती पुष्पलता उगळे, आनंदराव मोहिते, कडेगाव पंचायत समितीच्या सदस्या वैशाली कदम, मालन मोहिते, प्रा. सिकंदर जमादार, के. डी. जाधव व मुन्ना कुरणे यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी व बचतगटातील महिला उपस्थित होत्या.