Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

संगीत नाटकांना आधुनिक स्वरूप देण्याची गरज - स्मिता तळवलकर
सोलापूर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

लेखकांनी चांगली संगीत नाटके लिहून त्या नाटकांना आधुनिकतेचे स्वरूप दिल्यास या नाटकांकडे पुन्हा प्रेक्षकवर्ग वळेल, असा विश्वास प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या व अभिनेत्री तळवलकर यांनी व्यक्त केले.
येथे एका कार्यक्रमानिमित्त त्या आल्या असताना सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात त्या बोलत होत्या. मराठी चित्रपटसृष्टीत निळू फुले, श्रीराम लागू यांची उणीव भरून काढण्यासारखे नवनवीन कलावंत स्वत:च्या पायावर उभे राहात असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठीचा प्रेक्षक मराठीवर प्रेम करीत नाही, अशी खंत व्यक्त करून श्रीमती तळवलकर म्हणाल्या की, मराठी प्रेक्षकांना अन्य भाषेतील चित्रपटांकडे अधिक ओढा दिसून येतो. आपल्या मुलांनाही मराठी शाळेत न घालता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो. कलाकार म्हणून आम्ही मराठीतील दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. मराठी माणूस आळशी असून तो घरात बसून दूरचित्रवाणीवर चित्रपट पाहातो. थिएटपर्यंत येत नसल्याची टिप्पणीही त्यांनी केली. मराठी चित्रपटांसाठी शासनाने अनुदानात वाढ करण्याऐवजी सदरचे अनुदान वेळच्या वेळी दिले तरी खूप झाले,असे त्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.
विविध वाहिन्यांतून काम करणारे व चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांनी, वाहिन्या अथवा चित्रपटात कलाकारांना पैसा दुय्यम बाब असून त्याचे कथानक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मराठी कलाकारांना वाहिन्या व चित्रपटांमुळे चांगले दिवस आले असताना त्यांचे नाटकांकडे दुर्लक्ष होत आहे का, हे पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पूर्वीपेक्षा आताचे कलाकार वाहिन्यांमुळे जलदगतीने लोकप्रिय होत आहेत. ही लोकप्रियता टिकविण्याचे काम या कलाकारांना चांगल्या अभिनयातून करावे लागणार आहे, असेही भावे यांनी सांगितले. या वेळी अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विठ्ठल बडगंची हे उपस्थित होते.