Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भुईंजमध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
पै. कर्तारसिंग, चंद्रहार पाटील यांची उपस्थिती
सातारा, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील आराध्य दैवत श्री माणकाईदेवी यात्रेनिमित्त कारखाना व कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व २७ फेब्रुवारीला कार्यस्थळावर राज्यस्तरीय मॅटवरील ‘किसन वीर केसरी’ भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष आमदार मदन भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. अखिल भारतीय कुस्ती परिषदेचे सरचिटणीस व पंजाबचे पोलीस उपमहानिरीक्षक पै. कर्तारसिंग आणि डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील या कुस्ती स्पर्धाना उपस्थित राहणार असून, कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांसाठी विविध वजन गटातील मानधारक कुस्त्या होणार आहेत.
प्रसिद्धिपत्रकात अधिक माहिती देताना आ. भोसले यांनी म्हटले आहे की, मर्दुमकी आणि पुरुषार्थाचे प्रतीक असलेल्या कुस्ती कलेची जोपासना करण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून जंगी कुस्ती आखाडय़ाचे आयोजन कार्यस्थळावर करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धा ‘किसन वीर केसरी’ या नावाने खेळविल्या जात असून यंदा मॅटवर या स्पर्धा होत आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन प. पू. नारायणअण्णा महाराज यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पै. कर्तारसिंग यांची उपस्थिती प्रेरणादायी ठरणार असून, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांचा ‘किसन वीर’ परिवारातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंधळकर, मारुती माने, रुस्तूम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार, दीनानाथ सिंह, योगेश दोडके, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते बाळासाहेब लांडगे, दिनकरराव सूर्यवंशी, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, शिवाजीराव पाचपुते, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते रामचंद्र सारंग, उपमहाराष्ट्र केसरी विष्णू भंडारे, दिलीप पवार, महान महाराष्ट्र केसरी माणिक पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते वसंत पाटील, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तम पाटील, रावसाहेब मगर, साहेबराव जाधव, सातारा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, सांगोला तालीम संघाचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी मस्के, आनंदा गायकवाड आदी देश व राज्य पातळीवरील नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत.
‘किसन वीर केसरी’ प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ७५०००/- रुपयांचे इनाम व चांदीची गदा देण्यात येणार आहे. द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्या मल्लास अनुक्रे ४१,०००/- २१,०००/- व ११,०००/- रुपयांचे इनाम देण्यात येणार आहे.