Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

उदयनराजेंच्या जनआंदोलनास पाठिंबा- यशवंतभाऊ भोसले
सातारा, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भूमाता दिंडीद्वारे जनतेच्या विकासाच्या प्रश्नाला वाचा फोडली असून, त्यांच्या जनआंदोलनास आपल्या विकास परिषदेचा संपूर्ण पाठिंबा जाहीर करीत असल्याचे जिल्हा विकास परिषदेचे अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उदयनराजेंच्या पायी मोर्चावर लाठीहल्ला हा दुर्दैवी प्रकार असून, नेतृत्व चिरडून टाकण्याचे गणित यापाठीमागे असावे. मात्र उदयनराजे एकटे नाहीत. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार आपल्या विकास परिषदेने केला असल्याचे यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले. गेले सव्वा वर्ष आपण कोरेगाव तालुका विकास परिषदेच्या माध्यमातून विकासाच्या प्रश्नावर लढत आहोत. या कार्याचा व संस्थेचा विस्तार जिल्हा स्तरावर करण्यात आला असून, जिल्हा विकास परिषद असे संस्थेचे नामांतर करण्यात आले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
राजकीय पक्षाच्या नेत्यांना जाब विचारण्याची वेळ आली असून, ज्यांनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले, शिक्षण-उद्योगापासून वंचित ठेवले त्यांना आता हद्दपार केले पाहिजे. लोकसभेत ज्यांना बोलता आले नाही तरी चालेल, अशा लायकी व कुवत नसलेल्यांची निवड करण्यात आल्यानेच ही परिस्थिती जनतेला भोगावी लागत आहे. जनतेचा विकास करणारे नेते प्रस्थापितांना नको आहेत. डोकी मोजण्यासाठीच केवळ खासदार त्यांना हवे आहेत. सातारा जिल्ह्य़ाचे पाणी सांगलीच्या नेत्यांनी पळवले, तर कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या नावावर चार हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देऊन बारामती-पुणेच्या नेत्यांनी जिल्ह्य़ाचे पाणी पळवण्याचा घाट घातला आहे.
वसना वांजना, जिहे कठापूर, उरमोडी, टेंभू धरण प्रकल्प अर्धवट स्थितीत पडले आहेत. केवळ चुना लावण्याचे काम आजपर्यंत नेत्यांनी केले आहे. त्याविरुद्ध आवाज उठवण्याचे काम आपण करणार आहे. ताकदवान नेत्यांनी बारामती, चाकण, पनवेलचा विकास केला.
जिल्हा बँकेत पक्षपाती राजकारण चालू आहे. चार टक्के व्याजाची महिला बचतगटाकरिता असलेली योजना मृगजळ झाली आहे. निवडणुकीचा फार्स व कुणाला तरी मोठे करण्यासाठी बचतगट महिला मेळावे शासनाच्या मदतीने घेऊन भुरळ पाडण्याचे काम व्यक्त होत आहे. शासकीय अधिकारी त्यासाठी राजकीय नेत्यांचे घरगडी असल्यासारखे वागत आहेत.
जिल्ह्य़ात जमावबंदीचा आदेश लादून जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्याची मुस्कटदाबी सुरू आहे. हा लोकशाहीवरचा घाला आहे, असे सांगून सध्या उदयनराजेंच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर करीत आहे. त्यांच्या उमेदवारीला समर्थन देण्याबाबत संघटनेत विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.