Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

विश्वबंधुत्वाची संकल्पना महावीरांच्या विचारात - उपाध्याय
इचलकरंजी, २३ फेब्रुवारी / वार्ताहर

 

भगवान महावीरांच्या अंतरीच्या धाग्यांनी अिहसा, समानता यांच्या विचाराचे धागे जुळले व त्यापासून बनलेले विचारांचे वस्त्र जगभर पसरले. विश्वबंधुत्वाची संकल्पना आपापसातील स्पर्धेतून येणार नाही, तर ती महावीरांच्या अिहसा विचारातून निर्माण होईल, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील लालबहाद्दूर राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू वाचस्पती उपाध्याय यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनामार्फत आचार्य देशभक्त स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन आज घोरपडे नाटय़गृह येथे करण्यात आले होते. या वेळी विश्वबंधुत्वामध्ये भगवान महावीर व त्यांच्या अहिंसा सिद्धान्ताची उपयोगिता या विषयावर उपाध्याय बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे हे होते.
उपाध्याय आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात म्हणाले, संस्कृत वाचले तर संस्कृती वाचेल तसेच अपभ्रंश, पाली या भाषाही वाचू शकतील. भगवान महावीरांनी अिहसा विचाराची देणगी जगाला दिली आहे. त्याचा आजच्या काळात वापर करणे अनिवार्य बनले आहे. मुखी गोडवा व डोक्यात शांतता ठेवली तर सर्व काही साध्य करता येणे शक्य आहे. पण याचा विसर पडत चालला आहे. महावीरांनी दिलेले विचार आत्मसात करून आत्मविकास साधला पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. वि. ल. धारूरकर यांचेही जैन धर्माचे भारतीय संस्कृतीस योगदान या विषयावर व्याख्यान झाले. विविध संदर्भ देऊन ओघवत्या भाषेत त्यांनी जैन तत्त्वज्ञान मांडले.
िहसाचार, भ्रष्टाचार, विषमता, शोषण या समस्यांच्या दुष्टचक्रात जग सापडले आहे. त्यावर जैन तत्त्वज्ञान मार्गदर्शक ठरणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्राने अभ्यासाच्या जोडीला वेबसाईटद्वारे लोकसाहित्य असलेले जैनसाहित्य लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन डॉ. धारूरकर यांनी या वेळी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. माणिकराव साळुंखे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने एम.ए.ला जैन सोशालॉजी अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा करून हे अध्यासन केंद्र लोकसहभागाद्वारे वेगळय़ा पद्धतीने कार्यरत ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला. अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. पद्मजा पाटील यांनी स्वागत केले.डॉ. जयकुमार उपाध्याय, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, डॉ. जे. एफ.पाटील यांनी या वेळी भाषणे केली. दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन डी. ए. पाटील यांनी आभार मानले.