Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

महिलांनी उद्योगात लक्ष घालून स्वावलंबी बनावे - सौदागर
सांगली, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

सध्याच्या वेगवान युगात आता स्वतची व कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी महिलांनी उद्योगी बनून स्वावलंबनाचा महामंत्र जोपासण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील हॉटेल व्यावसायिका व सामाजिक कार्यकर्त्यां श्रीमती स्वाती सौदागर यांनी केले.
येथील ‘आम्ही उद्योजिका’ नियतकालिक व पुणे येथील चैतन्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशनगर येथील रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या सभागृहात आयोजित उद्योजकीय कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती स्वाती सौदागर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैतन्य केंद्राचे संचालक डॉ. दिलीप कुलकर्णी होते.
महिलांनी उद्योगी बनून स्वावलंबनाचा महामंत्र जोपासल्यास ती स्वयंपूर्ण होऊन तिला प्रतिष्ठा प्राप्त होते, असे सांगून श्रीमती स्वाती सौदागर म्हणाल्या की, दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतचा उद्योग अथवा व्यवसाय सुरू करणे हिताचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेकविध योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी आधुनिक टेलिव्हिजन सेंटर, काजू प्रक्रिया, द्रोण पत्रावळी, गोमुत्र, माती व पाणी परीक्षण केंद्र, दागिने तयार करणे, केळीच्या खोडापासून कागद व कापड निर्मिती उद्योग, स्ट्रेस मॅनेजमेंट अशा विविध उद्योगांची माहिती देऊन त्यासाठी लागणारा कच्चा माल, मशिनरी व बाजारपेठ आदी विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बिझनेस एक्स्प्रेसचे संपादक ए. आय. मुजावर यांच्याहस्ते इस्लामपूर येथील उद्योजिका श्रीमती दीपाली शहा यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही उद्योजिकाच्या कार्यकारी संपादिका श्रीमती सुवर्णा बेळगी यांनी स्वागत, तर चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. श्रीमती मंगल भुसारी यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यशाळेत सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर आदी जिल्ह्य़ातील महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्रीमती सुनीता पंडित, महेश मुळे, नितीन चौगुले व हिना सनदी आदींनी विशेष परिश्रम घेतले. श्रीमती सुनीता शेरीकर यांनी आभार मानले.