Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शिवजन्मतिथीचा वाद तज्ज्ञांनी निकाली काढावा - म्हेत्रे
अक्कलकोट, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

 

भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा असलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद इतिहासतज्ज्ञांनी समन्वयातून कायमस्वरुपी निकाली काढावा, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी केला.
सोलापूर विद्यापीठ आणि महर्षी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इतिहास परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र शेंडगे होते.
गौरवशाली इतिहासाची परंपरा असलेल्या अक्कलकोट संस्थानमध्ये इतिहास परिषद आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त करून म्हेत्रे म्हणाले की, देशाचा खरा वैभवशाली इतिहास जनतेसमोर आला पाहिजे. सर्वप्रथम शिवजयंती संदर्भात संभ्रम दूर झाला पाहिजे. जगाने शिवरायांना गौरविले असताना त्यांच्या जन्मतिथीवरून वाद व्हावे हे मोठे दुर्दैव आहे.
प्रारंभी पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी स्वागत केले. बापूजी निंबाळकर यांनी इतिहास परिषद आयोजनाची भूमिका विशद केली. या वेळी झालेल्या चर्चासत्रात अनेक इतिहासतज्ज्ञांनी अभ्यासपूर्ण मते प्रतिपादन केली. या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष प्रा. भीमराव साठे, डॉ. नाझिया मुजावर, प्रा. लता अकलूजकर, डॉ. नभा काळे, प्राचार्य जी. एस. हारकूड, प्राचार्य एम. ए. शेख, प्रा. ओमप्रकाश तळेकर, मल्लीनाथ कल्याणशेट्टी, प्रा. एम. जी. देशमुख, प्रा. विलास निंबाळकर,सौ. सुमती फडतरे, सुरेश फडतरे, सिद्धेश्वर कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश सुलखे यांनी केले, तर डॉ. रवी जाधव यांनी आभार मानले. इतिहास परिषदेनिमित्त आयोजित ऐतिहासिक वस्तुप्रदर्शन आणि चर्चासत्राला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. इतिहास परिषदेचे यशस्वी संयोजन खंडेराव घाटगे यांनी केले.