Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सोलापुरात महाशिवरात्र उत्साहात साजरी
सोलापूर, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

सोलापूर शहर आणि जिल्ह्य़ात महाशिवरात्र अपूर्व उत्साहात, विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
शहरात उत्तर कसब्यातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठय़ा रांगा लागल्या होत्या. सकाळी इष्टलिंग पूजा,सायंकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर, स्वन्नलगी मंदिर व रेवणसिद्धेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी करण्यात आला. सिद्धेश्वर पेठेतील श्री मरकडेय मंदिरात श्री सत्य साई सेवा मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. सिंधी समाजाच्या श्री गुरुनानकनगर येथील महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने उत्तर कसब्यातील होटगी मठात आणि अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी मंदिरात होटगी बृहन्मठाध्यक्ष योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली रुद्राभिषेक, इष्टलिंग पूजा व सायंकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. उत्तर कसब्यातील होटगी मठातून जगद्गुरू पंडिताराध्य व विश्वाराध्य यांच्या मूर्तीची मिरवणूक अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी मंदिरापर्यंत काढण्यात आली. सोलापूर शहर, कुमठे, बाळे, होटगी, मार्डी, शेळगी या गावातील महादेवाच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्र साजरी करण्यात आली.
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री सिद्धेश्वराची यात्रा भरली होती. सिद्धेश्वर मंदिरात तहसीलदार डी. आर. माळी यांच्या हस्ते पूर्वापार परंपरेनुसार शासकीय महापूजा करण्यात आली. माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या मंदिराला क्रूरकर्मा औरंगजेबाने भेट दिली होती.
अक्कलकोटमध्ये गर्दी
अक्कलकोट - प्राचीन हेमाडपंथी मंदिरातील स्वयंभू बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भक्तजनांनी मोठी गर्दी केली होती. वटवृक्ष मंदिरात वेदमंत्रघोषात शिवपूजन करण्यात आले. दत्त अवतारी श्री स्वामी समर्थदेखील सदैव शिवनामाचा जप करीत. यंदा महाशिवरात्र सोमवारी आल्याने शिवदर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अक्कलकोटनगरी प्राचीन काळी, प्रज्ञापुरी नावाने ओळखली जात असे. प्राचीन अक्कलकोट नगरीत एक तपस्वी शिवयोगी महाराज होऊन गेले. त्यांच्या तपोभूमीतून तीन मोठे आणि नऊ लहान असे बारा स्वयंभू शिवलिंग प्रकटले, अशी अख्यायिका असल्याचे मानले जाते. या हेमाडपंथी शिवमंदिरात महाशिवरात्र मोठय़ा भक्तीभावाने साजरी झाली.
पहाटे अरुण शिवयोगी यांनी विधिवत शिवपूजन केले. येथे दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली. वटवृक्ष मंदिरासह यज्ञभूमी असलेल्या शिवपुरीत शिवपूजन करण्यात आले.