Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘सहकार महर्षी’चा प्रतिटन १२०१ रुपये दर
माळशिरस, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

 

अकलूजच्या सहकार महर्षी साखर कारखान्याने गेल्या हंगामात गळीतास आलेल्या उसाला प्रतिटन १२०१ रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला असून नीरा खोऱ्यात हा दर उच्चांकी असल्याचा दावा कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी केला आहे.
कारखान्याच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज सुरू असून गेल्या हंगामात १२ लाख ६६ हजार ५५६ मे. टन ऊस गाळप करून १५ लाख ३२०० साखरपोत्यांचे उत्पादन केले होते.
या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत ११५० रुपयांची उचल दिली असून उर्वरित प्रतिटन ५१ रुपयांची रक्कम साखर आयुक्त यांचा आदेश मिळताच मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ११००/- रुपये उचल दिली असून उचलीचा १०० रुपयांचा दुसरा हप्ता कारखाना बंद होताना दिला जाणार आहे. बैलपोळ्याच्या सणाला तिसरा हप्ता देऊन दिवाळीत अंतिम दर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.
या हंगामातही कारखान्याने आतापर्यंत ७ लाख ४० हजार ४९३ मे. टन उसाचे गाळप करून ८ लाख ५६ हजार १०० पोती साखरेचे उतदन केले असून या हंगामात साडेदहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नानासाहेब मगर,कार्यकारी संचालक दिनकर खापे व विविध खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.