Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

प्रकाश ऑफसेटवरील कर्जप्रकरणी उद्या निर्णय शक्य
इचलकरंजी, २३ फेब्रुवारी / वार्ताहर

 

थकीत कर्जवसुलीसाठी महिन्याभरापूर्वी येथील इचलकंरजी अर्बन बँकेने जप्तीची कारवाई करूनही कर्ज परतफेडीबाबत कोणतीही प्रक्रिया न करता प्रकाश ऑफसेटच्या खंजिरे बंधूंनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सदरची कारवाई तात्पुरती थांबली असून याबाबत २५ फेब्रुवारीला निर्णय होण्याची शक्यता आहे. याकडे सहकार वर्तुळातील मान्यवरांचे तसेच सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
खंजिरे बंधूंच्या प्रकाश ऑफसेटसह विविध १७ खात्यावरील सुमारे ५ कोटी २० लाख रूपये थकीत कर्ज वसुलीसाठी दि इचलकरंजी अर्बन बँकेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २३ जानेवारी २००९ रोजी जप्ती कारवाई करून प्रकाश ऑफसेटला सील ठोकले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनसुध्दा खंजिरेबंधूंनी कारवाई विरोधात अपिलेट कोर्ट, पुणे यांच्याकडे धाव घेतली. त्यामध्येही प्रकाश ऑफसेटसह १७ खात्यांना प्रत्येकी ५०० रूपये दंड सुनावला होता. त्यानंतरही कर्ज परतफेडीबाबत कोणतीही प्रक्रिया अथवा बोलणी न करता खंजिरे बंधूंनी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा धाव घेऊन पैसे भरण्याबाबत कोणतेही भाष्य न करता ऑफसेट बंद असल्यामुळे आमचे दररोज लाखो रूपयांचे नुकसान होत आहे, तेंव्हा आम्हाला ऑफ सेटचा ताबा मिळावा अशी मागणी केली. यावर न्यायालयात ६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, १८ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. त्यामध्ये म्हणणे मांडण्यास खंजिरे बंधूंच्या वकिलांनी असमर्थता दाखवली, तर बँकेने आपले म्हणणे मांडताना एकूण थकबाकीपोटी ७५ टक्के रक्कम भरावी त्यानंतर चर्चेला यावे असे म्हंटले आहे. याबाबत उच्च न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली असून त्यावेळीच निकाल लागण्याची शक्यता असून शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.