Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

‘एक्झिट.’तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा; ५२ व्यक्तिरेखा आणि तब्बल तीन हजारांहून अधिक प्रयोग. असे ‘वऱ्हाड’ घेऊन डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी विश्वविक्रमी ‘गीनिज बुक’मध्ये दोन वेळा ‘बूंग’ केले. या मनस्वी कलावंताने सोमवारी मध्यरात्री जगाच्या रंगभूमीचा निरोप घेतला.!

एका सतत प्रयत्नशील राहणाऱ्या माणसाचे निधन
अजित दळवी

आधी जयंत फडके गेला. मग कुमार देशमुख. नंतर आलोक चौधरी आणि आता डॉ. लक्ष्मण देशपांडे. मराठवाडय़ाच्या रंगभूमीने गेल्या दोन-चार वर्षांत बिनीचे शिलेदार गमावले आहेत. लक्ष्मण देशपांडे यांच्या मृत्यूनं तर धक्काच बसला. त्यांच्यासारख्या उत्साहानं सळसळणाऱ्या माणसाच्या देहावर फुलं अर्पण करण्याचा प्रसंग इतक्या लवकर येईल, असं कधी वाटलंच नव्हतं. गेल्या एक-दीड वर्षांत ते थकल्यासारखे दिसत होते.

युतीबाबतचा निर्णय गुरुवारी - रामदास कदम
‘भाजपशी युती नको ही आमच्या पदाधिकाऱ्यांचीच इच्छा!’

औरंगाबाद, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाशी युती नकोच ही शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचीच इच्छा असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आज सांगितले. याबाबतचा निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच घेणार असल्याचे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती होण्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही.श्री. कदम आज कन्नड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तालुक्यातील विविध विकास कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला.

सायंकाळची शोभा
घराच्या गच्चीवर जाऊन सायंकाळची शोभा अनुभवणं हा लहानपणीचा आमचा आवडता उद्योग होता. घराच्या गच्चीचा सर्वात उंच भाग जिथे असेल त्या जिन्याच्या टोकावर सगळ्या मैत्रिणींनी एकत्र बसून गप्पा मारणं, हा अनुभव काही औरच होता. त्या उंच टोकावरून भोवतालची सगळी घरं, झाडं आणि परिसर दिसायचा. ‘विहंगम दृश्य’ कशाला म्हणतात ते नंतर चित्रकलेच्या अभ्यासात कळलं. पण हे असं विहंगम दृश्य निरखीत बसणे आणि त्या निसर्गचित्राचा एक भाग होऊन जाणे, हा छंद होता.
सूर्यास्ताच्या वेळी ‘कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा’ या ओळींचा अक्षरश: प्रत्यय यायचा.

‘अपरिमित हानी’
औरंगाबाद, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘वऱ्हाड’कार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या निधनामुळे मराठवाडय़ातील व्यावसायिक रंगभूमीची आणि नाटय़सृष्टीची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी आज त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पं. नाथ नेरळकर- मी काय बोलू? लक्ष्मण माझा जवळचा सहकारी. माझ्यापेक्षाही लहान. त्याच्या खांद्यावर आम्ही जायला हवे होते; पण आमच्या आधी तो गेला. प्रा. विजय दिवाण - मराठवाडय़ाच्या मातीमध्ये जन्मलेला आणि मातीशी इमान राखणारा एक प्रतिभावान कलावंत आज आपल्यातून गेला.

‘प्रा. देशपांडे यांच्या निधनाने नाटय़क्षेत्राचे नुकसान’
लातूर, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या निधनामुळे नाटय़क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान झाले असल्याची भावना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली. श्रद्धांजली अर्पण करताना श्री. देशमुख म्हणाले, ‘‘डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाटय़ विभाग निर्माण करून मराठवाडय़ातील नाटय़कलावंतांना मुंबई, पुण्यातील रंगभूमीवर पाठविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनामुळे नाटय़चळवळीचे नुकसान झाले.’’ नाटय़ क्षेत्रातील दिग्गज हरपला प्रा. देशपांडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या नाटय़क्षेत्रातील एक दिग्गज कलावंत हरपला असल्याचे सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले. राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी घेतलेल्या बैठकीत त्यांनी अनेक सूचना केल्या होत्या. त्या अंमलात आणून त्यांच्या मार्गावर चालण्याचे काम राज्य सरकार करणार असल्याचे ते म्हणाले.

दोन गटांतील मारामारीमध्ये २२ जखमी
बीड, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

गावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तक्रार केल्यावरून दोन गटांमध्ये सशस्त्र मारामारी झाली. यात २२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. केज तालुक्यातील टाकळी येथे काल दुपारी हा प्रकार झाला. भारत निर्माण योजनेत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेची तक्रार केल्यावरून बंडू हरिभाऊ घुले व संपत रामराव घुले यांच्यात बाचाबाची झाली. तोंडी वादाचे पर्यवसान दोन्ही गटांत तुंबळ मारामारीत झाले. दोन्ही गटांतील लोकांनी काठय़ा, कुऱ्हाडी, टांबी व लोखंडी गज, सळई, तलवार अशा शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढविला. तब्बल दोन तासांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या या परस्परविरोधी हल्ल्यात तिघांच्या डोक्यात जोराचे घाव बसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अन्य जखमींमध्ये अनेकांचे हाय, पाय मोडले असून डोके फुटले. मारामारीच्या ठिकाणी बाळासाहेब घुले यांनी गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्याची तक्रार करण्यात आली आहे. एक गोळी मदन हरिभाऊ घुले यांच्या डोक्याला चाटून गेली असल्याचे जखमींनी पोलिसांना सांगितले.

‘ओबीसींच्या आरक्षणावरील अतिक्रमण हाणून पाडा’
परभणी, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण होत असल्याचा आरोप करीत हे अतिक्रमण हाणून पाडण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन महाराष्ट्र ओबीसी समन्वय समितीने करण्यात आले. ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा आज येथे दाखल झाली. त्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमोर बोलताना समन्वय समितीचे हनुमंत उपरे म्हणाले, आज राज्यात ओबीसींच्या आरक्षणाचे ६३ हजार राजकीय लाभधारक असूनही या प्रश्नावर कोणीच रस्त्यावर येत नाही. मागासवर्गीयांच्या हक्कावर हे अतिक्रमण होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी गप्प आहेत. १ मार्चपूर्वी पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर आले नाहीत तर त्यांना जाब विचारला जाईल. अहमदनगर येथे या एक अधिवेशन भरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. श्री. उपरे यांच्यासह लियाकत अन्सारी, गौतम ब्रह्मराक्षे, पत्रकार चंद्रकांत डहाळे, सुभाष पांचाळ उपस्थित होते.

मरडसगाव येथे विवाहितेचा खून
गंगाखेड, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील मरडसगाव येथील कोमल भारत चव्हाण (वय २०) हिचा काल रात्री खून झाला. काही अज्ञात व्यक्तींनी अत्याचार करीत आपल्या पत्नीचा खून केल्याचे तिच्या पतीचे म्हणणे आहे. असे असले तरी पैशाच्या छळातून खुद्द पतीनेच खून केल्याचा संशय कोमलच्या माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे.
पिंपळदरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. एस. यलकेवाड यांनी अंबाजोगाई दवाखान्यातील वैद्यकीय चाचणीचा आधार घेत गुन्हा नोंदविण्याचे ठरविल्याने उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
मरडसगाव बसस्थानकाशेजारी राहणाऱ्या कोमलचा काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास खून झाला. पती भारतने तातडीने गंगाखेड पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्याने सांगितले की, काही व्यक्ती आपल्या घरात खिडकीतून घुसले. पत्नीवर अत्याचार करून त्यांनी तिचा खून केला. आपण भीतीपोटी पळून आलो. मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक यलकेवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार कोमलच्या माहेरच्या नातेवाइकांनी पती भरत याच्यावरच संशय व्यक्त केला आहे. भरत वारंवार सासरकडून आर्थिक मदतीसाठी पत्नीस छळत असे, असे त्यांचे म्हणणे आहे.

गंगाखेडच्या नागरिकांनी अनुभवली सांस्कृतिक मेजवानी
गंगाखेड, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

एकाहून एक वरचढ लावणी, पारंपरिक भारुडाच्या कथा व हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांच्या विनोदाच्या चुटकुल्यात पोट धरून हसणाऱ्या रसिक प्रेक्षकांना सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने काल सुटीच्या दिवशी मोठी सांस्कृतिक मेजवानी अनुभवायास मिळाली. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीसंत जनाबाई महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात रविवारी सायंकाळी रसिक प्रेक्षकांना पर्वणीच ठरली! रेश्मा-वर्षां परितेकर यांच्या दिलखेचक लावण्यांनी रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवीत मने जिंकली. त्यानंतर भाऊरत्न निरंजन भाकरे या सिल्लोडच्या संचाने पारंपरिक चालीरितीवर तसेच प्रबोधनात्मक भारुडे पेश करीत महोत्सवात तरेलपणा आणला. हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी तर अक्षरश: प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत विनोदांचे विविध चुटकुले सादर करीत मनोरंजन केले. रविवार सुटीचा दिवस असल्याने स्त्री-पुरुष व बालकांनी महोत्सवस्थळी तोबा गर्दी केली होती.

परभणीतील मंदिरांत भाविकांची गर्दी
परभणी, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

महाशिवरात्रीनिमित्त परभणी शहरातील बेलेश्वर मंदिर, पारदेश्वर मंदिर व उघडा महादेव मंदिर या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आज महाशिवरात्र असल्यामुळे शहरातील महादेव मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण होते. बेलेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. भाविकांच्या सोयीसाठी विविध संस्थांनी पिण्याच्या पाण्याची व फराळाची सोय केली होती. मंदिर परिसरात बेलफूल व पूजेच्या साहित्याची दुकाने थाटलेली होती. पारदेश्वर मंदिरातून भक्तगणांनी रांगा लावून दर्शन घेतले.

डोंगरशेळकी येथे भाविकांची गर्दी
उदगीर/वार्ताहर -
‘मराठवाडय़ाची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील डोंगरशेळकी येथील धोंडूतात्या महाराज मंदिरात आज हजारो भाविकांनी दर्शन घेतले. डोंगरशेळकी येथे दर एकादशीला कीर्तनाचा कार्यक्रम असतो. आज सोमवारची महाशिवरात्री असल्याने मोठय़ा प्रमाणात डोंगरशेळकी येथे गर्दी झाली. भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

परळी पालिकेतर्फे भाविकांना खिचडीवाटप
परळी वैजनाथ, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद स्वरूपात खिचडीवाटप करण्याचा नगरपालिकेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय मुंडे यांनी आज केले. यात्रेत उद्या (मंगळवारी) कुस्त्यांची दंगल, अश्व स्पर्धा व अश्व नृत्यस्पर्धा होणार आहेत. नगरपालिकेच्या इमारतीजवळ श्री. मुंडे यांच्या हस्ते खिचडीवाटप करण्यात आले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष आर. टी. देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, मुख्याधिकारी इरलोड उपस्थित होते. उद्या सकाळी १० वा. वैद्यनाथ घोडय़ांची धावण्याची स्पर्धा व १०.३० वाजता अश्व नृत्य स्पर्धा होईल.

पोलीस शिपाई निलंबित
उस्मानाबाद, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

न्यायालयाने बजावलेल्या समन्सची अंमलबजावणी न करणारा पोलीस शिपाई एम. एम. ढगे याला पोलीस अधीक्षकांनी आज निलंबित केले. ढगेने कळंबच्या प्रभारी पोलीस निरीक्षकाचा अपमान केल्याचेही सांगण्यात आले. कळंब न्यायालयाने १८ फेब्रुवारी २००९ रोजी एका गुन्हेगाराविरुद्ध समन्स बजावण्याचा आदेश कळंब पोलिसांना दिला. त्या ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकांनी समन्सची जबाबदारी एम. एम. ढगे याच्याकडे सोपविली. त्याने उद्धट वर्तणूक करीत वरिष्ठांकडे आपली तक्रार करण्याचे सांगितले.

नळदुर्गमध्ये महाशिवरात्र उत्साहात साजरी
नळदुर्ग, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

शहर व परिसरात भाविक-भक्तांनी महाशिवरात्र उत्साहात साजरी केली. सकाळपासून शहरातील महादेव मंदिर, अष्टलिंग महादेव मंदिर, विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. विठ्ठल मंदिरात भुयारी शिवमंदिर असून ते आज दिवसभर भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. उद्या (मंगळवारी) शहरातून महादेवाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या वेळी महाप्रसादाचे वाटपही करण्यात येणार आहे.