Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

जीपीएसची अनोखी दुनिया!!
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस)ची आताच्या मोबाईल दुनियेत एक लहर पसरली आहे. जीपीएस सिस्टिमद्वारा नेटवर्कमधला कुठलाही माणूस त्या क्षणी कुठे आहे याची आपल्याला माहिती मिळू शकते. जीपीएस सॅटेलाईट ट्रान्समिशन्सद्वारा काम करतं. तुमच्या मोबाईलमध्ये जीपीएसची सुविधा असल्यास तुम्ही कुठल्याही क्षणी कुठलंही लोकेशन शोधून काढू शकता. जगाच्या पाठीवरील कुठलाही रस्ता, बिल्डिंग तुम्ही या जीपीएस सिस्टिमद्वारे शोधू शकता. पण हे सगळं तेव्हाच शक्य होऊ शकतं जेव्हा आपल्या मोबाईलमध्ये जीपीएसची सुविधा असते. सध्या तरी ही सुविधा फक्त नोकिया नेविगेटरसारख्या महागडय़ा फोनमध्येच उपलब्ध आहे.

आयटीचा धमाकेदार हंगामा
केळवणी मंडळाच्या ‘उषा प्रवीण गांधी कॉलेज’ (यू.पी.जी.सी.) यांनी २० फेब्रुवारी रोजी उऌकढ- कळ नावाचे आयटीवर आधारित एक कार्यक्रम आयोजित केला होता. यू.पी.जी.सी.च्या मॅनेजमेंट विभागाचे हे फेस्ट फक्त मॅनेजमेंट कॉलेजेससाठी नसून सर्वासाठी खुले होते. मुंबई व नवी मुंबईतील ६५ कॉलेजेसनी यात भाग घेतला होता. एकंदरीत ५०० विद्यार्थी यात सहभागी झाले होते. या इव्हेंटचे उद्घाटन आयटी कंपनी ‘नासकॉम’चे उपाध्यक्ष राजीव वैष्णव यांच्या हस्ते झाले. राजीव यांनी एका परिसंवादात ‘आयटी क्षेत्रातील वर्तमान स्थिती व भविष्यातील संधी’ यावर माहिती दिली.

मॅनेजमेंटची रंगीत तालीम!
‘ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च’च्या ‘मास्टर्स इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन डिपार्टमेंट’चा ‘विस्टा-२००९’ हा टेकफेस्ट १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान पार पडला. मुंबईतील ४० हून अधिक महाविद्यालये यात सहभागी झाली होती. ‘विस्टा’चं यंदाचं हे चौथं र्वष. तरुणांना कॉलेजमध्ये असतानापासूनच ग्रुपमध्ये काम करण्याची सवय लागावी, लहान-मोठय़ा इव्हेन्टस् स्वबळावर आयोजित करता याव्यात, समस्या कशा सोडवाव्यात, कोऑर्डिनेशन यासाठी हा फेस्ट म्हणजे भावी आयुष्यातील यशस्वी कार्यक्रमांची रंगीत तालीम आहे असं ‘विस्टा-२००९’चा स्टुडन्ट कोऑर्डिनेटर चेतन जागेटिआ म्हणाला. फेस्टिव्हलचं उद्घाटन रिलायन्स ग्रुपचे एच. आर. प्रमुख राजीव बधुरिया यांच्या हस्ते झाले. इव्हेंटस् तर सर्वच कॉलेज फेस्टिव्हलमध्ये होत असतात पण ते तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने आयोजित करता यावर त्याचं वेगळेपण अवलंबून असतं. आर्ट अटॅक, जंग-कि-जंग, कॉर्पोरेट टू डॉमिनेट, कोडिंग अँड डिबर्गिग, वेब डिझायनिंग, क्विझ, रिव्हर्स अँड मॅड, लॅन गेमिंग, बॅटल ऑफ ब्लड बाथ या आणि अशा अनेक इनोवेटिव्ह इव्हेंटस्मुळे ‘विस्टा-२००९’ इतर कॉलेज फेस्टिव्हलपेक्षा वेगळा ठरला. पठडीतल्या लिखाणाचा फॉरमॅट सोडून कल्पनेपलिकडील विनोदी लिखाणाला प्रोत्साहन देण्यासाठी एका विशेष स्पर्धेचं आयोजन यात करण्यात आलं होतं. तरुणाने आत्महत्या करण्याआधीचं पत्र, गर्लफ्रेंडबरोबर पळून जाण्याआधी आई-वडिलांना लिहायचं पत्र यांसारख्या विषयांवर तरुणांनी धम्माल नमुने लिहिले होते. कल्पनाशक्तीला वाव व बुद्धीला चालना देणारी ही कार्यशाळा यामुळेच वेगळी ठरली. फेस्टिव्हलमध्ये सौरभ अग्रवाल यांनी अ‍ॅक्टिंगचं वर्कशॉपही घेतलं. विजेत्यांना ४० हजारांहून अधिक रुपयांची बक्षिसे यावेळी दिली गेली. मंदीचा काळ चालू असूनही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्पॉन्सरशिप मिळवू शकलो यातच फेस्टिव्हलच्या यशाचं गमक लपलेलं आहे, असं चेतन पुढे म्हणाला. या तीन दिवसांच्या फेस्टिव्हलसाठी चेतन जागेटिया, पूर्ती चित्रे, साकेत समेळ, दिपेश बर्णे, करण मेहता, अतमान खन्ना, महेश जाधव यांच्याबरोबर १२० विद्यार्थ्यांची टीम दिवसरात्र मेहनत घेत होती. प्राध्यापक शुभिलाल अगरवाल यांचं विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं.
प्रशांत ननावरे
nanawareprashant@yahoo.co.in

दिल से..
प्रिय मिहीर,
हाय! तुझं पत्र मिळालं.या वेळी एकाच आठवडय़ात तुझी दोन पत्रं हातात आली. इतकं मस्त वाटलं, काय रे तुम्ही.. कशाला छळलंत त्या बिचाऱ्याला अगदी व्हॅलेण्टाइन्सचा मुहूर्त साधून! आणि तुमची ती मैत्रिण खरंच डेअरिंगबाज हं.. मानलं पाहिजे तिला; पण या सगळ्यात तुमचा हनुमानभक्त मित्र उगाचच रगडून निघाला. सॉलिड चिडला असेल ना तुमच्यावर? आणि त्याने उत्तर काय दिलं तिच्या प्रपोजलचं?
आपल्याकडच्या पॉलिटिकल ट्रान्स्फॉर्मेशनबद्दल तू इतका आशावादी आहेस, हे मला माहीत नव्हतं! आता हा जे. एन. यू.च्या वातावरणाचा परिणाम आहे, का दिल्लीतल्या ‘पॉलिटिकल’वाल्यांचा ते मात्र कळत नाहीये. मला तर हल्ली खरंच असं वाटायला लागलंय, की तू अ‍ॅक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये जाणार. म्हणजे लिडरशिप क्वालिटीज तर तुझ्याकडे आहेतच मला आठवतंय ना, कुठल्याही कार्यक्रमात जर तू असशील, तर आपोआपच सगळे तू म्हणशील ते फॉलो करायचे. महत्त्वाचे निर्णय घ्यायची जबाबदारी तू सहज सांभाळायचास. अगदी कुचकट म्हणून फेमस असलेल्या लोकांकडूनही नेमकं काम गोड बोलून काढून घेण्यात तुझा हातखंडा आणि गंमत म्हणजे सगळे तुझं शांतपणे ऐकूनही घ्यायचे. लोकांना आपलं म्हणणं मोजक्या शब्दांत आणि ठामपणे पटवून द्यायचं तुझं कसब खरंच सॉलिड आहे. एनीवेज, मॉरल ऑफ द स्टोरी इज, अ‍ॅक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये लागणारा सर्वात महत्त्वाचा गुण तुझ्याकडे आहे. तू काही विचार केलायस याबाबतीत? अर्थात, तुझे करिअर व्ह्य़ुज स्पष्ट आणि प्लॅण्ड असणारच. कारण आधी करून दाखवायचं आणि मग सांगायचं असाच स्वभाव आहे तुझा; पण मला तू आधी सांगू शकतोस!! आणि तुझे प्लॅन्स मी हक्काने विचारूही शकते, नाही का!! सध्या मला एक्झाम फिव्हर झालाय! म्हणजे आता परीक्षेला आठच दिवस राहिलेत आणि पूर्ण वर्षभर धमाल, मजा, मस्ती करून झाल्यावर आम्ही खडबडून जागे झालो आहोत! इकॉनॉमिक्स, हिस्टरी, पॉलिटिकल सायन्सने चारी बाजू, आठही दिशांनी आक्रमण करायला सुरुवात केली आहे आणि आमचा ‘चक्रव्युहातला अभिमन्यू’ झाला आहे!! असो..
तू कसा आहेस? अभ्यास काय म्हणतोय? आणि नवीन काय सध्या? चल, पत्र पुरे करते. ‘अभ्यासा’ला बसायचंय..!!Lots of Love...
सावनी

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक्’ करणं फार थोडय़ांना जमतं. आप मे हैं वह बात? तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूडशी’ मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.