Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)
‘स्लमडॉग’ला आठ ऑस्कर
‘स्माइल पिंकी’च्या यशाने आनंद द्विगुणित!
लॉस एंजेलिस, २३ फेब्रुवारी/पीटीआय

 
येथील कोडॅक स्टुडिओत झालेल्या दिमाखदार ऑस्कर सोहळय़ात ‘स्लमडॉग मिलिनियर’ या चित्रपटाने आठ ऑस्कर पुरस्कारांची लयलूट केली. ‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटाची पाश्र्वभूमी भारतीय असल्याने यंदाचा ऑस्कर पुरस्कार कुणाला मिळणार, याबाबत देशात जास्त उत्सुकता होती. ‘तारे जमीं पर’ हा परदेशी चित्रपट गटातील चित्रपट मात्र अगोदरच बाद झाला होता. भारताचे मोझार्ट समजले जाणारे चेन्नईचे संगीतकार ए. आर. रेहमान यांनी दोन ऑस्कर पुरस्कार पटकावताना अटकेपार झेंडा लावला. ध्वनी अभियंता रसूल पुकुट्टी यांनीही ध्वनिमिश्रणाचा ऑस्कर पुरस्कार पटकावत कमाल केली. लघु माहितीपटात ‘स्माईल पिंकी’ने बाजी मारली. ऑस्करमधील यशाला द्विगुणित केले. ‘स्लमडॉग मिलिनियर’ हा चित्रपट अगोदरच ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत वरच्या क्रमांकावर होता व त्याच्या यशाविषयी अनेकांना खात्री होती. ‘गांधी’ चित्रपटातील वेशभूषाकार भानू अथैया व ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यजित राय यांच्यानंतर सुमारे २६ वर्षांनी भारताला ऑस्कर मिळाले आहे. ‘स्लमडॉग मिलिनियर’ या चित्रपटाची कथा धारावी झोपडपट्टीतील एका मुलावर बेतलेली असल्याने या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर तेथे दिवाळी साजरी झाली.
‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटातील मुलगा क्विझ शोमध्ये २ कोटी अमेरिकी डॉलर जिंकतो. एका सामान्य पाश्र्वभूमी असलेल्या मुलाच्या यशाची ही चढती कमान निश्चितच विस्मयचकित करणारी आहे. याच चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी डॅनी बॉयल यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा, तर सिमॉन बिफॉय यांना उत्कृष्ट रूपांतरित पटकथेचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर पुरस्कार अँथनी डॉड मँटल यांना मिळाला, तसेच उत्कृष्ट संपादनासाठीचे ऑस्करही याच चित्रपटाला मिळाले.
ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना संगीतकार ए. आर. रेहमान यांचा चेहरा अधिकच उजळला होता. ४३ वर्षांच्या या संगीतकाराने सांगितले, की येथे येण्यापूर्वी माझ्या मनात कुतूहल व भीती अशा संमिश्र भावना होत्या. यापूर्वी लग्न झाले तेव्हाही माझ्या अशाच भावना होत्या.
आमच्याकडे हिंदी चित्रपटात शशी कपूरच्या तोंडी एक संवाद आहे, ‘मेरे पास माँ है’ म्हणजे माझ्याजवळ काही नसले तरी माझी आई माझ्याजवळ आहे. माझी आई माझे कौतुक करण्यासाठी येथे आली आहे, असे रेहमान यांनी सांगितले. त्यांच्या मातोश्री करिमा बेगम यावेळी मुलाचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होत्या. रेहमान यांना ओरिजनल स्कोअरचे ऑस्करही मिळाले आहे. पायांवर ठेका धरायला लावणाऱ्या ‘जय हो’ या गीताला उत्कृष्ट गीताचा सन्मान मिळाला. हे गीत ख्यातनाम गीतकार गुलजार यांनी लिहिले आहे. ध्वनिमिश्रणासाठीचा ऑस्कर पुरस्कार पटकावणारे पुकुट्टी हे केरळमधील कोल्लम जिल्हय़ातील आहेत. त्यांच्यासमवेत इयन टॅप व रिचर्ड प्रायके यांचाही सन्मान झाला आहे.
‘स्लमडॉग मिलिऑनर’ हा चित्रपट भारतीय राजनैतिक अधिकारी विकास स्वरूप यांच्या ‘क्यू अँड ए’ या कादंबरीवर बेतलेला असून, त्याला यंदाच्या ८३व्या ऑस्कर पुरस्कारासाठी दहा नामांकने मिळाली होती. यापूर्वी ज्येष्ठ बंगाली दिग्दर्शक व निर्माते सत्यजित राय यांना १९९२ मध्ये त्यांच्या जीवनातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी विशेष ऑस्कर देण्यात आले होते. त्याअगोदर १९८३ मध्ये रिचर्ड अॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटातील वेषभूषेसाठी भानू अथैया यांना ऑस्कर मिळाले होते. ऑस्कर सोहळय़ात आज भारताने अक्षरश: राज्य केले असे म्हणायला हरकत नाही, कारण ‘स्लमडॉग मिलिनियर’ या चित्रपटाबरोबरच ‘स्माईल पिंकी’ या लघु माहितीपटानेही बाजी मारली. उत्तर प्रदेशातील एका मुलीने तिचे ओठ फाटल्याने तिला समाजाने बहिष्कृत करूनही त्याविरोधात दिलेला लढा हा या माहितीपटाचा विषय आहे. त्याचे दिग्दर्शन एमी पुरस्कारविजेते मेगन मायलन यांनी केले असून, चित्रीकरण उत्तर प्रदेशातील मिर्झापूर व वाराणसी येथे झाले आहे. ‘स्लमडॉग’ने ब्रॅड पीट यांची भूमिका असलेल्या ‘द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन’ या १३ नामांकने मिळालेल्या चित्रपटाला मागे टाकले. त्यांना तीन ऑस्कर पुरस्कारांवर समाधान मानावे लागले.
उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचे ‘ऑस्कर द रीडर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी केट विन्सलेट हिला मिळाले. नाझी तुरुंगाची रखवालदार म्हणून तिने भूमिका केली आहे. ‘मिल्क’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सीन पेन यांना उत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर मिळाले. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार हीथ लेजर यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला. ‘द डार्क नाईट’ या चित्रपटात त्यांनी केलेली जोकरची भूमिका गाजली होती. ‘विकी ख्रिस्तिना बार्सेलोना’ या चित्रपटातील भूमिकेसाठी पेनेलोप क्रूझ हिला उत्कृष्ट सहअभिनेत्रीचे ऑस्कर मिळाले. तिचे हे पहिलेच ऑस्कर आहे.
संगीतकार ए. आर. रेहमान यांनी बंद गळय़ाची शेरवानी परिधान केली होती. त्यांच्या पत्नी त्यांच्या समवेत होत्या. ऑस्कर सोहळय़ात त्यांनी गायक जॉन लिजंड व इतर नर्तकांच्या मदतीने जय हो व ओ साया ही दोन्ही गाजलेली गीते सादर केली तेव्हा सगळय़ांनीच ठेका धरला. संगीतकार म्हणून रेहमान यांचे नाव पहिल्यांदा पुढे आले ते मणिरत्नमच्या ‘रोजा’ या चित्रपटामुळे. ‘स्लमडॉग’साठी त्यांना ऑस्करच्या अगोदर गोल्डन ग्लोब व बाफ्ता हे पुरस्कार संगीतासाठी मिळाले होते.
‘स्लमडॉग’च्या चमूसाठी आजचा सोहळा अविस्मरणीय होता. फ्रीडा पिंटो यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा चमू रेड कार्पेट शोसाठी आला तेव्हा त्यांनी सगळय़ांचे लक्ष वेधून घेतले. पिंटो यांनी इलेगंट ब्लू जॉन गॅलिनो गाऊन परिधान केला होता, त्यामुळे त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसले. दोन सलीम महंमद अझरुद्दीन व आशुतोष गाजीवाला तसेच दोन लतिका रूबिना अली कुरेशी व तन्वी लोणकर हॉलिवूडमधील या सोहळय़ास उपस्थित होते. त्यांच्यासाठी ते सगळेच भारून टाकणारे वातावरण होते.

अँड ऑस्कर गोज टू..
उत्कृष्ट चित्रपट- स्लमडॉग मिलिओनर
उत्कृष्ट दिग्दर्शक- डॅनी बॉयल (स्लमडॉग मिलिनेअर)
उत्कृष्ट अभिनेता- सीन पेन (मिल्क)
उत्कृष्ट अभिनेत्री- केट विन्सलेट (द रीडर)
उत्कृष्ट सहायक अभिनेता- हीथ लेजर (मरणोत्तर- द डार्क नाईट)
उत्कृष्ट सहायक अभिनेत्री- पेनेलोप क्रूझ (विकी ख्रिस्तिना बार्सेलोना)
उत्कृष्ट विदेशी चित्रपट- डिपार्चर्स (जपान)
उत्कृष्ट रूपांतरित पटकथा- सिमॉन बिफॉय (स्लमडॉग मिलिनेअर)
उत्कृष्ट मूळ पटकथा- डस्टीन लान्स ब्लॅक (मिल्क)
उत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म- वॉल-ई
उत्कृष्ट कला दिग्दर्शन- द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन
उत्कृष्ट सिनेमाटोग्राफी- अँथनी डोड मँटल
उत्कृष्ट ध्वनिमिश्रण- रसूल पुकुट्टी, आयनटॅप व रीडर्ड पायरके (स्लमडॉग मिलिनेअर)
उत्कृष्ट ध्वनिसंपादन- द डार्क नाईट
उत्कृष्ट ओरिजनल स्कोअर- ए.आर. रेहमान (स्लमडॉग मिलिनेअर)
उत्कृष्ट ओरिजनल मूळ गीत जय हो- स्लमडॉग मिलिनेअर (संगीत- ए.आर. रेहमान, गीतकार- गुलझार)
उत्कृष्ट वेशभूषा- मायकेल ओकॉनेर (द डचेस)
उत्कृष्ट रंगभूषा- द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन
उत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म- ला मैसन एन पेटीट क्युब्ज
उत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म- स्पीझलग्लँड (टॉयलँड)
उत्कृष्ट दृश्य परिणाम (व्हिज्युअल इफेक्ट)- द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन
उत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर- मॅन ऑन वायर
उत्कृष्ट माहितीपट (लघु)- स्माईल पिंकी
उत्कृष्ट चित्रपट संपादन- स्लमडॉग मिलिनेअर