Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

..आणि पिंकी हसली!
मुंबई, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

भारतीय कथेवर आधारित ‘स्लमडॉग मिलिअनेअर’ या चित्रपटाला तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले असतानाच उत्तरप्रदेशातील एका लहान मुलीच्या ओठांचे अपंगत्व दूर करणाऱ्या ‘क्लेफ्ट लिप’ (दुमडलेल्या ओठांवरील शस्त्रक्रिया) शस्त्रक्रियेवरील ‘स्माइल पिंकी’ या लघुमाहितीपटाला ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘स्माइल ट्रेन’ या जागतिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या मदतीने दिग्दर्शिका मॅगन मिलान या दिग्दर्शिकेने हा माहितीपट तयार केला.
या संदर्भात अधिक माहिती देताना ‘स्माइल ट्रेन’ या संस्थेच्या भारतातील शाखेचे प्रतिनिधी सतीश कालरा यांनी सांगितले की, भारताच्या पाश्र्वभूमीवर मिलान यांना माहितीपट तयार करायचा होता. त्यासाठी त्यांनी ‘स्माइल ट्रेन’ या संस्थेला संपर्क साधला. या संस्थेच्या भारतातील कामावर माहितीपट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारतात आल्यावर मेगन मिलान यांनी डॉ. सुबोधकुमार सिंग यांच्याशी चर्चा फोनवरून संपर्क साधल्यावर वाराणसी येथील जी. एस. मेमोरिअल रुग्णालय गाठले. त्यावेळी उत्तरप्रदेशातील मिर्झापूर येथून ‘क्लेफ्ट लिप’ या विकारावर उपचार करण्यासाठी तेथे आलेल्या पिंकी सोनकर या मुलीवर होणाऱ्या शस्त्रक्रियेवर माहितीपट तयार करण्याचे मिलान यांनी ठरविले. हा माहितीपट तयार करण्यासाठी नंदिनी राजवाडे यांनी फिल्ड प्रोडय़ुसरची जबाबदारी सांभाळली होती. राजवाडे यांनी यूसी बर्कले येथून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून त्या स्वत: माहितीपट निर्मात्या आहेत. मिलान यांच्या इंग्रजी वाक्यांचे हिंदीत भाषांतर करून राजवाडे यांनी उत्तरप्रदेशातील स्थानिकांशी संवाद साधला व मिलान यांचा हेतू, कळकळ पिंकीच्या नातेवाईकांपर्यंत समर्थपणे पोहोचविली.
हा पुरस्कार स्वीकारल्यावर मेगन म्हणाल्या की, माझ्या माहितीपटात घडणारा चमत्कार दररोज जगभरातील अनेक रुग्णांच्या बाबतीत घडतो. हा माहितीपट तयार करण्यासाठी सहकार्य करणारे संकलक पर्सेल कार्सल, सिनेमॅटोग्राफर निक डय़ुब, फिल्ड प्रोडय़ुसर नंदिनी राजवाडे आणि एचबीओमधील शीला नेव्हन्स व लीसा हेलर यांचे मिलान यांनी आभार मानले. या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना कालरा म्हणाले की, ऑस्कर पुरस्काराच्या निमित्ताने या अपंगत्वाविषयी जनजागृती निर्माण होईल. जगभराती सुमारे ४० लाख रुग्ण ‘क्लेफ्ट लिप’ या विकाराने त्रस्त आहेत. त्यांच्यापैकी एक टक्का रुग्णांनी जरी रुग्णालयाशी संपर्क साधला तर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येईल. भारतात सुमारे १० लाख रुग्णांना हा विकार असून त्यांच्यापैकी ५० टक्के रुग्ण रुग्णालयातच जात नाहीत. ‘स्माइल ट्रेन’ ही संस्थेच्या माध्यमातून ‘क्लेप्ट लिप’ शस्त्रक्रिया विनाशुल्क करून देण्यात येते. अधिक माहितीसाठी www.smiletrainindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.