Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

रहमानने ऑस्कर अर्पण केले परमेश्वराला अन् मातेला!
लॉस एंजेलिस, २३ फेब्रुवारी/पीटीआय

 

२२ फेब्रुवारीची हॉलीवूडमधील ती रात्र संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासाठी अविस्मरणीय अशीच होती. ‘जय हो’ या गीतासाठी त्यांना ऑस्कर जाहीर झाले, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही, पण एवढे यश मिळूनही त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही अभिनिवेश नव्हता.
पुरस्कार स्वीकारताना रेहमान यांचे शब्द होते, एल्ला पुघलम इरायवनुके (मला मिळालेला हा सन्मान परमेश्वराचाच आहे.) परमेश्वराशिवाय त्यांनी हा सन्मान त्यांच्या प्रेमळ मातेला अर्पण केला. त्यांच्या मातोश्री करिमा बेगम या पुरस्कार सोहळय़ाला कोडॅक थिएटरमध्ये आवर्जून उपस्थित होत्या. रेहमान म्हणाले, की माझ्या आयुष्यात मला नेहमीच प्रेम आणि मत्सर असे दोन पर्याय होते. त्यात मी नेहमी प्रेमाचीच निवड केली म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. ए. आर. रेहमान यांचे व्यक्तिगत आयुष्यही अनेक चढउतारांनी भरलेले आहे. वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्या मातोश्री करिमा बेगम यांनी एका तामिळी साप्ताहिकाला सांगितले, की मुलाला शिक्षण देता आले नाही, याची खंत मला आयुष्यभर वाटत राहील, तसेच मुलाचे बालपण हिरावले गेल्याचे दु:खही कायम राहील. ठ

माझी पहिली प्रतिक्रिया आश्चर्याची होती. जसजसा कार्यक्रम सुरू झाला तसे रेहमानला ऑस्कर मिळणार असे मला वाटत होते. रसूललाही ऑस्कर मिळाले याचाही मोठा आनंद मला वाटतो. हा चित्रपट तर चांगला होताच, पण सगळ्या चमूबरोबर काम करण्यात वेगळे समाधान होते. या चित्रपटातील सळसळते चैतन्य कलाकारांमध्येही प्रतिबिंबित झालेले होते. रेहमानच्या संगीताचा गौरव झाल्याने भारतीय चित्रपट संगीताचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून जाणार आहे.
- गुलजार

दरवर्षी असा पुरस्कार मिळावा असे वाटते हे रेहमानचे म्हणणे स्वागतार्हच आहे. त्याच्यासारखा गुणी व बुध्दिमान संगीतकार दुसरा नाही. त्याच्या संगीताला दाक्षिणात्य भारतीय संगीताची डूब आहे, तसेच हिंदी चित्रपट संगीतातही त्याची कामगिरी असाधारण अशीच आहे.
लता मंगेशकर

रहमानबरोबर मी अनेक चित्रपटांतील गाणी म्हटली, तो बुद्धिमान आहे यात शंकाच नाही. सगळ्या जगालाच त्याने विस्मयचकित केले. भारतीय बुद्धिमत्तेची दखल त्याने जगाला घ्यायला लावली हेच त्याचे मोठे यश आहे. त्याने भारतीय चित्रपट उद्योगाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले.
आशा भोसले