Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

रेड कार्पेट..
ब्रिटिश बॉयल

 

डॅनी बॉयल यांच्या चित्रपटांना अ‍ॅकेडमी तसेच जगभरात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या पुरस्कारांपासून आजतागायत वंचित राहावं लागलं होतं. स्लमडॉगने केवळ भारतीय सिनेमाचे द्वार जगासाठी उघडले नाही, तर या ब्रिटिश चित्रकर्त्यांचा इतक्या वर्षांतील प्रामाणिक प्रयत्नांचा खऱ्या अर्थाने सन्मान या चित्रपटांना ‘ऑस्कर’ने केला आहे असं म्हणता येईल. २०००मध्ये सॅम मेंडिस यांना ‘अमेरिकन ब्यूटी’ साठी मिळालेल्या पुरस्कारानंतर ब्रिटिश दिग्दर्शकांपासून लांब राहिलेला हा पुरस्कार बॉयल यांनी पुन्हा खेचून आणला आहे.
केट विन्स्लेटची कामना पूर्ण
‘सेन्स अ‍ॅण्ड सेन्सिबिलिटी’साठी १९९६ साली पहिलं ऑस्कर नामांकन मिळविणाऱ्या केट विन्स्लेटला प्रत्यक्ष पुरस्कारासाठी एक तप वाट पाहावी लागली आहे. टायटॅनिक (१९९८), आयरिस (२००१), इटर्नल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माइंड (२००४) आणि लिट्ल चिल्ड्रन (२००७) या चित्रपटांबाबत ऑस्करची हुलकावणी यंदाही होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ‘मेरिल स्ट्रीप’सारख्या दिग्गज प्रतिस्पध्र्याला मागे टाकत ऑस्करने केट विन्स्लेटची कामना पूर्ण केली आहे.
दावेदार पेनलॉप
पेनलॉप क्रूझला पहिलं ऑस्कर मिळायला केट विन्स्लेटपेक्षा अधिक कालावधी लागला आहे. १९९२ पासून पेनलॉपच्या असण्याने लोकप्रिय बनलेले ‘जामून जामून’, ‘बेले इपोक्वे’ ‘वूमन ऑन टॉप’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला जमवला, पण २००६ साली आलेल्या ‘वोल्व्हर’पर्यंत तिला ऑस्करचे एकही नामांकन मिळाले नव्हते. ‘एलिजी’ या चित्रपटासाठी यंदाचे सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर पेनलॉप हामखास मिळवून देईल असे सांगितले जात असतानाच, या चित्रपटाला ऑस्करचे एकही नामांकन मिळाले नसल्यामुळे जाणीवपूर्वक राजकारण केले जात असल्याची टीका होऊ लागली. विक्की क्रिस्टिना बार्सिलोना या चित्रपटासाठी पेनलॉपला मुख्य अभिनेत्रीसाठीचे नामांकन मिळाले नाही म्हणून स्पेनमधील माध्यमांनी अ‍ॅकॅडमीवर टीकेची झोड उठवली. अगदी पुरस्कार स्वीकारल्यानंतर केट विन्स्लेटने पहिल्यांदा पेनलॉपचे (गटात नसल्याबद्दल) आभार मानले, यावरूनच ती या पुरस्कारासाठी किती योग्य होती हे स्पष्ट होते.
शॉन पेन यांना धक्का
क्यूरिअस केस ऑफ बेंजामिन बटनसाठी ब्रॅड पीटने ऑस्करवर आपले नाव कोरले असून फक्त पुरस्कार सोहळ्यात ते घोषित होण्याचे काय ते बाकी आहे, असं चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर म्हटलं जात होतं. मिकी रौरक गोल्डन ग्लोबप्रमाणे येथेही ब्रॅड पीटवर बाजी मारतो, अशीदेखील चर्चा मोठय़ा प्रमाणावर केली जात होती. पण या साऱ्या चर्चाना खोटं ठरवत शॉन पेन यांच्या हाती ऑस्कर आले. गेल्यावर्षी अभिनयातून संन्यास घेतलेल्या शॉन पेन यांनी दिग्दर्शित केलेला ‘इनटू द वाईल्ड’ पुरस्कार काही मिळवू शकला नव्हता. पण हार्वी मिल्क साकारण्यासाठी चित्रपट सन्यास सोडणाऱ्या शॉन पेन यांना यंदा ऑस्करने सुखद धक्का दिला आहे.
बशीरवर अन्याय ?
परभाषक (फॉरेन लॅँग्वेज फिल्म) चित्रपटांच्या गटात धुमकेतूसारखा आलेला ‘डिपार्चर’ पुरस्कार मिळवून जाईल असा अंदाज कुणीही व्यक्त केला नव्हता. ‘वॉल्ट्झ विथ बशीर’ हा इस्राईलचा चित्रपट ऑस्करसाठी स्वीकारला जातानाच अ‍ॅकेडमीकडून अनेक आक्षेप नोंदविण्यात आले होते. चित्रपट न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शित झाला नसल्यामुळे ऑस्करसाठी स्वीकारला जाणार नाही, अशी भूमिका अॅकेडमीने घेतली होती. त्याबाबतच्या नियमांवर टीका होऊ लागल्यानंतर अखेर अॅकेडमीला नमतं घ्यावं लागलं होतं. गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावल्यानंतर हाच चित्रपट ऑस्करही पटकावेल हे हॉलीवूडमधील सर्व चित्रपट ब्लॉगर्सचे मत होते. पण हॉलीवूडमध्ये त्याला केवळ परभाषक चित्रपटांच्या गटात टाकण्यात येऊन सवरेत्कृष्ट ‘अॅनिमेशन’ गटासाठी ‘वॉल ई’चा रस्ता मोकळा करून देण्यात आला, हे उघड सत्य होतं. मात्र परभाषक गटामध्येही या चित्रपटावर अन्याय झाला असल्याची ओरड आता होत आहे. अली फोलमन या दिग्दर्शकाच्या ‘वॉल्ट्झ विथ बशीर’मध्ये १९८२च्या साबरा आणि रातीला या पॅलेस्टिनी वस्त्यांमध्ये केलेल्या नरसंहाराचा भाग आला आहे. मात्र तो सरळ साध्या पद्धतीने मांडला गेला नाही, तर त्यासाठी त्याने अॅनिमेशनचा विचित्र प्रकार वापरला आहे. या चित्रपटाला पुरस्कार न मिळाल्याने आता अ‍ॅकेडमी ‘ज्यू विरोधी’ असल्याचे बोलले जात आहे.