Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘वऱ्हाड’कार डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे निधन
औरंगाबाद, २३ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

 

‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने जगभर प्रसिद्ध झालेल्या आणि विश्वविक्रमाच्या ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा झेप घेतलेल्या डॉ. लक्ष्मण नरसिंह देशपांडे यांचे आज मध्यरात्री निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी विजयाताई, मुले सचिन व नितिन, सुना, नातवंडे, पुतण्या राहुल, थोरले बंधू शांताराम असा परिवार आहे.
मधुमेह आणि यकृताच्या आजारपणामुळे डॉ. देशपांडे यांना गेल्या मंगळवारी (दि. १७) कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार सुरू होता. काल त्यांची प्रकृती खालावली आणि मध्यरात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाग्यनगरमधील त्यांच्या ‘वऱ्हाड’ या निवासस्थानी शहरातील कला, नाटय़, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी धाव घेतली.
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामुळे डॉ. देशपांडे यांचा प्रेक्षक-श्रोता जगभर आहे. एकूण ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमीतकमी प्रभावी हालचाली हे या एकपात्री प्रयोगाचे खास वैशिष्टय़ होते. मराठवाडय़ाच्या ग्रामीण जीवन शैलीशी एकरूप असलेले आणि अस्सल व्यक्तिरेखा असणारा हा प्रयोग केवळ मराठवाडय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विविध देशांतील मराठी नाटय़रसिकांना भावला. उत्तुंग प्रतिभेचा कलावंत आज नाटय़ क्षेत्रातून हरपला आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८०मध्ये झाली. आजपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे ३ हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा नोंद घेण्यात आलेले लक्ष्मण देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते.
अल्पचरित्र / नाटय़सृष्टीत शोक ..