Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कोदंबक्कम ते ऑस्कर रहमानचा प्रवास
प्रतिनिधी

 

आर्थिक विवंचनेमुळे चित्रपटसृष्टी सोडून देण्याच्या विचारात असलेल्या ए.आर. रहमानचा ‘कोदंबक्कम ते हॉलिवूड’ हा संगीतमय प्रवास आता झगमगता वाटत असला तरी त्याचा प्रारंभीचा कालखंड काटे आणि अडथळ्यांनी भरलेला होता.. वयाच्या नवव्या वर्षी वडिलांचे बोट धरून संगीत क्षेत्रात शिरलेल्या रहमानचे कान जणू अगदी बालपणापासून तयार झाले होते.. साधी साधी धून ऐकून रहमान भान विसरून जायचा.. एका संगीतकाराचा वारसा चालवताना रहमानने स्वत:ला ज्या पद्धतीने जागतिक दर्जाचा संगीतकार म्हणून विकसित केले त्याकडे पाहून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या. आज रहमान हा भारतीय युवा पिढीसाठी एक प्रेरणास्रोत बनला आहे.
रहमानने त्याची संगीताची कारकिर्द कोदम्बक्कम येथील चित्रपटसृष्टीतून सुरू केली. रहमान प्रारंभी ख्यातकीर्त दाक्षिणात्य संगीतकार इलियाराजा यांच्या वाद्यवृंदात एक की बोर्ड प्लेअर म्हणून काम करू लागला. १९७०चा हा काळ होता. यानंतर त्याने जाहिरातींच्या जिंगल्सना संगीत देण्याचा प्रयत्न केला. त्याने संगीत दिलेल्या जाहिराती लोकप्रिय होऊ लागल्यानंतर त्याची दिशा निश्चित झाली. रहमान नऊ वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारले. त्यामुळे लहान वयातच शिक्षण आणि घरची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. आर्थिक गाडाच बिघडल्याने त्याचे शिक्षण खुंटले. त्याच्या आीला मुलाला चांगले शिक्षण देऊ न शकल्याची खंत आजही आहे. १९८० च्या दशकात लिओ कॉफी, बॉम्बे डाईंग आणि टायटन घडय़ाळाच्या जाहिरातीतील जिंगल्सला रहमानने संगीत दिले आणि तो चर्चेत आला. परंतु, त्याची आर्थिक विवंचनेच्या फे ऱ्यातून सुटका झालेली नव्हती. त्यामुळे संगीतसृष्टी सोडून पोटापाण्यासाठी दुसरा व्यवसाय करण्याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. याचदरम्यान मणिरत्नम ‘रोजा’ सिनेमा बनवणार असल्याचे कळल्याने रहमान त्यांची भेट घेणार होता. परंतु, एका पुरस्कार वितरण समारंभात मणिरत्नमने रहमानच्या संगीताची जादू ऐकली आणि त्याला ‘रोजा’चे संगीत दिग्दर्शन करण्याची ऑफर दिली. हा रहमानच्या आयुष्यातील टर्निग पॉईंट ठरला. ‘रोजा’चे संगीत तुफान हिट झाले.त्यानंतर रहमानने मागे वळून पाहिलेच नाही.. तामीळ चित्रपटसृष्टीत ‘इसाई पुयाल’ नावाने लोकप्रिय असलेल्या रहमानने संगीतातील अनेकविध प्रयोग केले. आजवर त्याने दीडशेपेक्षा जास्त चित्रपटांना संगीत दिले आहे. माता आणि मातृभाषेचा अतीव आदर ही त्याची खासियत. रहमानच्या ‘वंदे मातरम्’ने तर भारतीयांवर जादू केली आहे.. आई, पत्नी, तीन मुले आणि दोन बहिणी हे त्याचे जग.. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे त्या आवडते..