Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

..आणि पिंकीच्या ओठावर खुलले खरोखरचे स्माइल!
प्रतिनिधी

 

‘स्माइल पिंकी’ या ऑस्करविजेत्या लघुमाहितीपटाची कथा जिच्या जीवनावर आधारलेली आहे त्या पिंकी सोनकर हिच्या ओठावर शस्त्रक्रिया करणाऱ्या प्लॅस्टिक सर्जन डॉ. सुबोध कुमार सिंग यांनी लॉस एन्जेलिसवरून आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ही कथा कोणा एका ग्रामीण मुलीची नाही तर स्वत:च्या शारीरिक व्यंगावर उपचार करुन घेण्यास उत्सुक असलेल्या तिच्यासारख्याच ओठ फाटलेल्या हजारो इतर मुलींची ही कथा आहे. वाराणसीतील डॉ. सिंग हे पिंकी आणि तिचे वडील राजेंद्र सोनकर यांच्यासह लॉसएन्जेलिस येथे गेले आहेत. ऑस्कर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आटोपल्यावर लगेचच ते बोलत होते. राजेंद्र सोनकर हे मूळचे उत्तर प्रदेशातील रामपूर दबाई गावचे. पिंकी ही त्यांची मुलगी. ते मुलीसह ऑस्कर सोहळ्यासाठी आले होते. सुमारे ३९ मिनिटांचा हा लघुमाहितीपट अमेरिकन चित्रपटनिर्माते मिगॅन मायलन यांनी, ‘स्माइल ट्रेन’ या आंतरराष्ट्रीय संघटनेसाठी तयार केला आहे. ही संघटना जगभरातील ओठ दुमडलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करते. विकसनशील देशांमध्ये सुमारे ४.७ दशलक्ष मुले अशा व्यंगाने बाधित आहेत आणि त्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. यापैकी दहा लक्ष मुले एकटया भारतात आहेत. भारतात दर ७०० मुलांमागे एक मुलगा वा मुलगी ओठ दुमडलेल्या अवस्थेत आहेत. अशा अवस्थेत हे व्यंग असलेल्या मुलीच्या जीवनावर बनविलेल्या लघुमाहितीपटाला ऑस्करसारखा सर्वोच्च बहुमान मिळावा ही गोष्ट अभिमानास्पद तर आहेच; शिवाय समाजात दुर्लक्षित आणि एकाकी जीवन जगण्यास भाग पडलेल्या लाखो मुलामुलींच्या मानसिक घुसमटीला वाचा फोडल्याचा मानही याने मिळवून दिला. या लघुमाहितीपटाचे सबटायटल्स इंग्रजीतून असून, एक तासाच्या शस्त्रक्रियेपूर्वीची पिंकी आणि शस्त्रक्रियेनंतर तिच्यातील आत्मविश्वास खऱ्या अर्थाने बळावलेल्या मुलीचे हृद्य चित्रण त्यात आहे. पिंकीच्या कुटुंबात पाच मुले आहेत. पिंकीच्या जन्मापासून तिच्या गरीब कुटुंबाने सातत्याने समाजाची उपेक्षा अनुभवत आपल्या असह्य़ जिण्याचे चटके अनुभवलेले आहेत. पिंकीचे हे व्यंग म्हणजे तिच्या कुटुंबाला मिळालेला शाप आहे असे तेथील ग्रामस्थ समजतात. मात्र, ऑस्कर पुरस्कारामुळे या सर्व टीकाटिप्पणींचे मळभ दूर झाले असून, आपण गावी परतल्यावर नव्या उमेदीने आणि उत्साहाने कामाला लागणार आहोत असे डॉ.सिंग यांनी म्हटले आहे. या लघुमाहितीपटात पिंकीला प्रमुख भूमिका मिळण्याचे श्रेय डॉ.सिंग यांनाच जाते. पिंकीचे व्यंग सोडले,तर तिचा चेहरा अत्यंत सुंदर असल्यामुळे डॉक्टरांनी तिला या माहितीपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी निवडले. चित्रीकरणाप्रसंगी ती अवघी सहा वर्षांची होती. तिच्या चेहऱ्यावर आज फुललेले हास्य तिचे सौंदर्य अधिकच खुलवते एवढे निश्चित!