Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

धारावीत जल्लोष!
बंधुराज लोणे

 

‘स्लमडॉग..ला’ ऑस्कर मिळाल्याने धारावीत जल्लोषाचे वातावरण आहे तर धारावीच्या गरिबीवर किती जण ‘मिलिनेअर्स ’ होणार, असाही सवाल विचारला जात आहे.
‘स्लमडॉग..ला’ ऑस्कर मिळणार, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. मात्र त्याचे धारावीकरांना फारसे अप्रुप नव्हते. कारण धारावीत या पूर्वी अनेक सिनेमांचे चित्रिकरण झालेले आहे आणि धारावीच्या वातावरणावर अनेक सिनेमे आलेले आहेत. धारावीत दररोज कोणी तरी परदेशी पत्रकार, एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या कामाची पाहणी करण्यासाठी परदेशी पाहुणा फेरफटका मारीत असतो. मात्र तरीही आज पाहटेपासूनच धारावीतील अनेक वस्त्यांत ‘ऑस्कर फिवर’ चढला होता. पाहटेच लोक चॅनेलपुढे ठाण मांडून बसले होते. विशेषत: तामिळ वस्ती असणाऱ्या गल्ल्यांमध्ये लोकांना फारच उत्सुकता होती. रहेमानचे नाव ऑस्करसाठी जाहीर होताच धारावीत एकच जल्लोष झाला. अनेकांनी मिठाईचे वाटप करून आपला आनंद साजरा केला. धारावीच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या चित्रपटाला जगातील सर्वात मोठे पारितोषिक मिळाले ही फारच अभिमानाची बाब आहे, असे पारप्पा विश्वनाथ सावळे यांनी सांगितले. भारतीय सिनेमाला हे पारितोषिक मिळाले ही गोष्ट महत्वाची आहे, असेही म्हणाले.
अख्तर रिझवी यांच्या मते धारावीचेच हे चित्रण नाही तर कमी अधिक प्रमाणात मुंबईतील सर्वच झोपडपट्टय़ांचे हे चित्रण आहे. मात्र धारावी ‘ब्रँड’ असल्याने त्याचा वापर करण्यात आलेला आहे. या सिनेमाला एवढे मोठे पारितोषिक मिळाले मुळे धारावीकरांच्या जीवनात काय फरक पडणार आहे? असा सवाल अख्तर रिझवी यांनी केला.
राजू कोरडे यांनी मात्र थोडी वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली. धारावीच्या गरिबीवर अनेक सिनेमे आलेले आहेत. यात नवीन काय ? गरिबी दाखविण्याबाबत गैर काही नाही, कारण गरिबी आहे तर त्याचे चित्रण होणारच मात्र यापेक्षा चांगले सिनेमे धारावीवर तयार झालेले आहेत, असे कोरडे यांचे म्हणणे आहे. मूळात हा भारतीय सिनेमा नाही, भारताच्या पाश्र्वभूमीवर परदेशी माणसाने तयार केलेला हा सिनेमा आहे, त्यामुळे ‘ थोडी खूषी, थोडा गम’ अशीच धारावीकरांची स्थिती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुर्गेशन नाडार यांनी ‘स्लमडॉग..ला’ मिळालेल्या पुरस्काराचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. ‘ बहोत अच्छी बात है’ असे ते म्हणाले. ‘स्लमडॉग..ला’ ऑस्कर मिळणार, अशी आशा वाटत होती, रहेमानचे संगीत ग्रेटच आहे, असे मुगेशन नाडार यांना वाटते. जयंती परमेश्वरन यांनीही आनंद व्यक्त केला आहे. आम्ही सर्वाना मिठाई वाटली, असे त्यांनी सांगितले. रहेमानला हा सन्मान मिळाला, याचा खूप आनंद झाला, असे त्या म्हणाल्या. विजेयन थेवर यांनी पहाटेपासूनच चॅनेलपुढे ठाण मांडले होते. रहेमानाचे नाव जाहीर होताच आम्ही आनंदाने उडय़ाच मारल्या, असे ते सांगतात. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. धारावीत आज सर्वत्र ‘स्लमडॉग.’चीच चर्चा होती !