Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘आवाज’ कुणाचा.. ‘एफटीआयआय’च्या रसूलचा!

 

पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, म्हणजेच ‘एफटीआयआय’मधील मीडियाची आजची गर्दी वेगळ्या कारणासाठी होती. तिथे कोणता ‘झीरो सेमिस्टर’चा वाद सुरू नव्हता, की विद्यार्थ्यांचे आंदोलन! आज होता फक्त ‘जय’घोष! ‘साऊंड मिक्सिंग’सारख्या तांत्रिक म्हणून हिणविल्या जाणाऱ्या विभागातील ऑस्कर यशाचा! त्याचा शिलेदार होता अर्थातच गुणवान माजी विद्यार्थी रसूल पुकुट्टी.
‘स्लमडॉग मिलिनेअर’साठी रसूलला ‘साऊंड मिक्सिंग’साठी ऑस्कर जाहीर झाले नि त्याच्या मातृसंस्थेत एकच जल्लोष झाला. ‘एफटीआयआय’मधील कायम चर्चेत राहणारी ब्रँच म्हणजे अभिनय आणि दिग्दर्शन! संस्थेच्या सर्व ‘लाईमलाईट’चे मानकरी हे प्रामुख्याने याच फॅकल्टीचे! आता साऊंड डिपार्टमेंटचा ‘आव्वाज’ होता. तोही ऑस्करसारखा सर्वोच्च पुरस्कार पटकाविल्याचा! त्यामुळेच या विभागात आज विशेष उत्साह होता.
रसूल हा १९९२ ते ९५ च्या बॅचचा विद्यार्थी. त्याचा अ‍ॅप्रोच, परिश्रम करण्याची तयारी आणि मुख्य म्हणजे संपूर्ण सिनेमाबाबतच शिकण्याची आस्था पाहून तो नक्कीच मोठा होणार, याबाबत आमच्या मनात शंका नव्हती.. साऊंड विभागाचे प्रमुख व शैक्षणिक समन्वयक के. ए. सरकार ‘लोकसत्ता’च्या अभिनंदनाचा स्वीकार केल्यानंतर सांगत होते. विभागाच्या पायऱ्यांवर एव्हाना विद्यार्थी जमा झाले होते आणि तिथेच सुरू झाला सरकार यांचा अनौपचारिक वर्ग! विषय अर्थातच होता, रसूल!
केरळमधील कोल्लम जिल्ह्य़ातील विलाकुप्परा या एका छोटय़ा खेडय़ातील रसूल ‘एफटीआयआय’मध्ये दाखल झाला. गावामध्ये लाईटदेखील नाही आणि इथे ‘एफटीआयआय’मधील झगमगाट व पुढारलेल्या वातावरणात रसूलला सर्व तऱ्हेचे धक्के बसले. त्यात तो मितभाषी; परंतु पहिल्या सत्राच्या खडतर वाटचालीमधून सहीसलामत बाहेर पडल्यानंतर रसूलने मागे वळून पाहिले नाही. प्रचंड परिश्रम करण्याची तयारी, भाषा-संस्कृती, गाव-शहर अशा भेदांचा अडसर येऊ न देता तो चित्रपटांशी संबंधित सर्व क्षेत्रांची माहिती मिळवू लागला. साऊंड किंवा लाईट टेक्निशियन असे संबोधिले गेल्यावर आम्हाला वाईट वाटते. रसूलही त्याबाबत खूपच संवेदनशील आहे. ‘सर, आपण करतो ते तंत्र का? ती कला म्हणून का गौरविली जात नाही..’ असा प्रश्न तो सातत्याने उपस्थित करायचा. तेव्हा मी सांगत असे, ‘मग तू एक काम कर. सेकंड-थर्ड असिस्टंट म्हणून काम करण्यात आयुष्य घालवू नको. स्वत:च्या नावाचा ब्रँड तयार करण्याचा निर्धार कर. त्यानंतरच आपली लोकं म्हणतील की, साऊंड ही एक कला आहे.’ रसूलने स्वत:चा ब्रँड तयार केलाच, इतकेच नाही तर ऑस्करही पटकाविले.. सरकारांच्या शब्दांत साफल्यभाव होता. संस्थेत असताना रसूलने केलेल्या ‘एक अजनबी’ या लघुपटाने युरोपमधील चित्रपट महोत्सवांमध्ये यश मिळविले होते. त्यानंतर ऑस्करचे मानांकन मिळविल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच रसूलने संस्थेतील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली होती. ‘पडद्यामागे काम करणाऱ्यांना मान द्या, असे म्हणताना हीरो-हिरोईनच्या जोडीने पोस्टर झळकवा, अशी आमची मुळीच मागणी नाही. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर योगदान देण्याचा आमचा हक्क आहे. तो आम्हाला सन्मानपूर्वक द्या. तसे केले, तर ‘स्लमडॉग’सारखी कलाकृती घडते. खऱ्या अर्थाने ‘टीमवर्क’चा प्रत्यय येतो. मात्र हक्क मागताना कर्तव्यपूर्तीची क्षमताही हवीच. त्यासाठी तुम्हालाही तेवढेच टॅलेन्टेड असावे लागेल. कोणतेही आव्हान पेलण्याची क्षमता, धाडस आणि दृष्टी निर्माण करायला हवी’, असे या कार्यशाळेत रसूलने आवर्जून सांगितले होते.
रसूलची कारकीर्द रजत कपूरच्या १९९७ मधील ‘प्रायव्हेट डिटेक्टिव्ह’च्या माध्यमातून सुरू झाली. त्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांमध्ये तो खऱ्या अर्थाने पुढे आला. संजय लीला भन्साळीच्या ‘ब्लॅक’मुळे ब्रेक मिळाला. त्यानंतर सावरिया, गझनीसारख्या ‘मेन स्ट्रीम’ चित्रपटांची जबाबदारी रसूलने सांभाळली. गांधी माय फादर, आमूसारख्या कलात्मक चित्रपटांच्या माध्यमातून रसूलने प्रायोगिक भूक भागवून घेतली.
संस्थेचे संचालक पंकज राग यांनीही रसूलचे अभिनंदन केले. ‘संस्थेला जागतिक स्तरावर मान्यता आहेच. आता त्यावर ऑस्करची मोहोर उमटली. यापुढील काळात ‘ग्लोबल एफटीआयआय’चा ब्रँड विकसित करण्याच्या मोहिमेत रसूलच्या यशाची मोठी मदत होईल,’ असे ते म्हणाले.
साऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस ऑस्कर ट्रॉफीप्रमाणेच ‘गोल्डन डे’ ठरला. ‘संस्थेत प्रामुख्याने अभिनय व दिग्दर्शन या शाखांभोवती वलय! त्यानंतर एडिटिंगचे विद्यार्थी भाव खाऊन जातात. फक्त आठच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असल्याने साऊंड विभाग आधीच ‘अल्पमतात’! आता मात्र ही सर्व कसर भरून काढण्याची तयारी साऊंड विभागाच्या विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. रसूलच्या यशाची बातमी पाहताच जल्लोषाला प्रारंभ झाला. आता अभूतपूर्व ‘सेलिब्रेशन’ होईलच; परंतु त्याहीपेक्षा मोठा समारंभ रसूलच्या उपस्थितीत होईल. तो म्हणजे कोणत्या पार्टीचा नव्हे, तर रसूलच्या मार्गदर्शनाखाली ‘स्लमडॉग’ पाहण्याचा..!’ अशा शब्दांत सरकार आणि विद्यार्थी आनंद व्यक्त करतात.
आशिष पेंडसे
ashpen6@yahoo.com