Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

* ऑस्कर म्हणजे काय रे भाऊ?

 

अमेरिकेतील ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’तर्फे चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रत्येकवर्षी ऑस्कर पुरस्कार वितरीत केले जातात. २४ सामान्य आणि सहा विशेष श्रेणींमध्ये हे पुरस्कार वितरीत केले जातात. मात्र विशेष श्रेणीतील पुरस्कार दरवर्षी दिले जातातच असे नाही.
* पहिला ऑस्कर पुरस्कार कधी दिला गेला?
पहिला ऑस्कर पुरस्कार १९२९ साली देण्यात आला. हॉलिवूड येथील ‘रूझवेल्ट हॉटेल’मध्ये छोटेखानी समारंभात अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. या पहिल्यावहिल्या सोहळ्यासाठी चित्रपट क्षेत्रातील अवघे २७० जण हजर होते. प्रसिद्धीमाध्यमांनी या पहिल्यावहिल्या सोहळ्याची विशेष दखल घेतली नव्हती. कारण तीन महिने आधीच ऑस्करविजेते घोषित करण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर या पुरस्कार सोहळ्याला प्रसिद्धीमाध्यमांकडून अगदी थंड प्रतिसाद देण्यात आला. त्यामुळे अ‍ॅकेडमीने पुढल्या ऑस्कर पुरस्कारांचा निकाल प्रत्यक्ष पुरस्कार सोहळा पार पडेपर्यंत गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात ऑस्कर पुरस्कारांच्या निकाल प्रसिद्ध करण्यात आल्याने गुप्तता पाळण्याच्या निर्णयाचे तीन-तेरा वाजले. ‘लॉस एन्जलिस टाइम्स’ने १९४० साली पुरस्कारविजेत्यांची नावे प्रसिद्ध केली होती. त्यानंतर मात्र अ‍ॅकेडमीने निकालांसाठी ‘बंद पाकिट’ पद्धत अवलंबिली. अमेरिका आणि कॅनडामधील प्रेक्षकांनी पहिल्यांदाच १९५३ साली टेलीव्हिजनवरून ऑस्कर सोहळ्याचा अनुभव घेतला. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी ऑस्करला आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झाले. २००२ पासून तर हॉलिवूडचे ‘कोडॅक’ सोहळ्याचे कायमस्वरूपी ठिकाण म्हणून नावारूपास आल्यापासून ऑस्कर आणि कोडॅक हे समीकरण बनले आहे.
* ऑस्कर ‘सन्मानचिन्हा’चा निर्माता कोण?
एमजीएम आर्ट विभागाचा प्रमुख क्रेडीक गिब्सन याच्या देखरेखीखाली चित्रपट क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणारे ऑस्कर ‘सन्मानचिन्ह’ तयार करण्यात आले. मेक्सिकन दिग्दर्शक एमिलिओ इआय इंडिओ फर्नाडिजने म्हटल्याप्रमाणे, ‘सन्मानचिन्हा’मधील फिल्म रीळ ही चित्रपट निर्मितीतील निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, टेक्निशियन आणि लेखक अशा पाच महत्त्वाच्या विभागांचे महत्त्व विशद करते.
* सन्मानचिन्ह’ पुरस्कार विजेत्याचे असते?
ऑस्करविजेता किंवा त्याच्या वारसदाराला हे ‘सन्मानचिन्ह’ विकायचे असेल तर तो ते केवळ अ‍ॅकेडमीलाच विकू शकतो.
* कोण आहेत अ‍ॅकेडमीचे सदस्य?
अ‍ॅकेडमीतर्फे मतदार सदस्यांविषयीचा तपशील प्रसिद्ध केला जात नाही. मात्र चित्रपट निर्मिती क्षेत्राच्या १५ विभागांतील सुमारे सहा हजार मतदार या पुरस्कारांसाठी मतदान करीत असतात, असे अ‍ॅकेडमीतर्फे सांगण्यात येते. सध्याच्या काही प्रसिद्ध ‘सेलिब्रेटीज’पैकी जॅक निकोलसन, सलमा हयेक, विल स्मिथ, मेरिल स्ट्रीप, स्टीव्हन स्पिलबर्ग आणि मीरा नायर यांचा या सदस्यांमध्ये समावेश आहे.
* नामांकनांची आणि मतदानाची नेमकी प्रक्रिया काय?
विविध विभागातील मतदार आपल्या श्रेणीतील नामांकनासाठी मतदान करतो. उदाहरणार्थ मतदार सदस्य हा अभिनेता असेल तर तो अभिनेता श्रेणीसाठी मतदान करतो. तर अ‍ॅनिमेटेड आणि परदेशी चित्रपटाच्या श्रेणीसाठीची नामांकने ही मल्टि-ब्रँच स्क्रिनिंग समितीतील मतांनुसार जाहीर केली जातात. सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या निवडीसाठी सर्व विभागांतील सदस्य मतदान करू शकतात. डिसेंबर अखेरीपर्यंत सर्व नामांकने ई-मेलद्वारे कार्यकारी सदस्यांकडे पाठविली जातात. त्यानंतर म्हणजे जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात नामांकनाची अंतिम यादी जाहीर करण्यात येते. ही यादी पुन्हा ई-मेलद्वारे मतदार सदस्यांकडे पाठविण्यात येते. या वेळी प्रत्येक मतदार सदस्याला अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाईव्हटेरी फिचर, माहितीपट, लघु माहितीपट आणि परदेशी चित्रपट या विशेष श्रेणीवगळता उर्वरित प्रत्येक श्रेणीसाठी मतदान करता येते. विशेष श्रेणीतील नामांकनासाठी आलेले सर्व चित्रपट ज्या सदस्याने पाहिले आहेत तोच सदस्या या श्रेणीतील अंतिम नामांकनासाठी मतदान करू शकतो. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘प्राईसवॉटरहाऊसकूपर्स’च्या दोन भागीदारांव्यरिक्त कोणालाही प्रत्यक्ष सोहळ्यात निकालाचे ‘बंद पाकिट’ उघडेपर्यंत विजेत्याबाबत पुसटशीही माहिती नसते.