Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

मुख्यमंत्र्यांपुढे नाराज बंडोबांचे आव्हान!
संदीप आचार्य
मुंबई, २३ फेब्रुवारी

राज्यातील काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावतंत्राला सामोरे जावे लागत असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षांतर्गत नाराज स्वकीयांशी सामना करावा लागेल असे चित्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक तसेच विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीप देशमुख या मंत्रिपदासाठी इच्छुकांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आल्यामुळे निष्ठावंत विरुद्ध दलबदलू असा लढा तीव्र होण्याची शक्यता आह

वडेट्टीवारांवर कारवाई करा : ‘स्वाभिमान’ ची मागणी
मुंबई, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

आदिवासी महिला सभापती सुभद्रा कोटनाके यांच्यावर फाईल फेकून मारल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आदिवासी विकास राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर कडक कारवाई केली जावी, अशी
मागणी ‘स्वाभिमान’चे अध्यक्ष नितेश राणे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.

अध्यादेशाचे आश्वासन; डॉक्टरांचा ‘बंद’ मागे
मुंबई, २३ फेब्रुवारी/ खास प्रतिनिधी

डॉक्टरांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला दिल्यामुळे डॉक्टरांचे उद्याचे राज्यव्यापी काम बंद आदोलन मागे घेण्यात आले आहे.
डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत राज्य शासनाने नागपूर अधिवेशनात विधेयक मांडले होते. मात्र त्यावेळी ते मंजूर झाले नाही.

छायाचित्रांमधून उलगडला २६/११चा थरार..!
मुंबई, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातील २६ तारखेला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी आजही सर्वाच्या मनात आहेत. हल्ल्यानंतर मुंबई आणि मुंबईकर सावरले आणि पुन्हा आपल्या कामाला लागले. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचे छायांकन करणे हे मुंबईतील विविध वृत्तपत्रातील छायाचित्रकारांसाठीही एक आव्हान होते. मुंबईत अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली होती.

‘वऱ्हाड’ पोरकं झालं ..
मुंबई, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा ठेवा सातासमुद्रापलीकडे पोहोचवणारा अष्टपैलू नाटककार आपण गमावला असल्याची शोकसंवेदना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या एकपात्री प्रयोगाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये दोनदा नोंद झाली आहे.

शिक्षिकेच्या घरी तीन लाखांची चोरी
बदलापूर, २३ फेब्रुवारी/वार्ताहर

महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षिकेच्या घरी घरफोडी होऊन सुमारे तीन लाख रुपयांचे सोन्याचे विविध दागिने घेऊन चोरटे पसार झाले. न्यू कॉलनी येथील करीम बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रेखा शहा रविवारी रात्री आठ वाजता महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. पहाटे पाच वाजता त्या घरी परत आल्या. त्याप्रसंगी त्यांना घराचे दार उघडलेले दिसले. बाजूला राहणाऱ्यांच्या मदतीने शहा यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाट फोडलेले होते. कपाटातील विविध दागिने चोरटय़ांनी पळवून नेल्याचे शहा यांना पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

अकराव्या मजल्यावरून पडून मायलेकींचा मृत्यू
ठाणे, २३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

भाच्याच्या वाढदिवसाला आलेली भावना विश्वप्रसाद पांडे व साडे तीन वर्षांची मुलगी जया हिचा घोडबंदर रोडवरील एव्हरेस्ट वर्ल्ड गृहसंकुलामधील इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी घडली असून सदनिकांच्या बाल्कनींना सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारे ग्रील्स लावण्यात आलेले नसल्याने हा अपघात घडल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.
ब्रम्हांडमधील पांडे मायलेकी या ढोकाळीतील एव्हरेस्ट वर्ल्ड गृहसंकुलातील तिसऱ्या मजल्यावर राहणारा भाऊ प्रशांत शर्मा यांच्याकडे आल्या होत्या. तेथे भाचाच्या वाढदिवसानिमित्त सत्यनारायणाची पूजा होती. पूजा आटोपल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास भावना मुलीसह अकराव्या मजल्यावर गेली आणि तेथून दोघी जणी खाली कोसळल्या. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २० मजल्याच्या पाच इमारती असून त्यांच्या सदनिकांच्या बाल्कनींना ग्रीलच लावण्यात आलेले नाहीत. सुरक्षिततेच्या कोणत्याच उपाययोजना नसून त्यासाठी तीन वर्षांपासून पाठपुरावा करून बिल्डरने कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

भूमि अभिलेख खात्याच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
मुंबई, २३ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींत झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भूमि अभिलेख राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी मोजणी/लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये समान वेतन, समान दर्जा हे तत्त्व लावण्यात आलेले नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे.

‘क्यु अ‍ॅण्ड ए’ कादंबरीवरही वाचकांच्या उडय़ा!
मुंबई, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कार स्पर्धेत नाव जाहीर झाल्यापासून ते प्रत्यक्षात आज आठ ऑस्कर पुरस्कार मिळेपर्यंत ‘स्लमडॉग मिलेनिअर’ याच चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. चित्रपटाच्या या प्रसिद्धीमुळे विकास स्वरूप यांच्या ज्या ‘क्यु अ‍ॅण्ड ए’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे, त्या कादंबरीलाही सध्या चांगली मागणी आहे. मुंबईतील क्रॉसवर्ड आणि अन्य काही मोठय़ा पुस्तकांच्या दुकानांमधून गेल्या काही दिवसांत वाचकांकडून या पुस्तकाला चांगली मागणी आहे.
स्वरुप यांची ही कादंबरी २००५ मध्ये प्रकाशित झाली होती. त्यावेळी कादंबरीची जेवढी चर्चा झाली नव्हती, तेवढी चर्चा आता सध्या सुरू आहे. गेल्या वर्षी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. त्यानंतर स्वरुप यांच्या ‘क्यु अ‍ॅण्ड ए’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे, हे सगळ्यांसमोर आल्यामुळे पुस्तकाची मागणी वाढली असल्याचे ‘क्रॉसवर्ड’मालाडच्या दुकानातील विक्री विभागातील मुझफ्पर यांनी सांगितले.
२००५ मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा याचा फारसा बोलबाला नव्हता. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणि चित्रपटाचे नाव ऑस्कर पुरस्कारांच्या चर्चेत आल्यानंतर एकदम या पुस्तकाची मागणी वाढली. सध्या एका आठवडय़ात ३० ते ३५ प्रती विकल्या जात असल्याचे मुझफ्फर म्हणाले.