Leading International Marathi News Daily

मंगळवार, २४ फेब्रुवारी २००९

धारावी : मिलिअनेर्सची खाण!
फक्त धारावीकर किंवा मुंबईकर नव्हे तर सर्व देशवासीयांचे डोळे सक्काळसकाळी खिळून राहिले होते.. ‘अ‍ॅण्ड ऑस्कर गोज टू..’ या शब्दांनंतर जल्लोष साजरा झाला तो थेट ‘जय हो!’ याच शब्दांनी.. आता हेच शब्द ‘स्लमडॉल मिलिनेअर’चा परिचय बनले आहेत! सुलेखनकार अच्युत पालव यांनी या निमित्ताने ‘लोकसत्ता’साठी ‘जय हो’चा खास ‘लोगो’ तयार केला आहे. हा लोगो www.achyutpalav.com या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. वाचकांना हा लोगो संगणक, मोबाईलवर किंवा टी-शर्टवर प्रिंटच्या स्वरुपात ठेवावा आणि पुरस्काराचा उत्सव साजरा करावा!

२ मार्चपासून रिअल टीव्ही
टेलिस्कोप

रिअ‍ॅलिटी शोचा बूम आता तितकासा जोरात नाही. पण तरीही आता रिअल टीव्ही ही नवी वाहिनी
२ मार्चपासून सुरू होणार आहे. रिअ‍ॅलिटी शो आणि ‘जनरल एण्टरटेन्मेंट’ या गटातील कार्यक्रम रिअल टीव्ही वाहिनीवरून दाखविण्यात येतील. ‘पोकर फेस’, ‘व्हिकी की टॅक्सी’ आणि ‘हिंदी है हम’ असे तीन कार्यक्रम सुरू होणार आहेत. ‘पोकर फेस’ हा प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम असून दर आठवडय़ाला एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्वीझ गेम शोचा हा फॉरमॅट जगभर तुफान लोकप्रिय ठरला आहे. ‘विकी की टॅक्सी’ हा ‘ड्रामा शो’ आहे तर ‘हिंदी है हम’ ही मालिका असे कार्यक्रम २ मार्चपासून सुरू होणार आहेत.

सामाजिक प्रश्नावर झोत
प्रतिनिधी

‘क्षितिज’ या संस्थेची स्थापना १९९८ मध्ये झाली. संस्थेची पहिली सुरुवात एकांकिका स्पर्धेतून झाली. या संस्थेच्या ‘उजेडफुला’ या एकांकिकेने संस्थेला अनेक बक्षिसे आणि खूप नावलौकिक मिळवून दिला. त्यानंतर ‘हळूवार पाऊलांनी’ ही एकांकिकासुद्धा स्पर्धेतून गाजली. ‘यू आर इन क्यू’, ‘अंधारकैद’, ‘अनादी अनंत’, ‘तिच्या आत्म्यास अशांती लाभो’ अशा अनेक एकांकिका स्पर्धेने सादर केल्या. त्यानंतर संस्थेने ‘सख्या हौस माझी पुरवा’, ‘छब्बू’, ‘निळे स्वप्न निळे आकाश’ ही नाटके रंगमंचावर आणली.

१७८ वर्षांचा पहिला छापखाना आणि पहिल्या मराठी छापील पंचांगाचे जनक थळचे आद्यमुद्रक गणपत कृष्णाजी पाटील जागतिक मुद्रणदिन विशेष जयंत धुळप
डेस्क टॉप पब्लिशिंग’ अर्थात ‘डिटीपी’ हे संगणकीय अक्षर जुळणी आणि पुढे ‘वेब ऑफसेट प्रिंटींग’ असे आजचे छपाईचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आज सर्वदूर परिचित झाल़े छपाई क्षेत्रातील ही आजची देदिप्यमान प्रगती असली तरी आजपासून तब्बल १७८ वर्षांपूर्वी ‘छपाई’ हा विषय ब्रिटिश सरकारच्या ताब्यातील तर ‘मराठी मजकूर छपाई’ हा विचारापलिकडचा विषय होता़

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नगरसेवकाला अपात्र ठरविण्यासाठी महापौरांना साकडे
प्रतिनिधी

नगरसेवकाने अनधिकृत बांधकाम केल्यास अथवा अनधिकृत बांधकामाला साथ दिल्याचे निष्पन्न झाल्यास अशा नगरसेवकाला अपात्र करण्याचा कायदा अस्तित्वात आल्यानंतरही कायद्याची भीती न बाळगता अनके नगरसेवक अनधिकृत बांधकामात सक्रिय असतात हे उघड सत्य आहे. मात्र राजकीय दडपणापोटी पालिका आयुक्त अशा नगरसेवकांवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवू शकत नाहीत.

दत्ताजी नलावडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी

विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी दिवसेंदिवस कमी होत चालला आहे ही सुदृढ लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय चिंताजनक बाब आहे. अधिवेशन वर्षांतून किमान १०० दिवस चालावे यासाठी सर्व पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना आमदार दत्ताजी नलावडे यांनी नाशिक येथे केले. नाशिकमधील १६८ वर्षे जुन्या असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माधवराव लिमये स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत राम प्रधान यांच्या हस्ते अलीकडेच नलावडे यांना प्रदान करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना नलावडे बोलत होते. स्मृतिचिन्ह, ५० हजार रुपये रोख, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर सत्कार समारंभ ज्या वाचनालयाच्या सभागृहात झाला त्या वाचनालयासाठी कोणतेही काम करावयास आपण तयार आहोत, असेही यावेळी नलावडे म्हणाले. या वेळी मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, सुनील शिंदे, ज्योती भोसले, चंद्रकांत खोडे, विश्वास ठाकूर, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर, विश्वास देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी अस्मितेसाठी आता मराठीचे अभिमानगीत!
प्रतिनिधी

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही, असे म्हटले जाते. त्याला काही कारणे असली तरी मराठी लोकांमध्ये मराठीच्याबाबतीत असलेली उदासिनता हे ही एक कारण त्यामागे आहे. त्यामुळेच मराठी लोकांमधील मराठी भाषेबाबतची ही उदासिनता दूर करण्यासाठी आता संगीतकार कौशल इनामदार आणि त्यांचे काही सहकारी पुढे सरसावले आहेत. मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी मराठीचे अभिमानगीत तयार केले जाणार असून येत्या १ मे रोजी या अभिमानगीताची सीडी प्रकाशित केली जाणार आहे. ज्येष्ठ दिवंगत कवी सुरेश भट यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात जी कविता लिहिली तीच कविता आता कौशल इनामदार मराठीचे अभिमानगीत म्हणून मराठी जनतेसमोर आणणार आहेत. मराठीतील नामवंत गायक आणि शंभर वादकांच्या साथीने ही कविता ध्वनिमुद्रित केली जाणार आहे.
लाभले आम्हास भाग्य बोलतो
जागलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढय़ा जगात माय मानतो मराठी
ही भट यांची कविता अभिमानगीत म्हणून निवडण्यात आली आहे.
मराठी मराठीचा अभिमान रुजविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या चळवळीचा एका भाग म्हणून या प्रकल्पासाठी कुणाही प्रायोजकाची आर्थिक मदत न घेता त्यासाठीचा निधी लोकसहभागातून उभा केला जाणार असल्याचे कौशल इनामदार यांनी सांगितले. सध्या ही कल्पना आमच्या मित्रमंडळींमध्ये बोलून दाखवली असता, त्याला सर्वाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परदेशस्थ काही मराठी भाषिकांकडूनही या प्रकल्पासाठी ५७० डॉलर्स मिळाले असून मुंबई आणि राज्यातून सुमारे दोन लाख रुपये जमा झाले आहेत. किमान दोन हजार लोकांनी पाचशे रुपये देऊन या प्रकल्पात सहभागी व्हावे, असे आवाहन करून इनामदार यांनी सांगितले की, या सीडीबरोबर एक पुस्तिका प्रकाशित केली जाणार असून त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास आणि या प्रकल्पात सहभागी झालेल्यांचा नामनिर्देश असयाची माहितीही इनामदार यांनी दिली.
या प्रकल्पामध्ये मराठी भाषेविषयी आस्था आणि प्रेम असणारी कोणीही व्यक्ती सहभागी होऊ शकेल. राजकीय पक्षाच्या मंडळींनीही सकारात्मक प्रतिसाद दिला तर त्यांचेही स्वागत आहे. मराठीची अवहेलना थांबविण्यासाठी एखादी चळवळ सर्वसामान्य नागरिकांमधून उभी राहिली पाहिजे, या उद्देशानेच हा उपक्रम हाती घेतल्याचे ते म्हणाले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपले धनादेश ‘मराठी अस्मिता’ या नावाने काढून मराठी अस्मिता, द्वारा कौशल इनामदार, १०२, त्रिवेणी, शुचिधाम, फिल्म सिटी मार्ग, दिडोशी बस आगाराजवळ, गोरेगाव (पूर्व) मुंबई- ६३ या पत्यावर पाठवावेत, असे आवाहनही इनामदार यांनी केले. www.marathiasmita.org वर इच्छुकांना अधिक माहिती मिळू शकेल.